मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स कायम काळाच्या पुढे असतात. अशा उद्योगपतींना भविष्य दिसते. भविष्यातील संधी दिसतात. हे बिल गेट्स यांनी अलिकडेच लंडनमध्ये ॲमेझॉनचे संस्थापक, जेफ बेझोस, सॉफ्टबँकचे संस्थापक, मासायोशी सन आणि सौदी अरेबियाचे प्रिन्स अल-वलीद बिन तलाल यांच्यासह जगातील काही श्रीमंत लोकांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. हे सर्वजण मिळून जगाला जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी मदत करण्यासाठी संयुक्त गुंतवणूक करून एक कंपनी उभारणार आहेत. बिल गेट्स यांनी ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्स या नावाने ओळखला जाणारा समूह एकत्र केला आहे. हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी जगाला मदत करणाऱ्या ज्या कंपन्यांमध्ये ही सर्व श्रीमंत माणसं त्यांची संयुक्त गुंतवणूक करणार आहेत, त्यापैकी चार कंपन्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे – वातावरणातून कार्बन डायऑक्साइड काढून टाकणे आणि यातून नफा कमावणे.
कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यासाठी…
जगभरातील देश वातावरणातील प्रदूषण वाढवत आहेत. जागतिक तापमान विक्रमी पातळीवर वाढत आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड निष्कासनाच्या क्षेत्रासाठी भांडवल उभारण्यासाठी आता आर्थिक जगताची स्पर्धा सुरू आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत वातावरणातला कार्बन शोषून घेता येईल असं तंत्रज्ञान निघालेलं नव्हतं, आणि अर्थात अजूनही एका टप्प्यापर्यंत या तंत्रज्ञानाची यशस्विता सिद्ध झालेली नाही. मात्र, या तंत्रज्ञानाला भविष्य आहे. प्रदूषणाशी लढा देणाऱ्या या कंपन्या हे भविष्यात मोठं क्षेत्र होईल, असा या गुंतवणूकदारांना विश्वास आहे.
हेही वाचा : विश्लेषण : मुंबई महापालिकेचा भूखंड लिलाव योग्य की अयोग्य?
संयुक्त गुंतवणूक
इन्व्हेस्टमेंट बँक जेफरीजच्या म्हणण्यानुसार, २०१८ पासून हवेतून कार्बन डाय ऑक्साईड काढण्याच्या मार्गांवर काम करणाऱ्या कंपन्यांनी पाच अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. त्याआधी अशी गुंतवणूक जवळपास नव्हतीच.
कॅनडा-आधारित डीप स्कायचे मुख्य कार्यकारी डेमियन स्टील यांच्या मते त्यांनी २० वर्षांच्या भांडवल क्षेत्रात पाहिलेली ही एकमेव मोठी संधी आहे. या कंपनीने वातावरणातून कार्बन डायऑक्साइड काढण्याचा प्रकल्प विकसित करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त निधी उभारला आहे.
ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्स आणि बिल गेट्स
बिल गेट्स यांनी पुढाकार घेत एकत्र आणलेल्या ‘ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्स’ या समूहाचा कार्बन निष्कासन करणाऱ्या ८०० हून अधिक कंपन्यांना मोठा आधार आहे. इतर गुंतवणूकदारांमध्ये सिलिकॉन व्हॅलीतील उद्यमी भांडवलदार, वॉल स्ट्रीटमधील खासगी इक्विटी कंपन्या आणि युनायटेड एअरलाइन्स सारख्या मोठ्या कॉर्पोरेशनचा समावेश आहे.
ट्रिलियन डॉलरचा उद्योग
जागतिक तापमानवाढीशी लढा देण्याच्या संयुक्त प्रयत्नांचा एक भाग म्हणून एक हजारहून अधिक कंपन्यांनी त्यांचा कंपनीत तयार होणारा कार्बन काढून टाकण्याची प्रतिज्ञा केली आहे. या प्रयत्नांसाठी अनेक कंपन्या पैसे मोजायला तयार आहेत. यावर्षी मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि ब्रिटीश एअरवेज यांसह अनेक कंपन्यांनी यावर एकूण १.६ अब्ज डॉलर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खर्च २०१९ मध्ये १ दशलक्ष डॉलरपर्यंत होता. पुढील वर्षी अशा प्रकारे कार्बन उत्सर्जनासाठी कंपन्या १० अब्ज डॉलरपर्यंत खर्च करू शकतात. हा कंपन्यांना वातावरणात जाणारा कार्बन रोखून, शोषून देणारा उद्योग २०५० पर्यंत १.२ ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल असा अंदाज मॅकिन्सेने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.
हेही वाचा : २०२५ मध्ये मोठ्या धोक्याची चिंता? बर्ड फ्लू म्यूटेशनने जगभरात संकटाची स्थिती? वैज्ञानिकांनी वर्तवली भीती
यशस्विता किती?
यातले अनेक प्रकल्प कार्यान्वित आहेत. कॅलिफोर्निया आणि आइसलँडमध्ये कार्बन उत्सर्जन प्रकल्पांचे काम सुरू आहे. परंतु यातील सर्वात मोठे कार्बन निष्कासन हे केवळ माणूस एक दिवसात जितका हरितवायू उत्पादित करेल तितकेच आहे. असे शेकडो प्रकल्प उभे राहिले तरी ते वार्षिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या एक टक्काही कार्बन नसेल.
अन्य पर्याय कोणते?
कार्बन डायऑक्साइड काढून टाकणे किंवा निष्कासित करणे हा भू-अभियांत्रिकीचा सर्वात विकसित प्रकार आहे. इतर प्रस्तावित योजनाही आहेत. अधिक कार्बन डाय ऑक्साईड शोषण्यासाठी जगातील नद्या आणि महासागरांचे रसायनशास्त्र बदलणे, शेतीतून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी जीवाणूंमध्ये अनुवांशिक बदल करणे तसेच वातावरणात सल्फर डाय ऑक्साइडची फवारणी करणे आदी. पण कार्बन डाय ऑक्साइड वातावरणातून शोषून घेणे याच पर्यायात मोठी गुंतवणूक होत आहे.
हेही वाचा : तुम्हीही इंजेक्शनला घाबरता? आता सुईशिवाय मिळणार इंजेक्शन; काय आहे वेदनारहित शॉक सिरिंज?
कार्बन कॅप्चरला विरोध
वातावरणातून कृत्रिम पद्धतीने कार्बन काढून टाकण्याला विरोधही होत आहे. या प्रक्रियेमुळे जीवाश्म इंधन उत्पादनात वाढ होण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण सध्या तरी गुंतवणूकदार कार्बन हटविण्याच्या या नव्या संकल्पनेत गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत आणि अमेरिकन सरकारचाही या उद्योगाला पाठिंबा आहे.