Bhagavad Gita UNESCO recognition: भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ (Memory of the World Register) मध्ये समावेश करण्यात आला आहे. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश हा आपल्या कालातीत ज्ञानसंपदेचा आणि समृद्ध संस्कृतीचा जागतिक सन्मान आहे. गीता आणि नाट्यशास्त्रानं शतकानुशतकं मानवीसंस्कृती आणि चेतनेचा परिपोष केला आहे. त्यातील विचार आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देतात.”
या पोस्टबरोबर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे ट्विटही शेअर केले. शेखावत लिहितात, “भारतीय संस्कृतीच्या वारशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. श्रीमद्भगवद्गीता आणि भरतमुनींचं नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश झाला आहे. हा जागतिक सन्मान भारताच्या सनातन ज्ञानसंपदेचा आणि कलात्मक प्रतिभेचा गौरव करतो. “हे कालातीत ग्रंथ केवळ साहित्यिक ठेवा नाहीत, तर ते भारताच्या तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्राचे मूलाधार आहेत. त्यांनी आपल्या विचारसरणी, भावना, जीवनशैली आणि अभिव्यक्तीला आकार दिला आहे. या समावेशामुळे आता या आंतरराष्ट्रीय यादीत भारताच्या एकूण १४ नोंदींचा समावेश झाला आहे.” युनेस्कोनं गुरुवारी जाहीर केलं की, मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये ७४ नवीन नोंदींचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर या जागतिक रजिस्टरमध्ये समाविष्ट झालेल्या महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि ग्रंथसंपदेची संख्या ५७० वर पोहोचली आहे.
Memory of the World Register म्हणजे काय?
युनेस्कोचं ‘Memory of the World Register’ ही एक आंतरराष्ट्रीय यादी आहे. ही यादी जगभरातील अत्यंत मौल्यवान, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अमूल्य अशा दस्तऐवजांचा, ग्रंथसंपदांचा, हस्तलिखितांचा, चित्रफीत, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादींचा संग्रह जतन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही नोंदणी अशी दस्तऐवजीकृत माहितीचे जतन करण्याचा आणि तिचं संरक्षण, प्रसार सुलभ करण्याचा एक जागतिक उपक्रम आहे. हा उपक्रम युनेस्कोने १९९२ साली सुरू केला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जगभरातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज, हस्तलिखितं, ध्वनिचित्रफीत, ग्रंथालयं आणि संग्रहालयांतील संग्रह यांचं जतन करणं आणि त्यांना सार्वत्रिक उपलब्ध करून देणं हा आहे. या प्रकल्पांतर्गत, १९९७ साली ‘Memory of the World International Register’ ची स्थापना करण्यात आली. यात जगभरातील महत्त्वपूर्ण दस्तऐवजांची नोंद केली जाते. या नोंदींमध्ये लोकसंगीताच्या ध्वनिमुद्रणांपासून ते प्राचीन भाषांतील हस्तलिखितं, ऐतिहासिक चित्रपट आणि सामाजिक-राजकीय घडामोडींचं दस्तऐवजीकरण यांचा समावेश आहे.
या प्रकल्पाचं संचालन आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती (International Advisory Committee – IAC) करते. ही समिती दस्तऐवजांच्या जागतिक महत्त्वावर आधारित नोंदींसाठी शिफारस करते. सध्या, या आंतरराष्ट्रीय रजिस्टरमध्ये विविध देशांतील सुमारे 570 दस्तऐवजांची नोंद आहे. ‘Memory of the World Programme’ चा उद्देश केवळ दस्तऐवजांचं जतन करणं नाही, तर त्यांचं डिजिटायझेशन, प्रसार, आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ते उपलब्ध करून देणं हा आहे. या कार्यक्रमामुळे जगभरातील सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाचं संरक्षण आणि प्रसार सुलभ होतो.
या यादीत समावेश कशासाठी केला जातो?
दस्तऐवज किंवा ग्रंथाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, बौद्धिक किंवा सामाजिक दृष्टिकोनातून जागतिक वारशामध्ये मोलाचा वाटा असेल.
तो ग्रंथ किंवा नोंद मानवजातीच्या सामूहिक स्मृतीचा भाग मानला जात असेल तर, या दस्तऐवजांचे संपूर्ण किंवा अंशतः जतन करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी उपलब्ध करून ठेवणे गरजेचं मानलं जातं.
यापूर्वी या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या भारताच्या काही महत्त्वाच्या नोंदी
ऋग्वेदाची हस्तलिखित प्रत (Bhandarkar Institute), तैत्तिरीय संहिता (Kerala), महात्मा गांधींचे लेखी दस्तऐवज, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पत्रव्यवहार, आता त्यात भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचाही समावेश झाला आहे. भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचं हे अनमोल प्रतीक आहे. थोडक्यात, Memory of the World Register म्हणजे जगाच्या सामूहिक सांस्कृतिक आणि बौद्धिक स्मृतीचा दस्तऐवजीकृत संग्रह. जो सर्व मानवजातीसाठी सुरक्षित ठेवण्याचं उद्दिष्ट राखतो.
भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये झालेला समावेश हा केवळ भारताच्या प्राचीन ज्ञानसंपदेचा जागतिक गौरव नाही, तर एक संदेश आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा आजही जगभर प्रभावशाली आहे आणि तो प्रेरणा देतो. हे ग्रंथ केवळ धार्मिक किंवा कलात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत, तर त्यांनी भारतीय विचारधारेचं, तत्त्वज्ञानाचं आणि अभिव्यक्तीचं जडणघडण केली आहे. या जागतिक मान्यतेमुळे भारताच्या ५,००० वर्षांच्या विचारवारशाची साक्ष पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. अशा जागतिक मंचावर आपला वारसा सन्मानित होणं म्हणजे केवळ अभिमानाची बाब नाही, तर जबाबदारीही आहे.