1
f
जगातील सर्वात लोकप्रिय आभासी चलन असलेल्या बिटकॉइनने १ लाख कोटी डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठला. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत त्याने सुमारे ४० टक्के वाढ साधली. जगभरात अजूनही संपूर्णपणे मान्यताप्राप्त नसले तरी बिटकॉइनच्या मूल्यवाढीप्रमाणे त्याचे आकर्षणदेखील वाढते आहे. मात्र या तेजीमागील नेमके कारण काय आहेत, ते जाणून घेऊया.
‘बिटकॉइन’चे सध्याचे मूल्य काय?
बिटकॉइनने ५ डिसेंबरच्या सत्रात १ लाख डॉलरची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. विशेष म्हणजे, २०१० मध्ये एका बिटकॉइनचे मूल्य भारतीय रुपयात फक्त ८ रुपये (०.०१ अमेरिकी डॉलर) इतके होते. गेल्या काही दिवसांत या आभासी चलनाच्या मूल्यात वेगाने वाढ झाली आहे. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य १,०२,८६८ अमेरिकी डॉलर अर्थात भारतीय रुपयाच्या मूल्यानुसार सुमारे ८७,१४,७८१ हजार रुपये झाले आहे. एक लाख डॉलरची पातळी ओलांडल्याने अर्थविश्वाचे डोळे विस्फारले आहेत. मुख्यतः अमेरिकेतील ताज्या घडामोडींमुळे बिटकॉइनला ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचले.
हेही वाचा >>> विश्लेषण : तेलंगणात नक्षलवादी पुन्हा सक्रिय का झाले?
तेजीची कारणे काय?
आभासी चलनाचे पुरस्कर्ते समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी पुन्हा निवडून येण्याने बिटकॉइनमध्ये अभूतपूर्व तेजीला चालना दिली आहे. याआधी मार्चमध्ये त्याने ७४,५०४ डॉलर हा उच्चांक गाठला होता. तर ट्रम्प यांच्या अधिकृत निकालांची पुष्टी होण्यापूर्वीच बिटकॉइनमध्ये तेजी निर्माण झाली. याबरोबरच डोनाल्ड ट्रम्प यांची समाजमाध्यम कंपनी, ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप, क्रिप्टो ट्रेडिंग फर्म विकत घेण्यासाठी बोलणी करत असल्याच्या वृत्तामुळे बिटकॉइनने भरारी घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्याने आभासी चलनाला अनुकूल धोरणाबाबत आशा वाढली आहे. याबरोबरच ब्लॅकरॉकच्या आयशेअर्सने बिटकॉइन ट्रस्टसाठी ऑप्शन्स ट्रेडिंग सुरू केल्याने गुंतवणूकदारांना हेज करण्यासाठी आणि बिटकॉइनच्या किमतींवर सट्टा लावण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध झाला, ज्यामुळे किंमत वाढीला अधिक बळ मिळाले आहे. दरम्यान, मायक्रोस्ट्रॅटेजीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष मायकल सायलर, ज्यांच्याकडे बिटकॉइनमध्ये ३० अब्ज डॉलर आहेत, त्यांनी २०२४ साल संपत असताना बिटकॉइन १ लाख डॉलरचे मूल्य गाठेल असा अंदाज आधीच वर्तवला होता.
बिटकॉइन तेजीचा फुगा फुटणार?
आभासी चलन बाजारामधील चढउतारांचा कोणताही लेखाजोखा नसतो. हा बाजार अचानक वाढतो आणि अचानक पडतो, यामुळे बरेच लोक कोट्यधीश झाले आहेत, परंतु अनेकांचे पैसेदेखील तितक्याच वेगाने बुडाले आहेत. बिटकॉइनचे मूल्य १ लाख अमेरिकी डॉलरच्या पुढे गेल्याने तमाम अर्थविश्वाचे डोळे विस्फारले गेले. पण याचबरोबर धोक्याची घंटाही वाजली असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागणी आणि पुरवठा तत्त्वावर मूल्य ठरणाऱ्या या चलनातील ही वाढ म्हणजे एकप्रकारे फुगा असून, तो फुटूही शकतो, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>> Women in Defence Forces : केंद्रीय सुरक्षा यंत्रणांमध्ये महिलांचं प्रमाण का कमी आहे?
अमेरिकी नियामक बिटकॉइनच्या पाठीशी?
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनचे (एसईसी) पुढील अध्यक्ष म्हणून पॉल अॅटकिन्स यांच्या निवडीच्या शक्यतेने आणि क्रिप्टो उद्योगासाठी सकारात्मक दृष्टिकोन राखणार असल्याचे संकेत दिल्यानंतर अवघ्या तासांतच १ लाख डॉलरचा टप्पा गाठला गेला. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या अध्यक्षतेच्या काळात एसईसीचे माजी अध्यक्ष अॅटकिन्स यांना नामनिर्देशित करण्याचा त्यांचा मानस असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. ट्रम्प यांच्या अधिकृत निकालांची पुष्टी होण्यापूर्वीच बिटकॉइनमध्ये तेजी निर्माण झाली. विशेषतः ५ नोव्हेंबरच्या रोजी पार पडलेल्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजयी झाल्यापासून बिटकॉइनने अभूतपूर्व उंची गाठली आहे. याआधी क्रिप्टो एक्सचेंज अर्थात आभासी बाजारमंच असलेला एफटीएक्स कोसळल्यानंतर त्याने १७,००० डॉलरचा तळ देखील गाठला होता.
बिटकॉइनबाबत भारताची भूमिका काय?
क्रिप्टोकरन्सी अर्थात कूटचलनाचा देशाच्या आर्थिक परिसंस्थेला धोका असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कायम जागतिक पटलावर कायम आपली भूमिका मांडली आहे. भारतात मात्र बिटकॉइनला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता नसली, तरी मोठ्या करांच्या भाराची त्या व्यवहारांवर जरब आहे. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेनेदेखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेसारख्या कोणत्याही मध्यवर्ती बॅंकेचे या चलनावर आणि त्याच्या व्यवहारांवर नियंत्रण वा नियमन नाही. तरी जगभरासह भारतातदेखील बिटकॉइनच्या साहाय्याने व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे बिटकॉइन हा एक गुंतवणुकीचा पर्याय होऊ पाहत आहे. रिझर्व्ह बँकेने डिजिटल क्रांतीला साजेसे पाऊल टाकत डिजिटल रुपीचे (सीबीडीसी) व्यवहार सुरू केले आहे. यातदेखील ब्लॉकचेन हेच आधारभूत तंत्रज्ञान वापरले आहे. मात्र डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सी एकसारखेच नाहीत. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे इतर कोणत्याही भौतिक चलनाप्रमाणे व्यवहारांसाठी वापरले जाईल, क्रिप्टो मात्र तसे वापरले जाऊ शकत नाही. सीबीडीसी हे रिझर्व्ह बँकेने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केलेले कायदेशीर चलन आहे. सीबीडीसी हे अधिकृतरीत्या मान्य चलनाप्रमाणे काम करेल आणि सीबीडीसी व अधिकृत चलन यांची देवाणघेवाण करता येईल. फक्त त्यांचे स्वरूप वेगळे आहे. थोडक्यात सीबीडीसी, म्हणजे बिटकॉइन नाही. बिटकॉइनवर कोणाचेही नियंत्रण नसते. तर सीबीडीसी हे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणात असून त्याचे नियमनदेखील केले जाईल.
हेही वाचा >>> विश्लेषण : बँक खातेदारांना आता चार नॉमिनेशन्सची मुभा… नवीन बँकिंग कायद्यात आणखी काय बदल?
आभासी चलनांचे भवितव्य काय?
जगभरात सुमारे नऊ हजारांपेक्षा अधिक आभासी चलनांमध्ये (क्रिप्टोकरन्सी) व्यवहार होत आहेत. कोणत्याही मध्यवर्ती यंत्रणेच्या हस्तक्षेपाशिवाय पैशाचे हस्तांतर वेगवान व किफायतशीरपणे या आभासी चलनाच्या माध्यमातून पार पडते. दोन वर्षांपूर्वी आघाडीचा आभासी चलन मंच असलेल्या एफटीएक्स हे दिवाळखोरीत गेल्यामुळे एकूणच क्रिप्टो उद्योगामध्ये गेल्या वर्षी असुरक्षितता निर्माण झाली होती. बिटकॉइन १७,००० डॉलरपर्यंत घसरला होता. मात्र त्याने पुन्हा भरारी घेत लाखाचा टप्पा गाठला. त्यामुळे कोणत्याही एका घटनेने संपूर्ण परिसंस्था धोक्यात येत नाही. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या अहवालानुसार, आजमितीस जगभरात ९०.४ लाख कोटी डॉलर व्यवहारात असून यात एक लाख आभासी चलन आहे. तर ‘रिसर्च अँड मार्केट्स’च्या अहवालानुसार, २०२७ पर्यंत जागतिक क्रिप्टो बाजारपेठ ३२.४ लाख कोटी डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. बदलत्या काळानुसार पैशाचे देशांतर्गत व सीमापार वेगवान हस्तांतरण, गुंतागुंतरहित सहजसुलभ व्यवहार ही आजची गरज बनली आहे. त्यामुळे एकदा आर्थिक घोटाळा झाला म्हणून क्रिप्टोकरन्सींचा अस्त होणार नाहीये. शिवाय कोणतेही तंत्रज्ञान हे अविनाशी असते. म्हणूनच संपूर्ण व्यवस्थेला दोष न देता सरकारने या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते व्यवहार अधिक सुरक्षित करून गुंवतवणूकदारांचे हित जपले पाहिजे.