विरोधकांच्या आघाडीसाठी पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घेतले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र आघाडीचे साधे निमंत्रकपदही त्यांना देण्यात आले नाही. उलट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे केले. यातून नितीश कुमार अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. त्यातच नितीश यांच्या संयुक्त जनता दलात अनेक घडामोडी झाल्या. पक्षाध्यक्ष ललन सिंह यांनी राजीनामा दिल्याने संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा नितीश यांच्याकडे आली. आता नितीश कुमार यांची रणनीती काय असेल याची चर्चा सुरू झाली. गेल्या दोन दशकांत नितीश यांनी कधी भाजपला तर कधी, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला साथ दिली. त्यामुळेच नितीश पुन्हा भाजपकडे जातील काय, असा प्रश्न विचारला जात आहे. अर्थात पक्षाने त्याला स्पष्ट नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ललन सिंह यांची कोंडी

बिहारमधील मुंगेरचे खासदार असलेले ललन सिंह गेल्या चार दशकांपासून नितीश कुमार यांचे सहकारी आहेत. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने ते भाजपवर नाराज असल्याचे बोलले जाते. ललन सिंह भूमिहार समाजातून येतात. भाजपकडून केंद्रात मंत्री असलेले गिरीराज सिंह हे भूमिहार आहेत. त्यामुळे भाजपने त्यावेळी संयुक्त जनता दलात असलेल्या आर. सी. पी. सिंह यांच्या नावाचा आग्रह धरला. आर. सी. पी हे इतर मागासवर्गीय समाजातील आहेत. पुढे ते भाजपच्या अधिक जवळ गेल्यावर नितीश त्यांच्यावर नाराज झाले. त्यातून पुन्हा राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले नसल्याने त्यांचे मंत्रीपद गेले. पुढे आरसीपी पक्षातून बाहेर पडले. ते आता भाजपमध्ये आहेत. त्याच प्रमाणे ललन सिंह यांची राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाशी जवळीक वाढल्याने नितीश हे नाराज असल्याची चर्चा होती. नितीश हे नाराज झाल्यावर पक्षातील संबंधित व्यक्तीचे महत्त्व कमी करतात. हे अगदी शरद यादव यांच्यापासून ते उपेंद्र कुशवाह, प्रशांत किशोर ते ललन सिंह यांच्यापर्यंतच्या उदाहरणावरून दिसते. ललन यांना लोकसभा निवडणूक पुन्हा लढवायची असल्याने पक्षाध्यक्षपद सोडल्याचे संयुक्त जनता दलाने स्पष्ट केले.

पक्षातील नेत्यांची चिंता

बिहारच्या राजकारणात ७२ वर्षीय नितीश कुमार प्रभाव कमी होत असल्याचे २०२० च्या विधानसभा निवडणुकीत दिसले. त्यांचा संयुक्त जनता दल थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. राष्ट्रीय जनता दल व भाजप हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिले. गेल्या म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी आघाडी करून संयुक्त जनता दलाचे १६ खासदार निवडून आले. दोन जागांवरून पक्षाची ही मोठी झेप होती. मात्र आता भाजपशी आघाडी तुटल्यावर किती जागा येतील याची चिंता पक्षाच्या नेत्यांना आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपशी आघाडीमुळेच इतक्या जागा मिळाल्या हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रमुख चेहरा आहेत.

हेही वाचा… विश्लेषण: वरळी, कुर्ल्यासह मुंबईत लवकरच तीन ‘मिनी-बीकेसी’? काय आहे प्रकल्प?

विरोधी आघाडीत जरी मुस्लीम-यादव या समीकरणामुळे लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल प्रभावी असला तरी त्याला तोंड देण्यासाठी भाजपनेही प्रभावी जातीय समीकरण आखले आहे. त्यामुळेच पक्षाचे पूर्वीचे १६ खासदार निवडून येतील याची जनता दलाच्या नेत्यांना खात्री नाही. यातूनच पक्षात चलबिचल आहे. जनता दलातील काही नेत्यांना पुन्हा भाजपबरोबर जावे असे वाटते. तर एक गट राष्ट्रीय जनता दलाबरोबर जावे या मताचा दिसतो. अर्थात जनता म्हणजे सबकुछ नितीश कुमार हेच आहेत. आता नितीश पक्षाध्यक्ष झाल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात येणार काय, हा मुद्दा आहे.

लोकसभा निकालावर बिहारच्या राजकारणाची दिशा

नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपद सोडून ते तेजस्वी यादव यांच्याकडे धुरा सोपवणार काय, याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना पुत्राला मुख्यमंत्री करायचे आहे. मात्र तूर्तास नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची शक्यता कमी दिसते. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहूनच नितीश कुमार पुढील निर्णय घेतील. नितीश कुमार यांच्या पक्षाच्या सध्याच्या १६ खासदारांपैकी किमान दोन ते तीन जण भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. अर्थात नितीश कुमार वेळोवेळी भूमिका बदलतात. घटनाक्रमाचा विचार करता १९९८ मध्ये नितीश कुमार हे पहिल्यांदा भाजपबरोबर गेले. त्यानंतर कधी विरोधी गोटात तर कधी भाजपबरोबर असा त्यांचा प्रवास आहे. यामुळेच नितीश पुन्हा भाजपबरोबर जाणार काय, याची चर्चा सुरू आहे. काही भाजप नेत्यांनी आता नितीश यांना भाजपचे दरवाजे बंद असल्याचे जाहीर केले. मात्र राजकारणात काही अशक्य नसते. लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजप बिहारमधील ४० जागांपैकी किमान तीस जागा लढेल असे आजचे चित्र दिसते. उर्वरित जागा लोकजनशक्तीचे दोन गट, मांझी तसेच कुशवाह यांच्या पक्षात दहा जागा वाटल्या जातील असा अंदाज वर्तवला जातोय. इंडिया आघाडीतून संयुक्त जनता दलाला गेल्या वेळी इतक्या लढलेल्या १७ जागा मिळतील काय हा मुद्दा आहे. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस तसेच डावे पक्ष कमी जागांवर समाधान मानतील हे शक्य नाही. त्यामुळे इंडियासाठी जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरेल. हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपसाठी बिहार हा अडचणीचा आहे. आता संयुक्त जनता दलामधील घडामोडी पाहता नितीश कुमार यांच्या खेळीकडे दोन्ही आघाड्यांचे लक्ष असेल.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar chief minister nitish kumar upset due to not given the prime ministers post janata dal party president to be active in india alliance print exp dvr
First published on: 30-12-2023 at 08:26 IST