देशाचे पंतप्रधान ठरविणारे उत्तर प्रदेश हे महत्वाचे राज्य आपण खिशातच टाकले आहे, अशा आविर्भावात भाजप नेते होते. पण त्यांच्या विश्वासाला सुरुंग लागला आणि अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह भाजपच्या अनेक उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. ‘पंतप्रधानपदाचे मोदींचे वारसदार’ अशी प्रतिमा उभारणी सुरू असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही हा धक्का आहे. या राज्यात ५० पर्यंतही मजल मारता न आल्याने भाजपचे राष्ट्रीय गणितच विस्कटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनपेक्षित निकाल का लागला?

उत्तर प्रदेश हा गेली काही वर्षे भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांची पाळेमुळे खिळखिळी झाली होती. योगी आदित्यनाथ हे १९ मार्च २०१७ पासून मुख्यमंत्रीपदी आले, २०२२ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आले आणि भाजपची ताकद वाढत गेली. त्यातच अयोध्येतील राममंदिराचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा झाला आणि मंदिराची उभारणी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून पुन्हा उभे राहिले. मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशावरील पकड मजबूत असल्याने समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांची ‘सायकल’ चालणार नाही, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र भाजप नेत्यांचा अतिआत्मविश्वास किंवा अहंकार, योगी सरकारचा कारभार व बुलडोझर कारवायांमुळे निर्माण झालेले वाद, जातीपातीचे राजकारण यामुळे उत्तर प्रदेशात अनपेक्षित निकाल लागले.

हेही वाचा…चंद्राबाबूंनी कसे दाखवले जगनमोहनना अस्मान? आंध्रमध्ये सत्ताबदलाची परंपरा कायम!

राममंदिर फळले नाही?

अयोध्येत राममंदिराची उभारणी झाली आणि हा सोहळा मोठ्या दिमाखात करण्यात आला. राममंदिर हा आमच्या दृष्टीने राजकीय विषय नसून धार्मिक असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले, तरी हिंदुत्व आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी राममंदिर उभारणीच्या मुद्द्याचा भाजपने निवडणुकीत वापर केला. मात्र राममंदिराचा मुद्दा उत्तर प्रदेशातच फारसा चालला नाही. भाजपने प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या ‘रामायण ’ मालिकेत श्रीरामांची भूमिका केलेल्या अरुण गोविल यांना मीरतमधून उमेदवारी दिली. मात्र रामाची जादू चाललीच नाही.

हे मोदी सरकारविरोधातील जनमत ठरते?

उत्तर प्रदेशातील धक्कादायक निकाल हे मोदी-योगी सरकारविरोधातील जनमत मानता येऊ शकेल. गेल्या २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे मोदी लाट होती, तशी यंदाच्या निवडणुकीत नव्हती. मात्र आणीबाणीनंतर आणि राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सप्रकरणी झालेल्या आरोपांनंतर तत्कालीन केंद्र सरकारविरोधात जशी नाराजीची लाट होती, तसे मोदीविरोधी वातावरण नसल्याचा दावा भाजप नेते ४०० पारचा दावा करताना करीत होते. उलट मोदी हे विश्वगुरू आहेत आणि जगातील अनेक देशांचे प्रमुख नेते त्यांचे नेतृत्व वाखाणत आहेत, अशी प्रतिमा भाजपकडून तयार करण्यात आली होती. मात्र मोदी सरकारवर जनता नाराज आहे आणि अहंकार सहन करीत नाही, असे चित्र उत्तर प्रदेशसह काही राज्यांमधील धक्कादायक निकालांमधून दिसून येते.

हेही वाचा…Lok Sabha Election Results 2024 : मतमोजणीच्या दिवशी नेमके काय घडले?

योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात नाराजी?

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील गुंडगिरीला मोठ्या प्रमाणावर आळा घातला. त्यांनी अनेक माफियांविरोधात बुलडोझर कारवाई करून त्यांच्या गढ्या व वाडे उद्ध्वस्त केले. अनेक गुंडांना पोलिसांनी चकमकीत ठार मारले. पण ही पद्धती सतत वादात राहिली. पूर्वांचलसारख्या मागास राहिलेल्या भागाला जोडणाऱ्या द्रुतगती मार्गासह तीन महत्त्वाकांक्षी मार्ग उभारले. भरीव विकासकामे करून दाखविली, त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करुन रोजगारनिर्मितीही केली आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे फारसे आरोपही झाले नाहीत. मात्र जातीपातीच्या राजकारणात त्यांचे आडाखे चुकले. अखिलेश यादव यांची ताकद जोखण्यातही भाजप कमी पडले. पोलिस चकमकींवरून आणि सरकारच्या कारवायांवरून मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. मोदी-योगी सरकारविरोधातील वातावरण, इंडिया आघाडीने केलेले बेरजेचे राजकारण व अन्य बाबींमुळे भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला.

हेही वाचा…भारताचे पंतप्रधान प्रामुख्याने उत्तर प्रदेशातूनच का निवडले जातात?

आदित्यनाथ यांच्या महत्त्वाकांक्षेला धक्का?

योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रीपदाला या निकालामुळे फटका बसण्याची चिन्हे नसली तरी त्यांची पंतप्रधानपदासाठीचे उत्तराधिकारी या प्रतिमेला मात्र निश्चित धक्का बसणार आहे. उत्तर प्रदेशसारख्या सर्वाधिक ८० खासदार देणाऱ्या राज्यात रालोआचे गेल्या निवडणुकीत ६२ खासदार निवडून आले होते. हे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर घटले असून त्याची जबाबदारी योगी आदित्यनाथांवरही काही प्रमाणात टाकली जाईल. केंद्रीय पातळीवरील पक्षांतर्गत स्पर्धेमध्ये योगी आदित्यनाथ यांना या निकालाचा फटका काही प्रमाणात बसू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s shocking result in uttar pradesh yogi adityanath and narendra modi wave fails to sway voters print exp psg
Show comments