दिल्लीतील सामूहिक धर्मांतराच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठली आहे. या धर्मांतरावरुन दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून भाजपाने राजधानीतील आम आदमी पक्षाच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. ५ ऑक्टोबरला दिल्लीतील सामूहिक धर्मांतर कार्यक्रमात हजारो हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला. या कार्यक्रमातील उपस्थितीवरून टीका झाल्यानंतर आप नेते राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
“भाजपा कार्यकर्ते मला भेटतात आणि सांगतात…”, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा
सामूहिक धर्मांतर कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
५ ऑक्टोबरला दिल्लीतील आंबेडकर भवनातील सामूहिक धर्मांतर कार्यक्रमात १० हजार लोक जमले होते. या कार्यक्रमात हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला. यापुढे हिंदू देवांची पूजा करणार नसल्याची शपथ घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. “माझा ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वरावर विश्वास राहणार नाही. त्यांची मी पूजाही करणार नाही. माझा राम आणि कृष्णावरही विश्वास राहणार नसून त्यांचीही मी पूजा करणार नाही”, अशा आशयाची शपथ इतर लोकांसोबत आप नेते राजेंद्र पाल गौतम घेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
या शपथेनंतर गौतम यांनी ट्विटरवर या कार्यक्रमाचा फोटो पोस्ट केला आहे. ‘बुद्धांच्या दिशेने जाणाऱ्या मिशनला सुरुवात करुया, जय भीम’ असे कॅप्शन त्यांनी यावर दिले आहे. या कार्यक्रमात १० हजार लोकांनी जातीमुक्त आणि अस्पृश्यतामुक्त भारत बनवण्याची शपथ घेतली आहे, असे गौतम यांनी म्हटले होते.
विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या
भाजपाने आपवर काय आरोप केले आहेत?
धर्मांतराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. दिल्ली सरकारकडून देश फोडण्याचे मिशन सुरू असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. “अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमडळातील मंत्री राजेंद्र पाल भारताला फोडण्याचा प्रकल्प राबवत आहेत. केजरीवाल हे हिंदूद्वेषी प्रचाराचे मुख्य प्रचारक आहेत, यात चूक करू नका”, असा हल्लाबोल मालवीय यांनी केला आहे.
आरोपांवर गौतम यांनी काय म्हटले?
“भाजपा देशविरोधी आहे. माझा बौद्ध धर्मावर विश्वास आहे. यापासून कोणाला काय समस्या असू शकते? भारतीय संविधानाने कोणत्याही धर्माचे वहन करण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे. भाजपाला आपची भीती वाटत आहे. ते आमच्या विरोधात खोट्या केसेस दाखल करू शकतात”, असे प्रत्युत्तर गौतम यांनी भाजपाला दिले आहे.