Russia Ukraine War binil tb Death : रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याशिवाय दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिकदेखील मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, सोमवारी युक्रेनच्या सैनिकांनी रशियावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात एका ३२ वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. तसेच त्याचा एक नातेवाईकदेखील गंभीर जखमी झाला आहे. बिनिल टी.बी असं या तरुणाचं नाव असून, तो केरळ येथील रहिवासी होता. भारतीय दूतावासाने बिनिलच्या मृत्यूची बातमी सोमवारी त्याच्या कुटुंबीयांना दिली.
बिनिल टी.बी कोण होता?
बिनिल हा केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी गावचा रहिवासी होता. रशियातील एका एजन्सीनं त्याला इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर बिनिल त्याच्या २७ वर्षीय नातेवाइकाबरोबर रशियाला गेला. जून २०२४ मध्ये पासून तो युद्ध क्षेत्रात अडकून पडला होता. बिनिलच्या नातेवाइकांनी असा दावा केला आहे की, रशियात गेल्यानंतर बिनिलचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. त्यानंतर रशियन मिलिटरी सपोर्ट सर्व्हिसचा भाग म्हणून त्याला जबरदस्तीनं युद्ध क्षेत्रात पाठवण्यात आलं.
हेही वाचा : कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
सध्या रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात बिनिल आणि त्याचा नातेवाईक अडकून पडला. यादरम्यान दोघांचे मोबाईल फोन आणि इतर साहित्य हरवलं होतं. परिणामी त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. बिनिलच्या नातेवाइकांनी असा दावा केला आहे की, मायदेशी परतण्यासाठी तो भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. बिनिलचा एक नातेवाईक आधीपासून रशियन सैन्यात कार्यरत होता. त्याच्या सहकार्यानेच खासगी व्हिसावर बिनिल आपल्या दुसऱ्या नातेवाइकाबरोबर रशियाला गेला होता.
खासगी व्हिसावर गेला होता रशियाला
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना काही भारतीय नागरिक रशियात अडकून पडले होते. या वर्षी भारत सरकारने रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करून, त्यांना मायदेशात परत आणले. त्यामध्ये बिनिलच्या पहिल्या नातेवाइकाचाही समावेश होता. दरम्यान, बिनिलनं आपल्या कुटुंबाला फोनवरून माहिती देताना असं सांगितलं होतं की, त्याला आणि त्याच्या दुसऱ्या नातेवाइकाला युद्धात आघाडीवर असलेल्या रशियन सैनिकांच्या तुकडीत पाठवण्यात आलं आहे.
हिंदुस्तान टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, “सुरुवातीला बिनिलकडे युद्धात आघाडीवर असलेल्या सैनिकांपर्यंत जेवण पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, युद्धात सहभागी झालेल्या रशियन सैनिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. त्यामुळे डिसेंबरमध्ये बिनिलच्या हातात शस्त्रं देण्यात आली. अत्यंत कमी कालावधीत त्याला प्रशिक्षण देण्यात आलं आणि युद्धासाठी आघाडीच्या तुकडीत पाठवण्यात आलं.”
बिनिलची पत्नी जॉयसी काय म्हणाली?
बिनिलची पत्नी जॉयसी जॉन हिने सांगितले, “आठवड्यातून फक्त एकदाच त्याला कुटुंबीयांबरोबर संवाद साधता येत होता. एका शनिवारी बिनिलने घरी कॉल करून, त्याचा त्रिशूर येथील सहकारी संदीप याच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली. युद्ध क्षेत्रातील सैनिकांना जेवण घेऊन जात असताना संदीपचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता.” दरम्यान, रशियातील एजंट व्यक्तींनी अनेक भारतीय तरुणांची फसवणूक केली होती. मोठ्या पगाराच्या नोकरीचं आश्वासन देऊन, त्यांना रशियात बोलावून घेतलं होतं.
तिथे गेल्यानंतर या तरुणांना जबरदस्तीनं सैन्यात भरती करण्यात आलं. मागील वर्षी मे महिन्यात पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली होती. आरोपींचा संबंध थेट रशियातील एका तस्करी नेटवर्कशी होता. भारतातील तरुणांना नोकरी आणि उच्च शिक्षणाचं आमिष दाखवून हे एजंट रशियाला घेऊन जात होते. तिथे गेल्यानंतर जबरदस्तीनं त्यांना रशियन सैन्यात भरती केलं जात होतं.
बिनिलच्या कुटुंबीयांनी काय आरोप केले?
बिनिल रशियात अडकून पडला असताना डिसेंबर २०२४ मध्ये त्यानं केरळमध्ये असलेल्या त्याच्या पत्नीला ऑडिओ संदेश पाठवला. तेव्हापासून पत्नी जॉयसीला त्याची काळजी वाटत होती. त्यावेळी पीटीआयशी बोलताना जॉयसी म्हणाली, “बिनिलच्या ऑडिओ संदेशातून असं कळतंय की, त्यांना युद्ध आघाडीवर असलेल्या तुकडीत सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात महिन्यांपासून बिनिल रशियाला गेले असून, ते मायदेशी कधी परतणार याची मला काळजी वाटत आहे.”
बिनिलची पत्नी जॉयसी त्रिशूरमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका म्हणून काम करते. सध्या ती प्रसूतीच्या रजेवर आहे. बिनिलबरोबर रशियाला गेलेल्या दुसऱ्या नातेवाइकाचं घरदेखील जॉयसीच्या घराजवळच आहे. दरम्यान, “बिनिल रशियाला गेल्यानंतर आम्ही दररोज त्याच्याशी फोनवर बोलत होतो. मात्र, त्यानंतर आम्हाला त्याच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही. कदाचित प्रशिक्षण घेत असल्यानं त्याला मोबाईल वापरण्याची परवानगी नाही, असं आम्हाला वाटलं होतं”, असं जॉयसी म्हणाली.
हेही वाचा : रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
रशियातून किती भारतीयांची सुटका झाली?
“सरकारनं आतापर्यंत ४५ भारतीयांना रशियातून मायदेशात परत आणलं आहे. काही जण अजूनही त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होण्याची वाट पाहत आहेत. बिनिलबरोबर रशियाला गेलेले केरळमधील कोल्लम, एर्नाकुलम व त्रिशूर येथील तीन तरुण नुकतेच मायदेशात परतले आहेत”, असंही जॉयसीने सांगितले. गेल्या महिन्यात जॉयसीला पाठवलेल्या भावनिक संदेशात बिनिल म्हणाले, “रशियातील परिस्थिती आणखी बिकट झाली असून, आम्हाला आजपासून युद्धात आघाडीवर असलेल्या तुकडीत पाठविण्यात येणार आहे. तिथे जाण्यापूर्वी आम्ही कुटुंबीयांना संदेश पाठवावा, असं सांगण्यात आलं आहे.”
रशिया-युक्रेन युद्धात भारताची भूमिका काय?
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते, “रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी चर्चा करून तातडीनं युद्ध थांबवावं, अशी विनंती भारताकडून करण्यात आली आहे. शांतता चर्चा कधी आणि कशी सुरू करायची याचा निर्णय हा दोन्ही देशांनी घ्यायचा आहे. मित्र म्हणून आम्ही दोन्ही देशांच्या बाजूनं उभे आहोत.”
रशियन लष्करी तळावर अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले की, “१५ जणांची सुटका करण्यात आली आहे आणि ते सुरक्षित भारतात परतले आहेत. अजूनही काही भारतीय रशियात असून, त्यांना मायदेशात परत आणण्यासाठी भारतीय दूतावास रशियन अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहे. लवकरच त्यांचीही सुटका केली जाईल”, असं रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं होतं.