Bipolar Disorder: जगभरात दरदिवशी होणारे वाद, अपघात, मोर्चे, आंदोलनं, बेरोजगारी आणि जवळपास सर्वच समस्यांच्या विळख्यात एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे मानसिक अशांती. बहुतांश समस्यांच्या मागे मानसिक अस्वास्थ्य मुख्य कारण असू शकतं आणि तरीही मानसिक आरोग्याविषयी सर्वात कमी जागरूकता आहे. मानसिक आरोग्य म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सर्वात आधी तुम्ही स्वतःकडे कसे पाहता, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींकडे व समाजाकडे कसे पाहता हे लक्षात घेणं होय. मानसिक आरोग्य अस्थिर असताना जाणवणारा सर्वात मोठा आजार म्हणजे बायपोलार डिसऑर्डर, नेमका हा आजार काय? त्याचे प्रकार काय? बायपोलार डिसऑर्डरवर उपाय काय आणि मुख्य म्हणजे याचा तुम्हाला कितपत धोका आहे हे आज आपण जाणून घेऊयात..
बायपोलार डिसऑर्डर म्हणजे काय?
बायपोलार डिसऑर्डरला मॅनिक-डिप्रेसिव्ह मूड डिसऑर्डर असेही म्हटले जाते, बायपोलर डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग्याशी निगडित समस्या आहे ज्यामुळे सतत मूड बदलणे, ऊर्जा कमी होणे, झोप न लागणे, तर्कशुद्धपणे विचार करण्यास असमर्थता येते. बायपोलार विकार असलेल्या रुग्णाला एका क्षणी अत्यंत आनंदी आणि उत्साही वाटू शकते तर दुसऱ्या क्षणी तो निराश व असहाय्य वाटू शकते. बायपोलर डिसऑर्डर असणाऱ्या रुग्णाला वैद्यकीय उपचार घेण्याची आवश्यकता आहे.
बायपोलार डिसऑर्डरचे प्रकार
बायपोलर १ व बायपोलर २ असे या गटात या विकाराची विभागणी केली जाते.
बायपोलर १
बायपोलार डिसऑर्डर १ मध्ये नैराश्य जाणवते. असे रुग्ण नैराश्य लपवण्यासाठी जास्त बोलणे, अधिक उत्साह दाखवणे असे मार्ग अवलंबताना दिसतात. या रुग्णांना झोप नीट लागताना अडथळा जाणवतो तसेच एकांतात डोक्यात सतत वाईट विचार येत राहतात, मुख्य म्हणजे एकातून एक विचार साखळीसारखा डोक्याला विळखा घालतो.
बायपोलर २
बायपोलार डिसऑर्डर २ मध्ये गंभीर नैराश्य जाणवते, सतत चिडचिड होणे हे बायपोलार डिसऑर्डरचे मुख्य लक्षण आहे
सायक्लोथिमिया:
सायक्लोथाइमिक डिसऑर्डर असेही म्हणतात, हा बायपोलर डिसॉर्डरची सौम्य स्थिती आहे. या विकारात, उदासीनता आणि चिडचिड जाणवते पण त्याचे स्वरूप सौम्य असते. हे त्रास साधारण २४ महिने जाणवू शकतात.
विश्लेषण: नाकात बोट घातल्याने अल्झायमरचा धोका वाढतो का? स्मृतिभ्रंशाचा धोका व लक्षणे जाणून घ्या
काही रुग्णांना बायपोलार डिसऑर्डरमध्ये सतत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते, अस्वस्थता, बेजाबदार वागण्याची इच्छा व गरजेपेक्षा अधिक मोठ्या योजना आखण्याची सवय या रुग्णांमध्ये आढळून येते
इथे एक बाब लक्षात घेण्याची गरज आहे आणि ती म्हणजे यातील कोणतेही लक्षण हे अचानक विनाकारण जाणवत नाही. उलट बायपोलर डिसऑर्डरचा त्रास ड्रग्स घेतल्याने, मद्यपान केल्याने अधिक गंभीर होऊ शकतो. काही अभ्यासांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार महिलांमध्ये बायपोलार डिसॉर्डरमुळे गरोदरपणात समस्या निर्माण होऊ शकतात, तर याउलट काही अभ्यासात समोर आले आहे की, बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या स्त्रियांना निरोगी गर्भधारणेचा अनुभव येतो.
बायपोलर डिसऑर्डर असलेल्या स्त्रियांनी गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी मानसिक स्वास्थ्याच्या संबंधित तज्ञाशी चर्चा करणे आवश्यक आहे. औषधे आणि त्यांच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, रुग्णाने गर्भधारणेच्या आधीच डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ञाशी देखील पारदर्शकपणे चर्चा करावी जेणेकरुन त्यानुसार औषधोपचाराची योजना आखता येईल ज्यामुळे दुष्परिणामांची शक्यता दूर होईल.अनुवांशिकदृष्ट्या, जर पालक बायपोलार विकाराने ग्रस्त असतील, तर 10% शक्यता आहे की अपत्यालाही आजार होऊ शकतो असेल.
बायपोलर डिसऑर्डरवर उपचार शक्य आहेत का?
आनंदाची बातमी म्हणजे मानसिक आरोग्याचे आजार हे कायमस्वरूपी नसतात. मानसिक आरोग्यावर उपचार उपलब्ध आहेत. हे उपचार प्रत्येक रुग्णांच्या बाबत वेगवेगळे असतात मात्र ते निश्चितच परिणामकारक ठरू शकतात.
अँटीडिप्रेसस
नावाप्रमाणेच, एंटिडप्रेसेंट्स मूड स्थिर करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त, रुग्णांना शांत होण्यासाठी आणि निवांत झोपण्यास मदत करण्यासाठी ही औषधे मदत करतात.
मूड स्टॅबिलायझर्स
रुग्णाला तिचा/त्याचा मूड सुधारण्यास मदत करण्यासाठी स्टॅबिलायझर्स घेण्याचा सल्ला दिला जातो मात्र अशी औषधे केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी.
औषधे व थेरपी यामुळे आपण बायपोलार डिसऑर्डरवर मात करू शकत नाही मात्र यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी जीवनशैली जगण्यासाठी व्यक्तीसाठी झोप, जेवण व व्यायाम या तीन घटकांचे रुटीन तयार करणे आवश्यक आहे. शिवाय, मानसिक आजारांपासून मुक्त होण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान करणे कटाक्षाने टाळले पाहिजे.
(टीप: मानसिक विकार हे शारीरिक विकारांइतकेच गंभीर ठरू शकतात त्यामुळे यासंबंधित वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल)