भारताने अमेरिकेशी आजवर अनेक करार केले आहेत. परंतु, हे करार अमेरिकेकडून शस्त्र, लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी केले गेले. मात्र, अलीकडेच भारत-अमेरिकेत महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारानुसार अमेरिका भारताकडून स्वदेशी तोफांची खरेदी करणार आहे. अमेरिका भारताच्या अत्याधुनिक तोफेच्या प्रेमात आहे. प्रगत तोफांचा पुरवठा करण्यासाठी भारत फोर्ज समूहातील कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स (केएसएसएल) या उपकंपनीने अमेरिकेतील एएम जनरल आणि मँडस ग्रुप या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांबरोबर लेटर ऑफ इंटेंट (एलओआय)वर स्वाक्षरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संरक्षण निर्मात्याकडून अमेरिकेला पहिल्यांदाच तोफांचा पुरवठा करण्यात येणार आहे. दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अबू धाबी येथे ‘IDEX 2025’ संरक्षणविषयक प्रदर्शनात या कराराचे अनावरण करण्यात आले; ज्यामुळे जागतिक संरक्षण बाजारपेठेतील भारताची वाढती उपस्थिती आणखी मजबूत झाली. काय आहे हा करार? स्वदेशी तोफेची वैशिष्ट्ये काय? त्याविषयी जाणून घेऊ.

कराराचे महत्त्व काय?

१०५ मिलिमीटर व १५५ मिलिमीटर अत्याधुनिक कॅलिबरमध्ये माउंटेड, टोव्ड व अल्ट्रा-लाइट गन सिस्टीम तोफांसाठी मंच विकसित केला जाणार आहे. तोफांचे उत्पादन भारतात केले जाईल, ज्यामुळे देशाच्या वाढत्या संरक्षण उत्पादन क्षमतेत भर पडेल. हा दोन देशांतील धोरणात्मक भागीदारी वाढवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे; ज्याचा दीर्घकाळात दोन्ही राष्ट्रांना फायदा होईल. ‘IDEX 2025’मध्ये बोलताना, ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे ​​अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी या ऐतिहासिक कराराबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हटले, “अमेरिकेला भारतात तयार केल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण संरक्षक तोफांचा पुरवठा केला जाणार आहे. कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स तोफांचा पुरवठा करणारी पहिली भारतीय कंपनी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. थोडक्यात हा करार म्हणजे आमच्या क्षमतांचा पुरावा आहे आणि जागतिक अग्रगण्य आर्टिलरी सोल्युशन्स प्रदाता होण्याच्या आमच्या ध्येयातील एक मोठी प्रगती आहे.”

भारत-अमेरिका संरक्षण संबंधांचा विस्तार

हा करार भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात वाढत्या घनिष्ठ संबंधांवर प्रकाश टाकतो. अलीकडील द्विपक्षीय संरक्षण चर्चेनंतर हा करार संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढविण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. दोन्ही राष्ट्रे अधिक मजबूत संरक्षण संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आधुनिक युद्धविषयक आवश्यकता पूर्ण होऊ शकतील. एएम जनरलचे कार्यकारी उपाध्यक्ष जॉन चॅडबॉर्न यांनी या भागीदारीवर भाष्य करताना म्हटले, “हा लेटर ऑफ इंटेंट आमच्या दीर्घकालीन सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला विश्वास आहे की, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सची सिद्ध क्षमता, नावीन्यपूर्णतेच्या आमच्या वचनबद्धतेसह, अमेरिकी संरक्षण दलांसाठी प्रगत तोफखाना उपयुक्त ठरेल.”

ग्लोबल डिफेन्स मार्केटमध्ये ‘केएसएसएल’चा वाढता प्रभाव

केएसएसएल भारताच्या संरक्षण उद्योगातील एक अग्रगण्य खेळाडू म्हणून उदयास आली आहे. कंपनीने स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणाली, ऑफ-रोड संरक्षित मोबिलिटी सोल्युशन्स आणि उच्च-टेक लष्करी उत्पादने डिझाइन व विकसित करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. एएम जनरलबरोबरचे सहकार्य हे अनेक उपक्रमांच्या मालिकेतील कंपनीची नवी प्रगती आहे, ज्याने ‘केएसएसएल’ला जागतिक स्तरावर एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे.

‘केएसएसए’लचे यश हे संरक्षण क्षेत्रातील ‘भारत फोर्ज लिमिटेड’च्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब आहे. भारत फोर्ज ही तंत्रज्ञानावर आधारित बहुराष्ट्रीय कंपनी आहे, जी संरक्षणाव्यतिरिक्त ऑटोमोटिव्ह, पॉवर व एरोस्पेस यांसह विविध उद्योगांमध्ये नावीन्यपूर्ण उपकरणे वितरित करण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या जागतिक उत्पादनाचा ठसा आणि मेटलर्जिकल ज्ञानातील कंपनीच्या विस्तृत कौशल्यामुळे ती जगभरातील ग्राहकांना अत्याधुनिक, युद्ध-चाचणी साधने प्रदान करण्यास सक्षम झाली आहे.

वाढत्या संरक्षण उत्पादनात भारताची प्रगती

केएसएसएल आणि एएम जनरल यांच्यातील हा करार जागतिक बाजारपेठेत प्रगत शस्त्रास्त्रांचा विश्वासू पुरवठादार म्हणून भारताच्या उदयाचे स्पष्ट सूचक आहे. अमेरिका भारताकडून तोफखाना खरेदी करणार असल्याने भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. दोन्ही कंपन्यांमधील धोरणात्मक भागीदारीमुळे भविष्यातील सहकार्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा करार हेदेखील दर्शवतो की भारताचे संरक्षण उत्पादन क्षेत्र आधुनिक युद्धाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या उच्च गुणवत्तेच्या युद्धसज्ज प्रणालींचा एक विश्वासार्ह स्रोत म्हणून आपले स्थान निर्माण करीत आहे. केएसएसएल आणि एएम जनरल दोघेही त्यांच्या भागीदारीचा विस्तार करीत असल्याने हा करार महत्त्वाचा आहे. अधिक ताकदवान, अचूक लक्ष्यभेद व अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा असलेल्या तोफांच्या आवश्यकतेवर या दोन देशांतील भागीदारीच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे. १०५ मिलिमीटर व १५५ मिलिमीटर अत्याधुनिक तोफांचा संच विकसित केला जाणार आहे आणि नवीन तोफांच्या या संचात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.