हृषिकेश देशपांडे
‘अंत भला तो सब भला’ असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री ७१ वर्षीय नितीशकुमार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचार संपत आला असताना काढले होते. त्यांची ही शेवटची निवडणूक असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. अर्थात नितीश यांच्या संयुक्त जनता दलाने त्यांच्या निवृत्तीचे वृत्त फेटाळले होते. त्यावेळची राजकीय स्थिती वेगळी होती. विधानसभा निवडणुकीत कमालीची चुरस होती. सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले होते. नितीश तेव्हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत होते. तर आता ते राष्ट्रीय जनता दलाबरोबर आहेत. पुढील निवडणूक (२०२५) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असे नितीश यांनी स्पष्ट करत पुन्हा एकदा सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचे सूतोवाच केले आहे. अर्थात नितीश यांच्या मनात नेमके काय आहे? सहानुभूतीसाठी हे वक्तव्य आहे की पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जाण्यासाठी त्यांची खटपट सुरू आहे याबाबत आडाखे बांधले जात आहेत.
सातत्याने बदलती भूमिका…
नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल हा कमकुवत झाल्याचे बिहारच्या निकालातून दिसले. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. राजद पहिल्या तर भाजप दुसऱ्या स्थानी होते. नितीशकुमारही गेल्या वीस वर्षांत कधी भाजपबरोबर तर कधी राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वात महाआघाडीत गेले. यातून त्यांची बदलती भूमिका हा टीकेचा विषय राहिला. सुशासन बाबू असा लौकिक मिळवणाऱ्या नितीशकुमार यांची प्रशासनावरची पकड सैल झाल्याचे चित्र आहे. छप्रा येथे विषारी दारूने तीस जणांचा बळी गेला. त्यानंतर माध्यमांपुढे बोलताना असंवेदनशील वक्तव्य केलेच, पण विधिमंडळातही याच मुद्द्यावर उत्तर देताना त्यांना संयम ठेवता आला नाही. ही सारी नितीश यांच्या हतबलतेची लक्षणे आहेत.
या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांनी तेजस्वी यांचे नाव त्यांनी पुढे केेले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे. मात्र नितीश यांनीच हे फेटाळून लावले आहे. बिहारबाहेर त्यांच्या पक्षाचे अस्तित्व नाही. बिहारमध्येही लोकसभेच्या ४० पैकी किती जागा ते जिंकणार हा मुद्दा आहे. अर्थात विरोधकांचे सहमतीचे उमेदवार म्हणून नितीशकुमार यांचे नाव पुढे येऊ शकते. त्यामुळेच विरोधकांच्या ऐक्याचा मुद्दा ते वारंवार उपस्थित करत आहेत.
मतपेढी गमावली?
महिला तसेच अतिमागासवर्गीय मतदार हा नितीशकुमार यांचा पारंपरिक पाठीराखा वर्ग. ही मतपेढी संयुक्त जनता दलापासून दुरावत असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या कुढणी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दिसले. हा मतदारसंघ गेल्या वेळी राष्ट्रीय जनता दलाने जिंकला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने तो मागून घेतला. मात्र राष्ट्रीय जनता दल तसेच संयुक्त जनता दल एकत्र येऊनही भाजपने येथे विजय मिळवला. याचाच अर्थ केंद्राच्या कल्याणकारी योजना तसेच मोदींच्या प्रतिमेच्या आधारे नितीशकुमार यांच्या या पारंपरिक मतपेढीला भाजपने खिंडार पाडल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे यादव-मुस्लीम हे समीकरण तसेच संयुक्त जनता दलाच्या इतर मागासवर्गीय मतांच्या जोरावर सहज विजय मिळेल असे गणित असतानाही येथे पराभव होतो याचाच अर्थ ही महाआघाडी पूर्वीइतकी जातीय समीकरणाच्या आधारे भक्कम नाही हे दिसून येते. अर्थात इतर पक्षांनी मते विभागल्याने भाजपला विजय शक्य झाला, हेही सत्य आहे. पण आता सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवत असलेल्या नितीशकुमार यांच्याबाबत मतदारांच्या मनात नाराजी असल्याचे दिसत आहे त्यामुळे ते निवृत्तीची भाषा वारंवार बोलत आहेत.
तेजस्वी यांचा नेतृत्वउदय…
गेल्या म्हणजेच २०२०च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मातब्बर नेते प्रचारात असतानाही तेजस्वी यांनी एकहाती झुंज देत जवळपास विजय खेचून आणला होता. बहुमताला त्यांना काही जागा कमी पडल्या. रोजगार, महागाई या मुद्द्यांभोवती त्यांचा प्रचार होता. विरोधकांनी सातत्याने लालूप्रसाद यांच्या राजवटीतीत कायदा व सुव्यवस्था कशी खराब होती याची आठवण करून दिली होती. तेजस्वी यांनी मात्र आत्मविश्वासाने प्रचार करत एक प्रतिमा निर्माण केली होती. आताही उपमुख्यमंत्रीपद भूषवताना राज्यातील भाजपच्या टीकेचे बाण ते परतावून लावत आहेत. पोटनिवडणुकीतील निकालानंतर नितीश यांनी तेजस्वी यांच्या नेतृत्वात पुढील निवडणूक लढण्याचे जाहीर केले असले तरी, सत्तेशिवाय नितीशकुमार राहणार काय, हा एक मुद्दा आहे.
भाजपला सत्तेसाठी बिहार महत्त्वाचा…
दिल्लीत केंद्रात २०२४ मध्ये पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर बिहारमधील लोकसभेच्या ४० जागा महत्त्वाच्या आहेत. केवळ उत्तर प्रदेशच्या ८० जागांवर दिल्लीतील सत्तेचा मार्ग सहज साध्य होणार नाही. त्यामुळेच केंद्राच्या कल्याणकारी योजना अधिकाधिक जनतेपर्यंत कशा पोहचवता येतील व हा योजनांचा लाभार्थी वर्ग मतपेढीत रूपांतरित करण्यासाठी पक्षाचा आटापिटा सुरू आहे. बिहारच्या महाआघाडीत राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, भाकप (माले) व काँग्रेस व इतर छोटे पक्ष आहेत . राज्यातील जातीय समीकरणे पाहता ही आघाडी कागदावर खूप भक्कम वाटत आहे. भाजपच्या साथीत लोकजनशक्ती पक्षाचे दोन गट आहेत. हे पुरेसे नाही. त्यामुळेच आगामी काळात बिहारमधील ही लढाई अधिक टोकदार होणार आहे. त्यात भाजप नितीश यांच्या नेतृत्वाला लक्ष्य करणार हे स्पष्ट आहे. यातून नितीशकुमार तेजस्वी यांना पुढे करत आहेत.