यंदाच्या वर्षाची सुरुवात भारतीयांसाठी दिलासादायक ठरली. १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ जानेवारीपासून त्यासाठी नोंदणी सुरू झाली. ३ तारखेपासून अर्थात सोमवारपासून या वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींनी लस देण्यास सुरुवात झाली. मात्र, या लसीकरणासाठी देण्यात आलेल्या लसींच्या एक्स्पायरी डेटवरून मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं. बंगळुरूमधल्या काही केंद्रांवर या लसी न देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. पण लागलीच केंद्र सरकारकडून याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं असून या लसी देण्यास योग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण नेमका हा वाद का निर्माण झाला? लसींची एक्स्पायरी डेट नेमकी ठरवतात कशी? डेट उलटून गेल्यानंतरही कोवॅक्सिनच्या लसी देण्यासाठी योग्य कशा ठरल्या?
का सुरू झाला एक्स्पायरी डेटचा वाद?
हा सगळा वाद सुरू झाला तो बंगळुरूमधून. बंगळुरूमधल्या काही खासगी रुग्णालयांनी २ जानेवारी रोजी अर्थात रविवारी कोवॅक्सिनच्या व्हायल्सवरची एक्स्पायरी डेट उलटून गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, या व्हायल्समधली लस देणार नसल्याचं देखील सांगण्यात आलं. यानंतर भारत बायोटेकनं लसींचा हा साठा रुग्णालयांमधून पुन्हा जमा करून त्यावर नव्या एक्स्पायरी डेटचं लेबलिंग करायला सुरुवात केली. यादरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देखील या लसी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर पुन्हा कोवॅक्सिनचे डोस १५ ते १८ वयोगटातल्या मुलांना देण्यास सुरुवात झाली.
एक्स्पायरी डेट उलटूनही लसी योग्य कशा?
कोवॅक्सिन लसीला १५ ते १८ वयोगटातील मुलांना देण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं परवानगी दिली आहे. सुरुवातीला लसीच्या व्हायल्सची एक्स्पायरी डेट उत्पादनाच्या ६ महिन्यांपर्यंत ठरवण्यात आली होती. त्यानंतर शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या आधारावर ती वाढवून ९ महिने करण्यात आली. नवी एक्स्पायरी डेट कोव्हॅक्सिन लसीच्या बॉटल्सवर देखील प्रिंट करण्यात आली.
दरम्यान, भारत बायोटेकनं केलेल्या स्टॅबिलिटी स्टडीजच्या माध्यमातून लस उत्पादनापासून ९ ऐवजी १२ महिन्यांपर्यंत देण्यास सुरक्षित असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. भारत बायोटेकनं केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि लसींना परवानगी देणाऱ्या डीसीजीआयकडे देखील सादर केले. यानंतर लसीची एक्स्पायरी डेट ९ ऐवजी १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यास नोव्हेंबर २०२१ मध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र, या व्हाएल्सवर नवी एक्स्पायरी डेट प्रिंट करण्यात न आल्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. यानंतर भारत बायोटेकनं जुनी एक्स्पायरी डेट असलेला साठा पुन्हा मागवून त्यावर नव्याने लेबल प्रिंटिंग करण्याचा निर्णय घेतला.
कशी ठरवतात एक्स्पायरी डेट?
करोनाची कोणतीही लस ही प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, अचेतन विषाणू किंवा सचेतन विषाणू यांचं मिश्रण असते. लसीची परिणामकारकता वाढावी आणि त्यातून प्रतिकारशक्ती वाढावी हा हेतू असतो. ही परिणामकारकता किती काळ टिकून राहू शकते आणि संबंधित लस कधीपर्यंत सुरक्षित राहू शकते यासाठी सर्व लसींवर एक्स्पायरी डेट टाकण्यात आलेली असते.
समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?
लसीची स्टॅबिलिटी अर्थात निश्चित कालावधीमध्ये लसीची परिणामकारकता तपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यातून लसीची शेल्फ लाईफ अर्थात एक्स्पायरी डेट ठरवली जाते. सुप्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील यांनी सांगितल्यानुसार, कोणत्याही लसीची एक्स्पायरी डेट मोजण्यासाठी ही संबंधित लस वेगवेगळ्या तापमानामध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी ठेवली जाते. कोणत्या बिंदूवर त्या लसीची गुणवत्ता खालावायला सुरुवात होते, याची नोंद घेतली जाते. ती त्या लसीची एक्स्पायरी डेट असते. जेवढ्या कालावधीसाठी संबंधित उत्पादन हे स्थिर आणि परिणामकारक ठरू शकते, तो कालावधी त्या उत्पादनाची शेल्फ लाईफ ठरतो.