करोना संकटानंतर परवडणाऱ्या घरांच्या मागणीत घट सुरू झाली. अद्याप ही मागणी पूर्वपदावर आलेली नाही. परवडणाऱ्या घरांचा ग्राहक असलेल्या वर्गाला करोना संकटाचा मोठा फटका बसल्याचा हा परिणाम होता. करोना संकटानंतर एवढ्या वर्षांनीही घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण वाढताना दिसत नाही. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचे गणित बिघडल्याचे समोर येत आहे. गृहनिर्माण क्षेत्र आणि ग्राहक हे दोन्ही यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ५३ टक्के ग्राहक हे सध्याच्या परवडणाऱ्या घरांबाबत असमाधानी असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे घरांची खरेदी करणारा सर्वांत मोठा कनिष्ठ व मध्यम वर्ग सध्याच्या पर्यायांवर नाखुश असल्याचेही स्पष्ट होत आहे.

नेमके सर्वेक्षण काय?

मालमत्ता सल्लागार संस्था ‘ॲनारॉक ग्रुप’ आणि उद्योग संघटना ‘फिक्की’ यांनी हे गृह खरेदीदार कल सर्वेक्षण केले आहे. यंदा पहिल्या सहामाहीच्या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. देशातील प्रमुख महानगरांतील गृहनिर्माण क्षेत्र आणि त्यातील परवडणाऱ्या घरांचे प्रमाण याचा आढावा यातून घेण्यात आला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बांधकाम व्यावसायिकांकडून परवडणाऱ्या घरांचा कमी झालेला पुरवठा आणि गृह खरेदीदारांनी खरेदीसाठी आखडता घेतलेला हात या दोन मुख्य मुद्द्यांवर या सर्वेक्षणातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘बैजूज’पुढील अडचणींत वाढ?

मुख्य कारणे कोणती?

परवडणाऱ्या घरांचे प्रमाण घटण्याची प्रमुख तीन कारणे समोर आली आहेत. त्यात गृहप्रकल्पाचे ठिकाण, बांधकामाचा दर्जा आणि घरांचा आकार यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक बांधकाम व्यावसायिक शहराच्या बाहेर परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प उभारतात. गृहप्रकल्प शहरापासून लांब असल्याचे कारण ९२ टक्के ग्राहकांनी दिले आहे. याच वेळी परवडणाऱ्या गृह प्रकल्पाच्या बांधकामाचा दर्जा अनेक ठिकाणी निकृष्ट असतो आणि त्यांची रचनाही योग्य पद्धतीने केलेली नसते. यामुळे ८४ टक्के जणांनी घर खरेदी टाळल्याचे म्हटले आहे. याचवेळी घरांच्या किमती कमी असल्याने त्यांचा आकार अतिशय छोटा केला जातो. यामुळे ६८ टक्के जणांनी अशा घरांच्या खरेदीस नापसंती दर्शविली आहे.

पुरवठा किती प्रमाणात?

करोना संकटाच्या आधी नवीन गृह प्रकल्पांमध्ये परवडणाऱ्या घरांचे प्रमाण तब्बल ४० टक्क्यांपर्यंत होते. त्यानंतर परवडणाऱ्या घरांच्या पुरवठ्यात सातत्याने घट होत आहे. देशातील प्रमुख महानगरांत एकूण घरांमध्ये परवडणाऱ्या घरांचा पुरवठा करोना संकटाच्या काळात २०२१ मध्ये २६ टक्के होता. तो २०२४ मधील पहिल्या नऊ महिन्यांत १७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नवीन घरांच्या पुरवठ्यात परवडणाऱ्या घरांचे प्रमाण घटत असताना मोठ्या आणि आलिशान घरांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

हेही वाचा >>> एकाकी मृत्यू म्हणजे काय? त्यांची संख्या का वाढतेय? ते रोखण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक कशासाठी?

पसंती कशाला?

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५१ टक्के ग्राहकांनी ३ बीएचके घरांना पसंती दर्शविली आहे. याच वेळी २-बीएचके घरांना ३९ टक्के जणांनी पसंती दाखविली आहे. महानगरनिहाय विचार करावयाचा झाल्यास चेन्नई, हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ३ बीएचके घरांना मागणी अधिक आहे. या महानगरांतील ५० टक्के ग्राहकांनी ३ बीएचके घरांना प्राधान्य दिले आहे. याचवेळी कोलकता, मुंबई आणि पुण्यात सुमारे ४० टक्के ग्राहकांचे प्राधान्य २ बीएचके घरांना आहे. याचबरोबर सर्वेक्षणात सहभागी ४५ टक्के जणांनी ९० लाखांहून अधिक किमतीच्या घरांना प्राधान्य दिले. करोना संकटाच्या आधीच्या काळातील सर्वेक्षणात अशा ग्राहकांचे प्रमाण केवळ २७ टक्के होती.

इतर कारणे?

गेल्या काही वर्षांत घरभाड्यात मोठी वाढ झाली असून, त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत काही ठिकाणी घरभाड्यात तब्बल ७० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे महानगरांतील घर हे उत्पन्नाचा स्रोत बनले आहे. यामुळे घर घेताना त्यातून भाड्याचे उत्पन्न किती मिळेल, याचाही विचार केला जात आहे. यामुळे घर खरेदी करताना त्यातील गुंतवणुकीच्या परताव्याचाही विचार केला जात आहे. याचबरोबर जागा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. दक्षिणेतील चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये जागा खरेदी करण्यास सुमारे ३० टक्के ग्राहकांनी पसंती दाखविली आहे. याचवेळी मुंबई, पुणे आणि दिल्लीतील ७० टक्के जणांनी सदनिका खरेदीलाच प्राधान्य दिले आहे. sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader