भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) दावा केला आहे की, प्रस्तावित ‘विमा सुगम’ (Bima Sugam) ऑनलाइन पोर्टल विमा क्षेत्रात एक मोठी क्रांती करणार आहे. ज्याप्रकारे युपीआय पेमेंटने डिजिटल व्यवहाराचे क्षेत्र व्यापले, तशाच प्रकारे विमा सुगम विमा क्षेत्राचा ताबा घेऊ शकते. जगभरात कुठेही अशाप्रकारे विमा खरेदी करण्यासाठी सर्वात मोठे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध नाही, असा दावाही IRDAI ने केला आहे. या एकाच पोर्टलवर असलेल्या शेकडो विमा योजनांमधून ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा विमा निवडणे आता सोपे होणार आहे. ऑनलाइन विक्रीमुळे कागदपत्रांचेही काम कमी होईल, ब्रोकरेज कमी होईल, परिणामी विम्याच्या हप्त्यामध्येही काही प्रमाणात सूट मिळेल, असे सांगण्यात येत आहे. विमा सुगम नक्की कसे काम करणार? याचा लाभ कुणाला आणि कसा होणार, याचा घेतलेला हा आढावा …
विमा सुगम म्हणजे काय?
ज्याप्रकारे आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-वाणिज्य पोर्टलवरून विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करतो, त्याप्रमाणेच विमा सुगम पोर्टल काम करणार आहे. या ऑनलाइन पोर्टलवर अनेक विमा कंपन्या त्यांच्या विमा योजनांचे पर्याय ग्राहकांसाठी खुले करून देणार आहेत. ‘विमा सुगम’ पोर्टलवर जीवन, आरोग्य आणि जनरल इन्शुरन्स (मोटार आणि प्रवास विमा अंतर्भूत असेल) अशा सर्व प्रकारचे विमा मिळतील. फक्त विमा विक्री करूनच विमा सुगमची सेवा संपत नाही, तर आरोग्य किंवा मृत्यू अशा विमा दाव्याची पूर्तताही (Claims settlement) अतिशय सोप्या पद्धतीने, कागदपत्रांची पूर्तता न करता केवळ पॉलिसी क्रमाकांच्या आधारावर केली जाणार आहे.
हे वाचा >> Money Mantra : विमा म्हणजे काय रे भाऊ?
विमा सुगमचा एकूण खर्च ८५ कोटी रुपयांवरून २०० कोटी रुपये करण्यात आला आहे. सदर पोर्टल तयार करण्यासाठी IRDAI ने एका समितीची स्थापना केली आहे. या पोर्टलसाठी सेवा प्रदान (service provider) करण्यासाठी इच्छुक असलेल्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सेवा प्रदान करणारी कंपनी ही तंत्रज्ञान भागीदार म्हणून काम करेल. विमा सुगम पोर्टल चालविणे आणि विम्याशी निगडित सर्व सेवा एकाच मंचावर आणून देण्याचे काम या कंपनीला करावे लागणार आहे.
ग्राहकांसाठी विमा सुगम उपयुक्त आहे?
विमा ग्राहकांसाठी त्यांच्या विम्याशी संबंधित सर्व काही कामे एक खिडकी योजनेप्रमाणे करण्याची मुभा विमा सुगम प्राप्त करून देणार आहे. ग्राहकांना विम्याशी संबंधित सुरुवातीपासून अखेरपर्यंत सर्व काही सहकार्य करण्याची हमी विमा सुगम देत आहे. जसे की, विमा खरेदी करणे, सेवा प्रदान करणे आणि कोणत्याही अडचणीशिवाय विम्याची पूर्तता करणे.
विमा कंपन्यांना या पोर्टलचा बराच लाभ होईल. ग्राहकांनी पोर्टलला भेट दिल्यानंतर ते कोणत्या विमा योजनांना प्राधान्य देत आहेत, तसेच त्यांची निकड काय आहे, याचा रिअल टाइम डेटा कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विमा विकणारे मध्यस्थ आणि एजंट्सना विमा विकण्यासाठी आणि विमाधारकांना सेवा मिळण्यासाठी आणि कमीत कमी कागदपत्रे हाताळले जातील, असा युझर फ्रेंडली इंटरफेस (वापरकर्त्यांना सहज सोपा वाटेल असा) निर्माण करण्याचा विमा सुगमचा प्रयत्न असेल.
IRDAI ने सांगितले की, विमा विकण्यासाठी कंपन्यांना करावी लागणारी व्यापक जाहिरात आणि एजंट्सना द्यावे लागणारे कमिशन, या सर्वांचा खर्च कमी झाल्यामुळे याचा थेट फायदा ग्राहकांना होईल. विम्याची किंमत कमी होऊन हप्त्याची रक्कम खाली येईल.
सध्या जीवन आणि इतर क्षेत्रांमधील शेकडो विमा योजना उपलब्ध आहेत. यापैकी कोणती योजना चांगली? योजनेचे बरे-वाईट परिणाम काय आहेत? याची ग्राहकांना माहिती मिळण्याचा कोणताच मार्ग नाही. विमा सुगम ग्राहकांची ही अडचण सोडवणार असून त्यांच्यासाठी कोणता विमा योग्य आहे, यासाठी या एकाच पोर्टलवर ग्राहकांना सर्व माहिती पुरविली जाईल. सध्या अचूक विमा निवडण्यासाठी ग्राहकांना एजंटशी बोलण्यात किंवा विविध विमा कंपन्यांच्या संकेतस्थळांना भेटी देण्यात वेळ घालवावा लागतो.
हे वाचा >> Money Mantra : मुदत विमा आणि जीवन विम्याबद्दल संभ्रम आहे? पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी फरक समजून घ्या
ऑनलाइन पोर्टलमुळे प्रत्यक्ष सेवा समाप्त होईल?
विमा सुगम पोर्टलवर ग्राहकांना स्वतःचे विमा खाते उघडावे लागणार आहे, जेणे करून त्यांचे सर्व विमा या खात्यात एकत्रित होतील. अशाप्रकारे प्रत्येकवेळी विम्याशी संबंधित काम करताना कागदपत्रांची पुन्हा पुन्हा पूर्तता करण्याची आवश्यकता संपुष्टात येईल. कागदपत्रांशी निगडित काम कमी झाल्यामुळे नवे विमापत्र विकत घेणे, विम्याच्या दाव्याची पूर्तता करणे आणि विम्याचे नूतनीकरण करणे अतिशय सोपे होणार आहे. ग्राहकांसाठी हा कटकटीचा भाग कमी झाल्यामुळे विमा घेणे आणि त्यासंबंधी व्यवहार करणे अतिशय सुलभ होईल.
सध्या डिमॅट खात्याच्या माध्यमातून ज्याप्रकारे भांडवली बाजारात ऑनलाइन ट्रेडिंग करणे अतिशय सहज झाले आहे, त्याचप्रकारे विमा सुगमच्या माध्यमातून पॉलिसी निवडणे, विकत घेणे आणि इतर कामे सोपी होणार आहेत.
IRDAI ने काय सांगितले?
IRDAI चे अध्यक्ष देबाशिष पांडा विमा सुगमबद्दल माहिती देताना म्हणाले की, विमा सुगम पोर्टल इंडिया स्टॅक (India Stack) पोर्टलशी जोडले जाणार आहे. इंडिया स्टॅक हे खुले ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा संग्रह असून, मोठ्या प्रमाणात ओळख, डेटा आणि पेमेंट सेवा उपलब्ध करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना अखंडीतपणे आणि विनासायास सेवा प्रदान करण्यासाठी अतिशय वेगळा आणि सुलभ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या माध्यमातून उभे केले जाईल. एकप्रकारे हे पोर्टल ई-मार्केट ठिकाण असून विमा क्षेत्रातील कंपन्यांना आणखी सक्षम करण्यासाठी मदतच करेल.
आणखी वाचा >> Money Mantra: वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी का काढावी?
विमा सुगमची सुरुवात कधीपासून होणार?
विमा सुगमची सुरुवात जानेवारी २०२३ पासूनच IRDAI ला करायची होती. मात्र, १ ऑगस्ट २०२३ चा मुहूर्त ठरविण्यात आला. आता ऑगस्टचीही तारीख उलटून गेल्यामुळे जून २०२४ पासून याची अंमलबजावणी होईल, असे सागंण्यात येत आहे. जीवन विमा आणि जनरल विमा कंपन्यांकडे प्रत्येकी ४७.५ टक्के भागीदारी असेल, तर दलाल (ब्रोकर) आणि एजंट्सच्या संस्था यांच्याकडे प्रत्येकी २.५ टक्क्यांची भागीदारी असेल.
विमा क्षेत्रातील जाणकारांच्या मते, विमा सुगमची अंमलबजावणी करणे हे एक आव्हानात्मक काम असणार आहे. या पोर्टलला तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेची जोड द्यावी लागले. तसेच देशात विम्याचा वापर वाढीस लागण्यास यामुळे हातभार लागणार आहे.