भीमा कोरेगाव येथे लढली गेलेली लढाई ही अनेक अर्थांनी इतिहासातील महत्त्वाची घटना मानली जाते. भारतीय इतिहासातील जातीवाद, ईस्ट इंडिया कंपनीची वसाहतवादी भूमिका यांसारख्या अनेक बाबी एकाच वेळी या लढाईत प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा- कोरेगाव येथे असलेल्या जयस्तंभाला अनेक वेळा भेट दिली होती, तसेच १९४१ मध्ये सिन्नर येथील भाषणात महारांनी कोरेगाव येथे पेशव्यांचा पराभव केल्याचेही नमूद केले होते. इंग्रजांनीही विजयाचा दावा केला आणि याचे वर्णन एक अभिमानास्पद विजय असे केले, आजतागायत या युद्धाची परिणती कायम आहे, तरीही काही मराठाकालीन अभ्यासक पेशव्यांचे सैन्य विजयी झाले असे नमूद करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: १३ डिसेंबर संसदेतील घुसखोरी : ‘ते’ दोघे संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे भेदू शकले?

या लढाईचा मुख्य उल्लेख ‘द पूना डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’मध्ये करण्यात आलेला आहे. हे गॅझेटियर मुख्यतः बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियर्सच्या मालिकेचा एक भाग होते, जे १८८५ साली जेम्स एम कॅम्पबेल यांनी संपादित केले. त्यामुळे या युद्धाविषयी सखोल माहिती समजण्यास मदत होते. या गॅझेटियरमधील संदर्भानुसार, तत्कालीन भीमा- कोरेगाव येथील लोकसंख्या केवळ ९६० इतकी होती. या ठिकाणी झालेल्या लढाईत १ जानेवारी १८१८ रोजी ८०० सैनिकांच्या ब्रिटिश सैन्याने ३०,००० मराठ्यांच्या फौजेचा सामना केला. या घटनेच्या सहा महिन्यापूर्वी पेशवा बाजीराव दूसरा याला १३ जून १८१७ रोजी इंग्रजांकडून हार पत्करावी लागली होती. याचीच परिणती म्हणून मोठा भू-भाग इंग्रजाना द्यावा लागला होता. या भू-भागावरील मराठ्यांची सत्ता कायद्याने नष्ट झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पेशव्यांच्या सैन्याने पुण्यातील ब्रिटिश रहिवाशांविरुद्ध उठाव केला, परंतु खडकीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. पुणे हे कर्नल चार्ल्स बार्टन बूर याच्या अधिपत्याखाली आले. डिसेंबरच्या शेवटी चार्ल्स बार्टन बूर याला बाजीराव पुण्यावर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यामुळे त्याने सरकारकडे मदतीची विनंती केली होती.

युद्ध झाले तो दिवस

कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली सुसज्ज फलटण (५०० रँक आणि फाइलच्या पहिल्या रेजिमेंटच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रंट्रीची दुसरी बटालियन, ३०० घोडे आणि २४ युरोपियन मद्रास तोफखान्याच्या दोन सहा-पाउंड तोफांसह) ३१ डिसेंबर १७१८ रोजी रात्री ८ वाजता सिरूरहून पुण्यासाठी निघाली. तर दुसरीकडे २५ मैल कूच करून, दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास, पेशव्यांचे २५,००० घोड्यांचे सैन्य भीमा नदीच्या पलीकडे आले. गॅझेटमध्ये स्टॉन्टनच्या सैन्यातील भारतीय सैनिकांच्या जातीचा उल्लेख नाही, परंतु नंतरच्या नोंदीनुसार त्यात मोठ्या संख्येने महार होते.

अधिक वाचा: Victory Day 1971: …अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?

इंग्रजांच्या विरुद्ध मराठ्यांनी ५,००० सैन्य बोलावले होते, अशी गॅझेटियरमध्ये नोंद आहे. अरब, गोसावी आणि नियमित सैन्य अशी मराठा सैन्याची विभागणी होती. युद्धाच्या सुरुवातीस या सैन्याने ब्रिटिशांची रसद कापली. आणि एका तोफेवर कब्जा मिळविण्यात यशही मिळविले होते. हे सर्व दृश्य पाहून बरेच ब्रिटिश सैनिक घाबरले आणि त्यांनी शरणागती पत्करली. परंतु सहा फूट सात इंचाच्या लेफ्टनन पॅटीसन याने सैन्याची कमान हातात घेवून गमावलेला तोफगोळा परत मिळविला. त्याच्या पराक्रमामुळे याच दिवशी रात्रीपर्यन्त मराठ्यांना माघार घ्यावी लागली. ब्रिटीशांना प्यायला पाणी मिळाले आणि रात्री ९ वाजेपर्यंत मराठा पूर्णपणे माघारी गेले. इंग्रजांच्या नोंदीनुसार ८३४ इंग्रज सैन्यांपैकी २७५ सैनिक मारले गेले. काही जखमी झाले तर काही हरवले. मराठ्यांचे ५०० सैनिक मारले गेले, तर काही जखमी झाले. त्यामुळे मराठ्यांची पकड कमकुवत झाली आणि इंग्रजांचा विजय झाला. तर बाजीराव दुसरा याने पलायन केले, त्यानंतर १८२३ साली त्याने शरणागती पत्करली. ब्रिटिशांनी बाजीराव दूसरा याला मृत्यूपर्यन्त बिठूर येथे ठेवले. नानासाहेब पेशवे हे त्याचे शेवटचे उत्तराधिकारी होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhima koregaon what exactly happened on this day in 1818 what does the gazetteer say svs
Show comments