– राजेंद्र येवलेकर

राजस्थानमधील भिलवाडा शहर हे सुरूवातीला करोनाचे प्रमुख ठिकाण म्हणून उदयास आले होते पण नंतर याच ठिकाणी कठोर उपाययोजना केल्यानंतर तेथे करोनाचा प्रसार कमी होऊन रूग्ण संख्याही खाली आली. आरोग्य मंत्रालयाच्या मते करोनाचे प्रमुख केंद्र असलेले ६२ जिल्हे सध्या देशात आहेत, राजस्थानातील भिलवाडा जिल्हा हा त्यातील एक होता पण आता तेथील परिस्थिती सुधारली आहे. तेथे ज्या उपाययोजना करण्यात आल्या त्याला भिलवाडा प्रारूप असे संबोधले जात आहे. हे प्रारूप नेमके काय आहे याचा शोध आता आपण घेऊ या कारण त्याचा उपयोग करून देशाच्या इतर प्रमुख करोना केंद्रांच्या ठिकाणची परिस्थिती सुधारता येईल.

करोना नियंत्रणाचे भिलवाडा प्रारूप नेमके काय आहे ?

राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यात करोनाचा प्रसार सुरूवातीला वेगाने झाला होता. त्यामुळे तो रोखण्यासाठी तेथील प्रशासनाने ज्या उपाययोजना केल्या त्याला भिलवाडा प्रारूप म्हणतात. भिलवाडा जिल्हा हा आधी करोना रूग्णांच्या संख्येत आघाडीवर होता तेथे २७४ निश्चित रूग्ण होते. हा प्रसार रोखण्यासाठी तेथील प्रशासनाने जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी जारी केली. घरोघरी जाऊन संभाव्य रूग्णांची पाहणी केली. प्रत्येक पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात आला. ते ज्यांना कुणाला भेटले त्यांची यादी तयार करण्यात आली. ३० मार्चला भिलवाडात करोनाचा प्रसार कमी होऊन केवळ एक पॉझिटिव्ह रूग्ण राहिला. आधीचे रूग्ण बरे झाले व नवीन रूग्ण वाढले नाहीत. करोनाची साथ सुरू झाली तेव्हा पहिल्या चार दिवसात रूग्णांची संख्या १३ झाली व ३० मार्चपर्यंत एकूण २६ रूग्ण अकरा दिवसात वाढले.

करोना साथीच्या सुरूवातीलाच इतके कडक उपाय कसे योजण्यात आले?

भिलवाडातील पहिला रूग्ण हा खासगी रूग्णालयातील एक डॉक्टर होता, त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर कोविड-१९ च्या या पहिल्या रूग्णानंतर रूग्णांची संख्या १९ मार्चपर्यंत वेगाने वाढली. एका खासगी रूग्णालयातून ही संख्या जास्त वाढली तेथील एक डॉक्टर, नंतर काही कर्मचारी यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. २१ मार्चला पाच तर २३ मार्चला १३ रूग्णांची नोंद झाली. २५ मार्चला आकडा १७ झाला त्यात सर्व रूग्णालय कर्मचारी व काही वेगळ्या रूग्णांचा समावेश होता. त्याच दिवशी सरकारने या खासगी रूग्णालयाच्या टप्प्यातील एक कि.मी.चा प्रदेश सीलबंद केला. २६ मार्चला भिलवाडात करोनाचा पहिला बळी गेला. त्याचा मुलगा व नात या दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर २६ मार्चला करोनाचा दुसरा बळी गेला. त्याचा मृत्यू करोनाने झाल्याचे राज्य सरकारने मान्य केले नव्हते. कारण त्याला मूत्रपिंडासह इतर आजार होते. या टप्प्यात भिलवाडा हे करोनाचे प्रमुख केंद्र बनले होते. तेथे रूग्ण वाढत चालले होते.

करोनावर नियंत्रणासाठी काय उपाय करण्यात आले?

राजस्थानचे अतिरिक्त आरोग्य मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांच्यामते भिलवाडा प्रारूपात अनेक गोष्टींचा समावेश होता. विविध उपायांची कठोर अमलबजावणी करण्यात आली. तेथे पहिला रूग्ण सापडल्यानंतर तीनच दिवसात आरोग्य खाते व जिल्हा प्रशासन यांनी ८५० पथके तयार करून घरोघरी सर्वेक्षण केले. एकूण ५६,०२५ घरांमध्ये जाऊन २८,०९३७ लोकांची माहिती घेण्यात आली. त्यात २,२५० लोकामध्ये इन्फ्लुएंझासारखी लक्षणे दिसली. त्यांना घरात वेगळे ठेवण्यात आले. त्यानंतर रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला. हिमाचल, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश व गुजरात या राज्यातून संबंधित रूग्णालयात आलेल्या ४९८ लोकांची यादी २२ मार्चला तयार करण्यात आली. २६ मार्चला एकूण ६,४४५ संशयितांची यादी तयार करून त्यांना वेगळे काढण्यात आले. अधिकृत कागदपत्रानुसार पुढील पाच दिवस म्हणजे २२ ते २७ मार्च दरम्यान ४.३५ लाख घरांना भेट देऊन २२ लाख लोकांची माहिती घेण्यात आली. भिलवाडाची लोकसंख्या तीस लाख आहे म्हणजे बऱ्याच लोकांची माहिती गोळा करण्यात यश आले. ज्या लोकांना घरात वेगळे ठेवण्यात आले, त्यांच्यावर जिऑग्राफिकल इनफॉर्मेशन सिस्टिमच्या माध्यमातून देखरेख करण्यात आली. जिल्ह्यात पूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी त्याची कठोर अमलबजावणी केली. त्यानंतर ३० मार्चला रूग्ण संख्या कमी झाली. तरीही सगळ्या जिल्ह्याची नाकेबंदी करण्यात आली. रूग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन व टॅमीफ्लू तसेच एचआयव्ही औषधांचा वापर करण्यात आला. त्यानंतर तीन एप्रिल रोजी १७ रूग्ण बरे झाले. तीन एप्रिलपासून आणखी कठोर संचारबंदी लागू करण्यात आली. ३१ मार्चपासूनच्या आठवड्यात केवळ एक रूग्ण आढळून आला. त्यामुळे एकूण रूग्ण संख्या २७ झाली.

हे सगळे उपाय करताना कोणती आव्हाने होती?

सुरूवातीच्या काळात निर्बंधांचे उल्लंघन करण्यात येत होते. नंतर त्यावर मात करण्यात आली. खासगी रूग्णालयातील डॉक्टर्सची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले. रूग्ण व कर्मचारी यांना लागण झाली होती. यात काही रूग्ण हे परराज्यातून आलेले होते. त्यामुळे रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. घरोघरी पाहणी करणारे डॉक्टर्स, परिचारिका यांना एकत्र जमवून त्यांनी आणलेल्या माहितीचे संकलन व वर्गीकरण महत्वाचे होते. २२ लाख घरांची पाहणी काही दिवसात करणे मोठे आव्हान होते. एकदा पाहणी करून भागले नाही, तर काही दिवसांनी त्याच घरांमध्ये पुन्हा जाऊन माहिती घेण्यात आली. भिलवाडा हे कापड उद्योगाचे शहर आहे. तेथील लोकसंख्या ३० लाख एवढी आहे, तरीही तेथे सर्व भागात सारख्याच कठोरतेने संचारबंदीची अमलबजावणी करण्याचेही मुख्य आव्हान होते.

Story img Loader