अमेरिकेच्या अध्यक्षपदाची खडतर निवडणूक विद्यमान अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी लढवूच नये, असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दोन आठवड्यांपूर्वी रिपब्लिकन उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झालेल्या वादचर्चेमध्ये बायडेन अडखळले आणि चांगले मुद्देही त्यांना नीट मांडता आले नाहीत. याउलट ट्रम्प यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर खोट्या बाबीही रेटून मांडल्या. त्यामुळे थेट निवडणुकीतही बायडेन यांचा निभाव लागणार नाही, अशी भीती काही डेमोक्रॅटिक नेते आणि अनेक डेमोक्रॅटिक हितचिंतक, देणगीदारांना वाटते.
देणगीदार विरोधात…
जगातील इतर निवडणुकांप्रमाणेच अमेरिकी निवडणुकाही पैशावर चालवल्या जातात. अमेरिकी राजकीय संस्कृतीमध्ये जाहीर निधी मदतीचे महत्त्व मोठे आहे. बायडेन फियास्कोनंतर डिस्नी समूहाच्या वारस अबिगेल डिस्नी यांनी डेमोक्रॅट पक्षाची मदत, विशेषतः बायडेन यांच्या प्रचारासाठीची मदत रोखून धरण्याची घोषणा केली. बायडेन लढले, तर हरतील असे अबिगेल डिस्नी यांनी थेटच सांगितले. वॉल स्ट्रीटवरील अनेक प्रभावशाली बँकर्स, फंड मॅनेजर्स, सीईओ हे सध्या परस्परांशी डेमोक्रॅटिक पक्षाच्या निधीबाबत चर्चा करू लागले आहेत. ब्लॅक रॉक या फंड कंपनीचे लॅरी फिंक, ब्लॅक स्टोनचे जॉन ग्रे, लाझार्डचे पीटर ऑर्सझॅग, सेंटरव्ह्यू पार्टनर्सचे ब्लेयर एफ्रन अशी काहींची नावे सांगितली जातात. अनेक माध्यम कंपनी चालकांनी, प्रभावी व्यक्तींनी बायडेन यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. यात प्रसिद्ध अभिनेता-निर्माता जॉर्ज क्लूनी, नेटफ्लिक्सचे रीड हेस्टिंग्ज, आयएसीचे बॅरी डिलर, हॉलिवुड दिग्दर्शक रॉब रायनर, पटकथा लेखक डॅमन लिंडेलॉफ यांचा समावेश आहे. काही देणगीदारांच्या मते बायडेन यांची माघार निश्चित आहे. यासाठी काही काळ वाट पाहण्याची त्यांची तयारी आहे.
हेही वाचा…माणसांपेक्षा अस्वलेच जास्त! जपानमध्ये अस्वलांच्या हल्ल्याबाबत केले जाणारे उपाय चर्चेत का?
पक्षांतर्गत विरोध…
नॅन्सी पलोसी या डेमोक्रॅटिक पक्षाच्या जुन्या-जाणत्या प्रतिनिधींनी बायडेन यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. त्या बायडेन यांच्या समर्थक मानल्या जातात, त्यामुळे त्यांच्या या विधानाच संदिग्धता दिसून येते. किमान डझनभर डेमोक्रॅटिक नेत्यांनी बायडेन निवडणूक लढवणार असल्यास आपला पाठिंबा नसेल असे जाहीर केले आहे. यांतील बहुतेकांनी नुकत्याच एका बंद खोलीतील बैठकीत आपले मते स्पष्टपणे मांडली. मात्र अशा नेत्यांची संख्या आणि पक्षातील महत्त्व फार मोठे नाही. या नेत्यांमध्ये काही प्रतिनिधी, सिनेटर, गव्हर्नर आहेत. तरीदेखील जाहीरपणे बायडेन यांच्या उमेदवारीला विरोध करणारा एकही प्रमुख डेमोक्रॅट नेता अद्याप दाखवता येणार नाही. बायडेन यांनीही नंतरच्या काही दिवसांमध्ये व्यक्तिगत संपर्क, काही मुलाखती आणि भाषणांतून आपण सर्व आव्हाने पेलण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. पक्षांतर्गत विरोध मावळू लागला असला, तरी कुजबूज मात्र सुरू आहे.
कमला हॅरिस यांच्या नावाची चाचपणी…
कमला हॅरिस यांच्याकडे बायडेन यांच्या ऐवजी उमेदवारी सोपवावी असे म्हणणारेही डेमोक्रॅटिक पक्षात वाढू लागलेत. याबाबत त्यांच्या उमेदवारीविषयी पक्षांतर्गत चाचपणी सुरू झाल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे. कमला हॅरिस या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे खुद्द बायडेन यांनी म्हटले आहे. मात्र देणगीदार हॅरिस या नावाविषयी फारसे उत्सुक नाहीत. ऑगस्टमधील मेळाव्यात दुसरे एखादे नाव निश्चित करावे, असे देणगीदारांना वाटते.
हेही वाचा…जामीन मिळवायचा असल्यास पोलिसांना गुगल लोकेशन द्यावं लागणार का? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय?
बायडेन उमेदवारीवर ठाम…
अटलांटातील फसलेल्या वादचर्चेनंतर बायडेन यांनी प्रत्येक मुलाखतीत आणि जाहीर सभेत आपल्या तब्येतीविषयी आणि आत्मनियंत्रणाविषयी हितचिंतक, पाठीराखे, पक्ष सहकारी, देणगीदारांना आश्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला आहे. त्यांची भाषणे बऱ्यापैकी प्रभावी ठरत आहेत. आपल्यातील त्रुटींविषयी बोलण्याऐवजी ट्रम्प यांचे निवडून येणे लोकशाहीसाठी कसे धोकादायक आहे आणि त्यासाठीच आपण निवडणूक लढवणे कसे अत्यावश्यक आहे, असे बायडेन सांगत आहेत. नुकत्याच नाटो परिषदेनंतरच्या पत्रपरिषदेत बायडेन यांनी हॅरिस यांच्याऐवजी ट्रम्प असा शब्द उच्चारला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना त्यांनी चुकून पुतिन असे संबोधले. या चुका होतच आहेत, पण बायडेन त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्याची दखल घेऊन, या टप्प्यावर बायडेन यांना माघार घ्यायला लावण्याऐवजी ऑगस्टपर्यंत वाट पाहावी, तेथे सर्वानुमते एखादा उमेदवार निवडला जावा, या पर्यायावरही चर्चा सुरू झाली आहे.