हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रापाठोपाठ बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल अशी चर्चा सुरू आहे. संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेले काही दिवस मौन बाळगले आहे. विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीचे ते शिल्पकार मानले जातात. अशा वेळी नितीश आता काय करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ते पुन्हा भाजपकडे जाणार काय, जनता दलामध्ये फूट पडणार का, याची चर्चा सुरू आहे. कारण नितीशकुमार यांनी यापूर्वी दोनदा भाजपची साथ सोडली व पुन्हा आघाडी केली. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे तेथील राजकारणात काही तरी घडेल, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काय सुरू आहे बिहारमध्ये?

भाजपने दोन आठवड्यांपासून नितीश यांच्याविरोधातील टीकेचा रोख सौम्य केल्याचा दाखला माध्यमांतून दिला जात आहे. पक्षातील फुटीच्या कथित वृत्तामुळे नितीशकुमार यांनी त्यांच्या संयुक्त जनता दलामधील सर्व आमदारांशी वैयक्तिक चर्चा केली. त्यामुळे आमदारांचा कल त्यांच्या लक्षात येतो हा एक त्यांचा कयास. नितीश यांचा संयुक्त जनता दल तसेच लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल यांच्यात अतिरिक्त मुख्य सचिव के.के.पाठक यांच्या काही निर्णयांमुळे संघर्ष सुरू आहे. पाठक शिस्तप्रिय तसेच स्वच्छ प्रतिमेचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या काही निर्णयांमुळे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी संताप व्यक्त केला. शिक्षक भरतीत बाहेरील राज्यातील व्यक्तींना संधी देण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला.

चंद्रशेखर हे राष्ट्रीय जनता दलाचे आहेत. या वादात जनता दलाच्या काही मंत्र्यांनी पाठक यांची बाजू घेतली, त्यातून वाद वाढला. शिक्षणमंत्र्यांनी नितीशकुमार यांच्याकडे तक्रार केली. जनता दलाचे नेते व मंत्री अशोक चौधरी तसेच राष्ट्रीय जनता दलाचे विधान परिषद सदस्य सुनील सिंह यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मग आपसूक फुटीच्या चर्चांना उधाण आले. नितीशकुमार दबावतंत्राचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जातो. आपल्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत असाच त्यांचा संदेश आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव वाढल्याने नितीश यांच्यासारख्या अनुभवी राजकारण्याने मौनात जाणे पसंत केले. अर्थात आता तेजस्वी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याने मुख्यमंत्रीपद देण्याचा हा दबाव कमी झाला आहे.

मोठ्या संधीची अपेक्षा…

विरोधकांच्या ऐक्यातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोठी जबाबदारी मिळेल अशी नितीश यांना अपेक्षा आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकसभेला भाजपविरोधात एकास-एक उमेदवार देण्याची त्यांची कल्पना आहे. २०१४ मध्ये नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आल्यावर १५ वर्षे असलेली भाजपशी आघाडी तोडली होती. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी आघाडी केली. २०१७ मध्ये आयआरसीटीसी घोटाळ्यात तेजस्वी यांच्यावर आरोप होताच त्यांनी राजीनामा दिला होता. पुन्हा भाजपशी आघाडी करून ते मुख्यमंत्री झाले. २०२० मध्ये भाजपबरोबर लढून सरकार स्थापन केले. पुन्हा २०२२ मध्ये राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी केली. पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे नितीश हे धरसोड वृत्तीचे असल्याची टीका विरोधक करतात. तर तेजस्वी यादव यांनी गेल्या चार वर्षांत बिहारच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. गेल्या निवडणुकीत विधानसभेला सर्वांत मोठा पक्ष म्हणून तो पुढे आला.

विश्लेषण : सत्तेतील ‘दादा’ प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात भाजपचे बळ वाढेल?

राजदला प्रतीक्षा

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वाधिक ७९ आमदार आहेत. तर भाजपचे ७८ तसेच संयुक्त जनता दलाचे ४५ सदस्य असून, काँग्रेस १९ तर डाव्या पक्षांचे १६ जण आहेत. थोडक्यात राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी केवळ ९ आमदारांची गरज आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यांनी भाजप-जनता दलाच्या विरोधात एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली होती. राज्यात विधानसभेच्या २४३ जागा आहेत. काँग्रेस तसेच डावे पक्ष त्यांच्याबरोबर आहेत. तेजस्वी हे मुख्यमंत्री होतील अशी अटकळ बांधली जात होती. यात नितीशकुमार यांच्या पक्षाचे आमदार अस्वस्थ असल्याची दावा विरोधी गोटातून सातत्यातून होत आहे. विशेषत: लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान किंवा राष्ट्रीय लोक जनता दलाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह हे दोघेही नितीश यांचे कडवे टीकाकार आहेत. त्यांनी नितीश यांना लक्ष्य केले. आता कुशवाह तसेच चिराग पासवान भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वाटेवर आहेत. तेजस्वी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुढे काय?

बंगळूरुमध्ये १७ व १८ जुलै रोजी विरोधी पक्षांची दुसरी बैठक होत आहे, त्यापूर्वी जनता दल तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे विरोधी ऐक्याचे काय, असा प्रश्न आहे. मात्र विरोधी गटाचे नेते पर्यायाने भावी पंतप्रधान अशी नितीश यांची प्रतिमा रंगवली जात आहे. त्यामुळे ते महाआघाडी सोडण्याची शक्यता कमी आहे. मात्र दबाव वापरून पक्ष एकजूट ठेवणे तसेच मुख्यमंत्री शाबूत ठेवण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. संयुक्त जनता दलात नितीश यांच्या तोडीचा एकही मोठा नेता नाही. त्यामुळे आमदार फुटणे तूर्तास ते कठीण आहे. फुटीरांना नेता तर हवा ना? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच नवी समीकरणे आकाराला येण्याची शक्यता आहे.