हृषिकेश देशपांडे
महाराष्ट्रासह झारखंड तसेच हरियाणा या राज्यांमध्ये वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. या तीनपैकी महाराष्ट्रात भाजप तसेच मित्रपक्षांची सत्ता आहे. तर हरियाणात भाजप सरकार कसेबसे तगून आहे. झारखंडमध्ये विरोधी इंडिया आघाडीमधील पक्षांचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यांत पुन्हा एकदा सत्ताधारी तसेच विरोधकांमधील राजकीय बळ आजमावले जाणार आहे.
हेमंत सोरेन यांच्याकडेच पुन्हा सूत्रे
भाजपला यापैकी झारखंडमध्ये सत्ता मिळण्याची सर्वाधिक आशा आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र हाच मुद्दा भाजप उचलण्याची शक्यता आहे. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर पक्षातील ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. मात्र हेमंत यांना जामीन मिळताच लगेच त्यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले. चंपाई यांच्यासारख्या सामान्य आदिवासी कार्यकर्त्याचा हा अपमान आहे असा भाजपच्या टीकेचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीने जरी राज्यातील १४ पैकी ९ जागा जिंकल्या असल्या तरी आदिवासी बहुल पाच जागांवर पक्षाला यश मिळाले नाही. हेमंत सोरेन यांना अटकेची सहानुभूती काही प्रमाणात मिळाली. झारखंडमध्ये जवळपास २५ टक्के आदिवासी आहेत. भाजपला जर ही मते मिळवता आली नाहीत तर सत्ता मिळणे अशक्य आहे. गेल्या वेळी भाजपने बिगर आदिवासी मुख्यमंत्री देण्याचा प्रयोग केला तो फसला. यंदा पक्ष त्यातून धडा घेत आहे. रघुवर दास यांच्याकडे राज्याची धुरा होती, यातून आदिवासींमध्ये नाराजी वाढल्याचा फटका भाजपला बसला.
हेही वाचा >>> विश्लेषण : कमला हॅरिस जो बायडेन यांची जागा घेऊ शकतील का? डेमोक्रॅटिक पक्षात त्यांच्या नावाला का मिळतेय वाढती पसंती?
शिवराजसिंह चौहान प्रभारी
मध्य प्रदेशात दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद सांभाळलेले, व्यापक जनाधार असलेले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान ऊर्फ मामाजी यांच्याकडे प्रभारीपद सोपवत भाजपने मोठी खेळी केली. चौहान यांना निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. कारकीर्दीत चौहान यांनी अपवादात्मकरीत्या पराभव पाहिले आहे. त्यांच्या जोडीला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांची निवड करण्यात आली. सरमा हे काँग्रेसमधून आले असले तरी, राज्यात कट्टर हिंदुत्ववादी अशी त्यांची प्रतिमा आहे. पक्षाला यश मिळवून देणाऱ्या दोन प्रमुख नेत्यांवर झारखंडसाठी विश्वास टाकण्यात आला आहे. त्यात माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी हे राज्यातील पक्षाचा चेहरा म्हणून पुढे आहेत. ते आदिवासी समुदायातून येतात. विरोधी इंडिया आघाडीची एकजूट आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात सत्ताविरोधी नाराजी असली तरी, भाजपचा मार्ग सोपा नाही. हेमंत सोरेन यांच्या अटकेने भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करते या विरोधकांच्या आरोपाला लोकसभा निवडणुकीत झारखंडच्या मतदारांनी काही प्रमाणात प्रतिसाद दिला. अर्जुन मुंडा यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव झाला. आता सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजप प्रचारात करणार हे उघड आहे. मात्र चंपाई यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणे झारखंड मुक्ती मोर्चाला धोकादायक वाटत होते. त्यातून गडबडीने हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यातून पक्षावर घराणेशाही तसेच एका कुटुंबाचा पक्ष असल्याचा आरोप भाजपने केला. हेमंत हे ज्येष्ठ नेते शिबु सोरेन यांचे पुत्र आहेत. राजकारणापायी सोरेन कुटुंबातही फूट पडली आहे. त्यांच्या वहिनी भाजपमध्ये आहेत. एकूणच शिवराजमामा आणि हेमंत बिस्व सरमा यांची जोडी झारखंडमध्ये भाजपला प्रचारात नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल.
हरियाणात स्वबळाची परीक्षा
हरियाणात सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. मात्र काही जागांवर दुष्यंत चौताला यांचा जननायक जनता पक्ष तसेच आम आदमी पक्षाचा प्रभाव दिसेल. काँग्रेसने विधानसभेला आम आदमी पक्षाशी आघाडीची शक्यता फेटाळली. लोकसभेला राज्यातील एक जागा काँग्रेसने आपला सोडली होती. लोकसभेला राज्यातील दहापैकी भाजप व काँग्रेसला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. गेल्या वेळी भाजपने सर्व दहा जिंकल्या होत्या. मात्र यंदा हे बळ निम्म्यावर आले. यामुळे काँग्रेसला सत्तेची आशा आहे. मात्र पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा तसेच माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार शैलजा यांच्यात अंतर्गत संघर्ष असल्याचे सांगितले जाते. भाजपची राज्यात दहा वर्षे सत्ता आहे. शेतकरी आंदोलनामुळे नाराजी तसेच बेरोजगारी व महागाई हे मुद्दे विधानसभेसाठी भाजपला अडचणीचे आहेत. जवळपास नऊ वर्ष मुख्यमंत्रीपदभूषवल्यानंतर भाजपने मनोहरलाल यांना बाजूला केले. त्यांना केंद्रात मंत्रीपद देत नायबसिंह सैनी या इतर मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपद दिले. मात्र अद्यापही मनोहरलाल यांचे प्राबल्य राज्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप एकजुटीने निवडणुकीला सामोरा जाणार का, हा प्रश्न आहे.
हेही वाचा >>> ब्रिटनमध्ये मजूर पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार… कीर स्टार्मर!
जातीय समीकरणे
संबंधित राज्यातील प्रभावी जातीमधील नेता मुख्यमंत्रीपदी निवडायचा नाही असा भाजपचा कल राहिला. या रणनीतीचा काही ठिकाणी लाभ झाला. कारण यातून आतापर्यंत सत्तेत फारसे स्थान न मिळालेल्या जातींना त्यामुळे संधी मिळाली. हरियाणाच्या राजकारणावर जाटांचे प्राबल्य आहे. मात्र भाजपने मनोहरलाल खट्टर यांच्यासारख्या बिगर जाट व्यक्तीला हरियाणाचा मुख्यमंत्री केले. आताही नायबसिंह सैनी हे जाट नाहीत. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार भूपिंदरसिंह हुडा असो किंवा माजी उपमुख्यमंत्री व जननायक जनता पक्षाचे दुष्यंत चौताला तसेच लोकदलाशी संबंधित असलेले अन्य चौताला कुटुंबीय हे सारे जाट समुदायातून येतात. काँग्रेस कोणताही चेहरा समोर न ठेवता निवडणुकीला सामोरा जाईल. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावे निवडणूक लढवणार हे उघडच आहे. दिल्लीलगतचे राज्य म्हणून हरियाणाचे महत्त्व आहे. निवडणुकीच्या तोंडावर दुष्यंत चौताला यांचा पक्ष भाजपच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडला. राज्यात विधानसभेला चौरंगी लढत अपेक्षित आहे. भाजप, काँग्रेससह चौताला यांचा पक्ष तसेच आप असा हा सामना होईल. मात्र लोकसभा निकाल पाहता महाराष्ट्रासह झारखंड असो किंवा हरियाणा भाजपपुढे मोठे आव्हान आहे.
hrishikesh.deshpande@expressindia.com