संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) प्रमुख नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याची भाषा करायचे. मात्र आता याच नितीश कुमार यांनी भाजपाशी युती करत एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचे गेल्या दहा वर्षांतील राजकारण कसे राहिलेले आहे? हे जाणून घेऊ या…
आधी एकमेकांना विरोध, आता एकत्र
काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे भाजपावर टोकाची टीका करायचे. केंद्रतील मोदींना कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून खाली खेचायला हवे, असे नितीश कुमार सांगायचे. तर दुसरीकडे नितीश कुमार यांची एनडीए आघाडीत येण्याची सर्व दारे बंद झाली आहेत, असे बिहारमधील भाजपाच्या नेत्यांकडून सांगितले जायचे. मात्र आता भाजपाने नितीश कुमार यांचे एनडीएत स्वागत केले आहे. तर नितीश कुमार यांनीदेखील एनडीए आघाडीची वाहवा केली आहे.
हेही वाचा >> आधी सडकून टीका, आता थेट नितीश कुमारांसह सत्तेत सहभागी? बिहाचे नवे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी कोण आहेत?
१९९६ साली पहिल्यांदा एनडीएत जाण्याचा निर्णय
नितीश कुमार यांनी राजकीय सोय पाहून कधी एनडीए तर कधी यूपीएत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. १९७४-७५ च्या जेपी आंदोलनानंतर नितीश कुमार राजकीय पटलावर नावारुपाला आले. त्यांनी राजकारणातील सुरुवातीचा काही काळ राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या सावलीत घालवला. पुढे १९९४ साली त्यांनी फर्नांडिस यांना सोबत घेत समता पार्टीची स्थापना केली. काही काळानंतर एनडीएशी हातमिळवणी केल्यास ते राजकीय फायद्याचे ठरेल, हे नितीश कुमार यांच्या लक्षात आले. त्यानंतर २००० साली एनडीएच्या पाठिंब्यावर ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदाचा त्यांचा हा कार्यकाळ अवघ्या सात दिवसांचा होता.
रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा
एनडीएप्रणित वाजपेयी सरकारमध्ये नितीश कुमार हे रेल्वेमंत्री होते. मात्र २ ऑगस्ट १९९९ मध्ये पश्चिम बंगालमधील गैसाल येथे दोन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळल्या. यात एकूण २८५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांनी आपल्या रेल्वेमंत्रिपदाचा काळ चांगलाच गाजवला. रेल्वमंत्री असताना त्यांनी तत्काळ रेल्वे तिकीट मिळण्याची सुविधा सुरू केली. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोयदेखील त्यांच्याच कार्यकाळात चालू झाली. रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच वर्षी त्यांना केंद्रात कृषीमंत्रिपद देण्यात आले आणि २००१ साली पुन्हा एकदा त्यांच्याकडे रेल्वेमंत्रिपदाचा कारभार सोपवण्यात आला.
हेही वाचा >> बिहार : सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यामागे भाजपाची रणनीती काय? वाचा…
…अन् एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएने नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करत नितीश कुमार यांनी तेव्हा एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. स्वच्छ आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमा असलेला नेताच पंतप्रधानपदाचा उमेदवार हवा, अशी भूमिका त्यांनी तेव्हा घेतली होती.
निवडणुकीतील अपयशानंतर राजीनामा
नितीश कुमार यांनी २०४ सालची लोकसबा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली. मात्र या निवडणुकीत जदयूला अपयश आले. जदयूच्या खासदारांची संख्या या निवडणुकीमुळे २० वरून थेट दोनवर आली. याच खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नितीश कुमार यांच्यानंतर जीतन राम मांझी यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. काही महिन्यानंतर मांझी यांना या पदावरून पायऊतार होण्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांनी राजीनामा देण्यास विरोध केल्यामुळे त्यांची जदयूतून हकालपट्टी करण्यात आली. मांझी यांची हकालपट्टी करून नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले.
हेही वाचा >> नितीश कुमार यांना भाजपाचा पाठिंबा, राज्यपालांकडे पत्र सादर, जाणून घ्या सत्तास्थापनेचं गणित!
मुलगा राजकारणापासून दूर
नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे राजकारणापासून दूर आहेत. हेच उदाहरण देऊन नितीश कुमार राजकारणातील घराणेशाहीविरोधात बोलत असतात. बिहारच्या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०२१ रोजी काही माहिती अपलोड करण्यात आली होती. या माहितीनुसार नितीश कुमार यांच्याकडे एकूण २९ हजार ३८५ रोख तर बँकेत ४२ हजार ७६३ रुपये आहेत. तर निशांत यांच्याकडे १६ हजार ५४९ रोख तर फिक्स डिपॉझिट म्हणून वेगवेगळ्या बँकेत १.२८ कोटी रुपये आहेत. नितीश कुमार यांच्याकडे १६.५१ लाख रुपयांची जंगम तर ५८.८५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता होती. निशांत कुमार यांच्याकडे १.६१ कोटींची जंगम तर १.९८ कोटींची स्थावर मालमत्ता होती.
नितीश कुमार सर्वांनाच का हवे असतात?
नितीश कुमार यांनी आतापर्यंत अनेकाशी हातमिळवणी करत बिहारमध्ये सरकारची स्थापना केलेली आहे. कधी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करत एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर कधी महाआघाडीच्या रुपात काँग्रेस, डावे पक्ष आणि राजदशी युती केलेली आहे. नितीश कुमार राजकीय हितासाठी कधी काय निर्णय घेतील, हे सांगता येत नाही. तरीदेखील ते सर्वांनाच हवे असतात. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांना सामाजिक दृष्टीकोनातून मोठा आधार आहे. तसेच ते बिहारमध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र सुशासन आणि राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे राजदला नितीश कुमार हवे असतात. बिहारमधील मागास समाजातील मतदार नितीश कुमार यांच्या मागे असतात. त्यामुळेदेखील ते सर्वांनाच हवेहवेसे आहेत.
हेही वाचा >>> बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय?
९ वेळा मुख्यमंत्री, पण कार्यकाळ कमी
नितीश कुमार यांनी नुकतेच नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नऊ वेळा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळालेला असला तरी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ हा इतर राज्यांतील काही नेत्यांच्या तुलनेत कमी आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास सिक्कीममध्ये पवन कुमार चामलिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ २४ वर्षे आहे. ओडिशात नवीन पटनाईक यांचा कार्यकाळ २३ वर्षे आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसू हे एकूण २३ वर्षे मुख्यमंत्री होते. नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ हा १७ वर्षे आहे.