सुहास सरदेशमुख
जी-२० समूह देशातील प्रतिनिधींची औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना बिदरी कलेचा नमुना असणाऱ्या वस्तू आणि हिमरु शाल दिली जाणार आहेत. ऐतिहासिक वारसा असणारी बिदरी कला आणि हिमरु वीणकाम या दोन्ही क्षेत्रातील कारागिरांना खरेच लाभ होऊ शकेल?
बिदरी कला म्हणजे काय?
जस्त आणि तांबे या धातूंच्या मिश्रणावर चांदीच्या तारेने ठोकून सुबक नक्षीकाम करण्याची कला म्हणजे बिदरी. एक किलो जस्त आणि ५० ते ६० ग्रॅम तांब्याची तार वितळवून त्याची मूस तयार केली जाते. जस्त धातूपेक्षा तांब्याचा उत्कलांक अधिक असतो. त्यामुळे या दोन धातूंचे मिश्रण करताना आधी तांबे वितळवून घ्यावे लागते. कारण तसे केले नाही तर जस्त करपून काळे पडण्याची शक्यता जास्त असते. हे मिश्रण म्हणजे मूस वेगवेगळ्या वस्तूंच्या साच्यामध्ये टाकली जाते. मग त्यातून कधी पद्मपाणीची मूर्ती तयार होते तर कधी पिसारा फुलवणारा मोर असतो. ऐरावत तर ऐतिहासिक कालखंडातही वैभवाचे प्रतीक मानले गेलेले. त्यामुळे वेगवेगळ्या रूपांतील हत्तींच्या मूर्ती आणि त्याच्यावरची चांदीच्या तारेची झूल कोणालाही भुरळ पाडू शकतील एवढ्या त्या सुंदर आहेत.
बिदरीच्या वस्तू दिसतात कशा?
बिदरीच्या वस्तू काळ्या रंगात असतात. त्यावरील सारे नक्षीकाम चांदी, तांबे, पितळ या धातू तारांच्या आधारे कोरलेले असते. हे नक्षीकाम कमालीचे किचकट असते. जस्त व तांबे वितळून साच्यात टाकलेल्या वस्तूंना घासून स्वच्छ केले जाते. या वस्तूंना मग मोरचूद लावले जाते. त्याला ‘निळा’देखील म्हणतात. मग या वस्तूंवर चांदीच्या तारेने बारीक नक्षीकाम कोरले जाते. नक्षीकाम करण्यासाठी लागणारी नजाकत बिदरी कलाकारामध्ये असावीच लागते. त्यानंतर या वस्तूंना एका ठराविक मातीच्या मिश्रणातून बाहेर काढले जाते. तेव्हा काळ्या रंगावर ठाशीव चांदीच्या तारा अधिक स्पष्ट दिसू लागतात. धातूच्या वस्तूंना मातीचा मुलामा दिला जातो. पण मातीची निवड या कलेचा खरा आत्मा आहे. साधारणत: ५०० ते ६०० वर्षे जुनी माती यासाठी वापरली जाते. या मातीला थोडीशी खारट चव असते, असे बिदरीची कलाकुसर करणारे विजय मधुकर गवई सांगतात. या दोन धातूंच्या आणि काळ्या मातींच्या मिश्रणातून तयार झालेली मूर्ती किंवा वस्तू अप्रतिम असते.
या कलेचे मूळ स्रोत कोठे ?
बिदरी नक्षीकामाचे मूळ स्थान सीरिया देशातील असल्याचे पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञ सांगतात. दमास्कसमध्ये ही कला होती. साधारणत: तेराव्या शतकात ही कला बहरात होती. मोगल राजांबरोबर ती कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात तेथून औरंगाबाद आणि हैदराबाद या दोन ठिकाणी पसरली. जर्मनीमधील नायलीन पिंटो या ख्रिश्चन धर्मप्रसारक महिलेने औरंगाबादमधील गवळी कुटुंबीयांनी ही कला शिकावी, असा आग्रह धरला होता. बिदरमध्ये शिकवणी लावून हे काम त्यांनी करवून घेतले आणि काही मोजकीच मंडळी आता या क्षेत्रात काम करत आहेत. त्यात विजय मधुकर गवई आणि मुकेश मधुकर गवई आणि त्यांचे कुटुंबीय काम करतात.
कला जोपासण्यासाठी पर्यटन विभागाचे प्रयत्न पुरेसे आहेत का?
अद्वितीय नक्षीकामाचा हा नमुना जगभर जावा आणि त्याची प्रसिद्धी व्हावी म्हणून बिदरी कलेला आता प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अडचण अशी की, केवळ दोन किंवा चार कलाकारांवर हे काम पुढे कसे जाणार? पर्यटनाच्या पातळीवर अशा कलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्याचे प्रशिक्षण वर्ग घेणे आवश्यक आहे. पण तशी व्यवस्थाच केली जात नाही. परिणामी एकांडा शिलेदार आपली लढाई लढत राहतो. जगभरात जी कला पोहचावी म्हणून बिदरी कलाकुसर असणाऱ्या वस्तू परदेशी पाहुण्यांना भेट दिल्या जात आहेत. त्या वस्तू तयार करणारे कलाकार वाढावेत, ती कला जोपासणाऱ्यांना फारसे प्रोत्साहन मिळत नाही. केवळ बिदरी कलाकुसरीच्या वस्तूंनाच हे लागू पडते असे नाही. तर हिमरु वीणकाम करणाऱ्यांची स्थितीही फारशी वेगळी नाही.
हिमरु म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय?
औरंगाबादची हिमरु शाल प्रसिद्ध आहे. ‘हम- रुह’ या शब्दापासून हिमरु असा शब्द तयार झाला. मोहम्मद तुघलकाने जेव्हा दिल्ली येथील राजधानी हलवली तेव्हा विविध क्षेत्रातील मंडळी औरंगाबादच्या परिसरात आली. त्यात वीणकरही होते. त्या काळातील वीण अजूनही बांधून ठेवली आहे, इम्रान कुरेशी यांनी. कमखॉब आणि मिश्रू या दोन पद्धतीची हातमागावरची वीण कमालीची सुरेख आहे. यामध्ये अहमद सईद कुरेशी आणि त्यांचा मुलगा इम्रान कुरेशी यांनी अजिंठा लेणीतील कमळ, वेलबुट्टीतील मोर असे नवनवे डिझाईन आणले. पूर्वी हातमागातील मलमल, वेलवेटचा धागा गेल्यानंतर त्याच्यासारखाच पण खुलून दिसणारी हातमागावरची शाल श्रीमंत मंडळी वापरत. आता हातमागाऐवजी यंत्रमागावर बनविलेली शालच हिमरु आहे, असे सांगून त्याची बाजारपेठच वाढविली जात आहे. त्यामुळे हिमरु वीणकाम करणारे आणि त्याची बाजारपेठ विकसित व्हावी म्हणून प्रयत्न करणारे मागच्या बाकावर आहेत. सरकारही वीणकर वाढवून हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन प्रशिक्षणाचे कार्यक्रम हाती घेत नाही. त्यामुळे परदेशी पाहुण्यांना हिमरु देऊन वीणकरांच्या आयुष्यात काही एक बदल होणार नाहीत, आहे ती वीण उसवलेली स्थिती मागील पानावरून पुढे चालू राहील, असा दावा या क्षेत्रात काम करणारे सांगतात.
हिमरु शाल आणि औरंगाबादचे नाते कधीपासूनचे?
अजिंठा, वेरुळ लेणीतील नक्षीकाम हिमरुमध्ये करता यावे म्हणून हातमागावर एक नकाशा तयार करावा लागतो. हा नकाशा म्हणजे आडव्या – उभ्या धाग्यांचे एक प्रकारचे जाळे असते. तो ताना- बाना ज्यांना जमला त्यांना वीणकाम करता येते. हिमरुचे वीणकाम करणारे कलाकार आता ६० पार केलेले आहेत. काही मोजक्याच व्यक्तींना हातमागावर हे काम करता येते. पण हातमागावरची एक शाल खरेदी करायची म्हटले तरी पाच हजार रुपये तरी लागतात. फक्त हिमरु शाल हे एकमेव उत्पादन नाही तर शेरवानीवरही वीणकाम करता येते. मुगल-ए-आझम’मधील दिलीप कुमार यांच्या अंगावरील शेरवानीचे नक्षीकाम हिमरु वीणकरांनी केले होते. पण हे कामही कमालीचे किचकट आणि खूप वेळ खाणारे असल्याने या क्षेत्रातही प्रशिक्षण देणारे आणि घेणारे कमी आहेत.
ही कलाकुसर खरेच जी- २० समूह देशात जाईल?
‘स्कोडा’ चारचाकी गाडीचा लोगो बिदरी कलाकुसरीत काही वर्षांपूर्वी करून घेण्यात आला होता. कंपनीने त्यांच्याकडे पाहुण्यांना बिदरी कलाकुसर असणारे कंपनीचे बोधचिन्ह दिले होते. पण ही प्रक्रिया अनेक देशांमध्ये अनेक कंपन्याना उपयोगी पडू शकते. अनेक देशातील विदेशी राजदूतांना ही कला आवडू शकते. पण असे काम औरंगाबादमध्ये करता येऊ शकेल याची माहिती या पाहुण्यांपर्यंत द्यावी लागेल. सर्वसाधारणपणे भेटवस्तू दिली की औपचारिक साेपस्कार पार पाडण्यापुरते या भेटवस्तूचे महत्त्व नाही तर त्याची बाजारपेठ उभी रहावी यासाठी तसे येणाऱ्या पाहुण्यांना सांगावे लागणार आहे. अन्यथा मोठे लोक येतात, भेटवस्तू घेतात आणि निघून जातात. हा प्रघात मोडण्यासाठी अधिक चांगल्या संवादाची गरज आहे. तो पर्यटन विभागाकडून होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
suhas.sardeshmukh@expressindia.com