राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उष्ण हवामानाचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजननक्रियेवर होत असून पिल्लांना जन्म देण्याचे प्रमाण कमी होत आहे. प्रामुख्याने ‘साँगबर्ड’ या प्रजातीतील जे पक्षी आहेत, त्यांची संख्या सुमारे १२ टक्क्यांनी कमी होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस (यूसीएलए) आणि मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा हवामान बदल, तापमानवाढीचा पक्ष्यांवर होणारा परिणाम गांभिर्याने विचार करायला लावणारा आहे.

जागतिक तापमानवाढीचा पक्ष्यांवर काय परिणाम होतो?

जागतिक तापमानवाढीमुळे वाढत्या तापमानामुळे अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा आकार कमी होत आहे. हवामान बदलासाठी अनुभूती आणि फेनोटाइपिक प्रतिसाद यांच्यातील थेट संबंध ओळखण्यासाठी केलेल्या पहिल्या अभ्यासात संशोधकांनी दाखवले, की मोठ्या मेंदूच्या प्रजातींच्या तुलनेत लहान-मेंदूच्या पक्ष्यांमध्ये आकार कमी होतो. शरीर आणि मेंदूचा आकार कमी झाल्यामुळे संज्ञानात्मक आणि स्पर्धात्मक क्षमता कमी होते, ज्यामुळे लहान प्रजातींचे पक्षी भक्षकांसाठी सोपे लक्ष्य बनतात. वातावरणातील बदलामुळे पक्ष्यांच्या मेंदूला टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या पिलांसाठी पुरेसे अन्न मिळवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, परिणामी मेंदूचा आकार कमी होतो.

हवामानातील बदल पक्ष्यांसाठी हानिकारक कसे?

तापमानात सतत होणारी वाढ आणि पर्जन्यवृष्टीच्या पद्धतींमध्ये होणारे बदल याशिवाय, हवामानातील बदलामुळे प्रवासी पक्षी प्रजातींसाठी हानिकारक ठरू शकतात. कार्नबे ब्लॅक कोकाटू या नैर्ऋत्य ऑस्ट्रेलियातील पक्षी प्रजातीत हवामानाच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात घट झाली होती. अत्यंत दुष्काळी महिन्यांत पक्ष्यांनी अधिक पिले गमावल्याचे दिसून आले आहे. हवामानातील बदलामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये वणव्याची जोखीम आणि तीव्रता वाढते. परिणामी काही पक्ष्यांच्या अधिवासाचा नष्ट होतो. अधिवास नाहीसा होण्याची चाहूल लागल्याने अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आधीच उडून जातात. तरीही त्यांना जंगलातील आगीच्या धुराचा मोठा फटका बसू शकतो. स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींसाठी ही विशेष चिंतेची बाब आहे, कारण स्थलांतर करत असतानाच धुराने भरलेल्या क्षेत्रातून ते जात असतात. किनाऱ्यावरील पक्ष्यांच्या अधिवासांवर समुद्राच्या पातळीतील वाढीचा नकारात्मक परिणाम होतो. २१०० सालापर्यंत १६ टक्के अधिवास नष्ट होण्याची शक्यता आहे.

तापमानवाढीच्या प्रत्येक अंशामुळे किती भू-पक्षी नष्ट होतात?

२०२३च्या एका संशोधनात उच्च तापमानाच्या परिस्थितीत २१०० पर्यंत ५१.७९ टक्के पक्षी किमान काही अधिवास गमावतील. तर केवळ ५.२५ टक्के पक्षी त्यांच्या निम्म्याहून अधिक अधिवास गमावतील. तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसवर स्थिर राहिल्यास असुरक्षित प्रजातींपैकी ७६ टक्के प्रजाती नष्ट होण्याचा धोका कमी होतो. दक्षिण आफ्रिकेतील मिओम्बो वुडलँड्सचे तापमान ४.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यास त्यांचे सुमारे ८६% पक्षी गमावतील असा अंदाज आहे.

विश्लेषण : ‘थ्रेड्स’चे ट्विटरला आव्हान कितपत?

अंटार्क्टिकामधील हवामान बदलाचा पेंग्विनला धोका कसा?

हवामानातील बदल विशेषत: पेंग्विनसाठी अधिक धोकादायक आहे. यासंदर्भात २००८ला झालेल्या अभ्यासात, प्रत्येकवेळी दक्षिण महासागराचे तापमान ०.२६ अंश सेल्सिअसने वाढते, त्यामुळे किंग पेंग्विनची लोकसंख्या नऊ टक्क्यांनी कमी होते, असे आढळून आले. तर त्यानंतरच्या संशोधनात तापमानवाढीच्या सर्वात वाईट स्थितीत किंग पेंग्विन त्यांच्या सध्याच्या आठ प्रजनन स्थळांपैकी किमान दोन कायमस्वरूपी गमावतील आणि ७०% प्रजाती लुप्त होऊ नये म्हणून त्यांना स्थलांतरित करावे लागेल, असा अंदाज होता. तीव्र हवामान बदलामुळे सरासरी वर्षभरात सात टक्के पेंग्विन पिल्ले मारली जातात. पेंग्विनच्या वसाहतीवर देखील हवामानब दलाचा परिणाम अपेक्षित असून पश्चिम अंटार्क्टिक द्वीपकल्पमधील एक तृतीयांश वसाहती २०६० पर्यंत कमी होतील, असा अंदाज आहे.

नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल काय म्हणतो?

हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे पक्ष्यांना प्रजननाचा नैसर्गिक वेग राखता येत नाही. ठराविक कालावधीच्या खूप उशिरा किंवा खूप लवकर प्रजनन करताना हवामानातील बदल त्यांच्या अंडी किंवा नवजात पिलांना हानी पोहचवू शकतात. अन्नस्रोतांच्या संदर्भात देखील वेळ महत्त्वाची आहे. ते नैसर्गिकरित्या उपलब्ध होत नसेल तर पक्ष्यांकडे त्यांची पिल्ले जिवंत ठेवण्यासाठी दुसरी कोणतीही संसाधने नाहीत. १९७०च्या दशकापासून उत्तर अमेरिकेने पक्ष्यांच्या एकूण संख्येपैकी सुमारे एक तृतीयांश पक्षी गमावले आहेत. त्यामुळे हवामान बदलाचे आणखी वाईट परिणाम होण्याआधी पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी ठोस धोरण निर्धारित करावे लागेल, याकडेही या अभ्यासाच्या अखेरीस लक्ष वेधण्यात आले आहे

rakhi.chavhan@expressindia.com