खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा तेलंगणानंतर महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला देशभरात भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच बंगळुरू न्यायालयाने काँग्रेस आणि ‘भारत जोडो’ यात्रेचे ट्विटर हँडल तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसिद्ध अभिनेता यश याच्या ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील गाणी या यात्रेत काँग्रेस नेत्यांनी अनधिकृतरित्या वापरल्यानंतर न्यायालयाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणात कॉपीराईट नियमांचे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. “काँग्रेस आणि या पक्षातील नेत्यांना ‘केजीएफ-२’ मधील गाणी अनधिकृतरित्या वापरण्यापासून रोखले नाही, तर फिर्यादीचे मोठे नुकसान होईल. शिवाय पायरसीला प्रोत्साहन मिळेल”, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमुद केले आहे.
काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करा, कोर्टाचा आदेश
नेमकं प्रकरण काय आहे?
कन्नड चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘केजीएफ-२’ मधील संगीत अनधिकृतरित्या वापरल्यानंतर राहुल गांधींसह तीन ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांविरोधात ४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान या चित्रपटातील संगीताचा वापर करण्यात आला आहे. कॉपीराइट कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार यशवंतपूर पोलीस ठाण्यात राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ‘केजीएफ-२’ चित्रपटातील गाण्यांचे कॉपीराईट ‘एमआरटी’ म्यूझीकचे व्यवस्थापक एम. नवीन कुमार यांच्याकडे आहेत. त्यांनीच काँग्रेस नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
‘भारत जोडो’ यात्रा रोखणे अशक्य!; राहुल गांधी यांचा इशारा; यात्रा तेलंगणमधून महाराष्ट्रात
“जयराम रमेश यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘भारत जोडो’ यात्रेचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत परवानगी शिवाय ‘केजीएफ-२’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणी वापरण्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवण्यासाठी फसवणूक करत हे संगीत वापरण्यात आले आहे”, असा आरोप नवीन कुमार यांनी केला आहे.
न्यायालयाने काय आदेश दिले आहेत?
‘केजीएफ-२’ चित्रपटातील गाण्याशी निगडीत पोस्ट काँग्रेस आणि ‘भारत जोडो’ यात्रेच्या ट्विटर हँडल्सवरुन काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने ट्विटरला दिले आहेत. पुढील सुनावणीपर्यंत कॉपीराईट असलेले संगीत अनधिकृतरित्या आणि परवानगी शिवाय वापरू नये, असा आदेश न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना दिला आहे. इलेक्ट्रॉनिक ऑडिट आणि नियमांचे उल्लंघन करणारे साहित्य जप्त करण्यासाठी न्यायालयाने आयुक्तांच्या नियुक्तीचे निर्देशही दिले होते. या आदेशानुसार बंगळुरू न्यायालयातील संगणक विभागाचे प्रणाली व्यवस्थापक एसएन. वेंकटेशमूर्ती यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणातील तांत्रिक बाबींचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.
काँग्रेसची भूमिका काय?
“न्यायालयाने काँग्रेस आणि ‘भारत जोडो’ यात्रेच्या खात्यांविरोधात दिलेल्या प्रतिकुल आदेशाबाबत आम्ही सोशल मीडियावर वाचले आहे. आम्हाला या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली नव्हती, शिवाय न्यायालयात उपस्थित राहण्यासही सांगण्यात आले नव्हते. न्यायालयाच्या आदेशाची प्रतही अद्याप प्राप्त झाली नाही”, असा दावा काँग्रेसने ट्वीट करत केला आहे. दरम्यान, या प्रकरणात कायदेशीर पर्यायांवर विचार सुरू असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.