प्रशांत केणी
करोनाची साथ देशात नियंत्रणात असली तरी चीन, द. कोरिया, हाँगकाँग, ब्रिटन येथून अद्यापही नव्या बाधितांविषयी कानावर येत असते. जैव-सुरक्षित परिघात किंवा बायो-बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यामुळे इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचा मागील हंगाम अर्धवट थांबवावा लागला होता. मग उर्वरित हंगाम काही महिन्यांनी संयुक्त अरब अमिरातीत खेळवला. येत्या २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या १५व्या हंगामातसुद्धा जैव-सुरक्षित परिघाचे कडक नियम खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी आणि कुटुंबाच्या सदस्यांना बंधनकारक असतील. एक कोटी रुपये दंड, सामन्याचे निलंबन, स्पर्धेतून हकालपट्टी, पुन्हा सात दिवसांचे विलगीकरण अशा कठोर शिक्षांची तरतूद यात करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील साखळी सामन्यांसाठी महाराष्ट्रात केलेले जैव-सुरक्षित परीघ आणि त्या अनुषंगाने नियम, आदी समजून घेऊया.
साखळी सामन्यांसाठी जैव-सुरक्षित परिघाची रचना का आणि कुठे करण्यात आली आहे?
गतवर्षी ८ एप्रिल २०२१ला दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि मुंबई या चार शहरांमध्ये ‘आयपीएल’च्या हंगामाला प्रारंभ झाला. परंतु जैव-सुरक्षित परिघांमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाची लागण झाल्यामुळे ४ मे रोजी स्पर्धेला अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली. नंतर ‘बीसीसीआय’ने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवले. या पार्श्वभूमीवर यंदा करोनाचे आव्हान पेलत प्रवास कमी करण्यासाठी जैव-सुरक्षित परिघाची निर्मिती महाराष्ट्रात करून साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. कारण मुंबईत तीन आणि पुण्यात एक स्टेडियम उपलब्ध आहे. वानखेडे स्टेडियम आणि डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रत्येकी २० सामने, तर ब्रेबॉर्न स्टेडियम आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रत्येकी १५ सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ वानखेडे आणि पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार सामने खेळेल, तर ब्रेबॉर्न आणि महाराष्ट्र स्टेडियमवर प्रत्येकी तीन सामने खेळेल.
जैव-सुरक्षित परीघाचे उल्लंघन झाल्यास कोणते शासन होईल?
‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षित परीघात समाविष्ट असलेले खेळाडू, सामनाधिकारी, मार्गदर्शक आणि कुटुंबीय यांच्याकडून त्याचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. यातील चुकीला एक कोटी रुपयाचा आर्थिक दंड ते संघाचे गुण वजा करणे अशा प्रकारच्या शिक्षा निश्चित करण्यात आल्या आहेत.
पहिल्या चुकीसाठी कारवाई : जैव-सुरक्षित परीघात कुणीही बाहेरील व्यक्तीस प्रवेश देण्यात आला तर एक कोटी रुपये दंड म्हणून आकारण्यात येतील. या पार्श्वभूमीवर संबंधिताला सात दिवसांचे पुन्हा विलगीकरण करावे लागेल. विलगीकरणाच्या कालखंडात संबंधित व्यक्ती जेवढ्या लढतींमध्ये खेळू शकणार नाही, त्यांचे मानधनसुद्धा वजा केले जाईल.
विश्लेषण : ‘मंकडिंग’ला अधिकृत अधिष्ठान; ‘एमसीसी’चे नवे नियम काय आहेत?
दुसऱ्या चुकीसाठी कारवाई : दुसऱ्या चुकीसाठी त्या व्यक्तीला एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई केली जाईल. या सामन्याचे मानधनही वजा होईल. संघाच्या एकूण गुणांमधून एक किंवा दोन गुण वजा करण्यात येतील.
तिसऱ्या चुकीसाठी कारवाई : संबंधित व्यक्तीस उर्वरित हंगामासाठी त्याच्या संघातून वगळण्यात येईल. त्याच्या जागी बदली खेळाडू/मार्गदर्शक संघाला मिळणार नाही.
खेळाडूच्या कुटुंबियांसाठीही जैव-सुरक्षित परीघाचे नियम बंधनकारक असतील का?
‘आयपीएल’च्या सामन्यांसाठी खेळाडू आणि मार्गदर्शकांसमवेत पत्नी-प्रेयसी आणि मुले सोबत राहण्यास परवागी असते. परंतु करोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे त्यांच्यावरही बंधने लादण्यात आली आहेत. या कौटुंबिक सदस्यांकडून पहिल्यांदा परिघाचे उल्लंघन झाल्यास खेळाडू आणि कुटुंबाला सात दिवसांचे विलगीकरण पुन्हा करावे लागेल. पंच, मार्गदर्शक आणि अन्य अधिकाऱ्यांसाठीही सारखीच कारवाई होईल. दुसऱ्यांदा चूक झाल्यास संबंधित कौटुंबिक सदस्याची जैव-सुरक्षित परिघातून हकालपट्टी करण्यात येईल. याशिवाय क्रिकेटपटूला आणखी सात दिवसांच्या विलगीकरणाला सामोरे जावे लागणार.
विश्लेषण : पृथ्वी अनुत्तीर्ण, हार्दिक उत्तीर्ण…काय आहे यो-यो चाचणी? चाचणीचे नेमके निकष काय?
करोना चाचणी चुकवल्यास खेळाडूवर कोणती कारवाई होईल?
जैव-सुरक्षित परीघात नियमित करोना चाचण्या करून घेणे सर्वांना बंधनकारक असेल. पहिल्यांदा चूक झाल्यास ताकीद दिली जाईल, दुसऱ्यांदा चूक घडल्यास ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. याचप्रमाणे स्टेडियम किंवा सरावाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.
जैव-सुरक्षा परिघाच्या गंभीर आव्हानामुळे कोणत्या खेळाडूंनी आधीच माघार घेतली आहे?
जैव-सुरक्षा परिघाच्या गंभीर आव्हानाबाबत करोना साथीच्या कालखंडात अनेक खेळाडूंनी आपापली मते मांडली आहेत. अनेकांच्या कारकीर्दीही अकाली संपुष्टात आल्या आहेत. गतवर्षी ॲडम झम्पा, केन रिचर्ड्सन, अँड्यू टाय या काही खेळाडूंनी ‘आयपीएल’ चालू असतानाच माघार घेतली होती. यंदाच्या ‘आयपीएल’ला प्रारंभ होण्याआधीच इंग्लंडच्या जेसन रॉय आणि ॲलेक्स हेल्स यांनी माघार घेतली आहे. रॉयला लिलावात गुजरात टायटन्सने दोन कोटी रुपयांच्या बोलीसह संघात स्थान दिले होते. हेल्सला कोलकाता नाइट रायडर्सने दीड कोटी रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले होते. हेल्सच्या अनुपस्थितीत कोलकाता संघाने आरोन फिंचला संघात स्थान दिले आहे.