हृषिकेश देशपांडे
भारतीय जनता पक्षासाठी २०२४ मध्ये केंद्रात पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर तो मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे या राज्यातील लोकसभेच्या ८० जागांवर भाजपचे विशेष लक्ष्य आहे. उत्तर प्रदेश विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सहा सदस्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात भाजपने जातीय संतुलन राखण्यावर भर दिला आहे. दोन इतर मागासवर्गीय समाजांतील व्यक्ती तसेच दलित व पसमंदा मुस्लीम, ब्राह्मण व वैश्य अशा विविध समाजघटकांना संधी देण्यात आली आहे. भाजपने सामाजिक समीकरणांबरोबरच ‘सबका साथ…’ या आपल्या घोषणेला अनुसरून अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांना वरिष्ठ सभागृहात पाठवले आहे. भाजप हा मुस्लीमविरोधी नाही हा संदेश या नियुक्तीतून पक्षाने दिला आहे.
कोण हे तारिक मन्सूर?
उत्तर प्रदेश विधासभा निवडणुकीत गेल्या वर्षी भाजपने पुन्हा सत्ता राखली, मात्र ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशात विधानसभेत एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली नाही म्हणून टीका झाली. योगी आदित्यनाथ यांच्या नव्या मंत्रिमंडळात दानिश अन्सारी या विद्यार्थी चळवळीतून आलेल्या युवा कार्यकर्त्याला स्थान मिळाले. योगींच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत मोहसीन रझा यांना स्थान मिळाले होते. आता त्यांच्या जागी अन्सारी हा एकमेव मुस्लीम चेहरा मंत्रिमंडळात आहे. राज्यात १९ टक्के मुस्लीम आहेत, तरीही त्यांचे प्रतिनिधित्व कमी आहे अशी टीका होत होती. आता भाजपने त्या दृष्टीने पावले टाकली आहेत. आपली मुस्लीमविरोधी प्रतिमा पुसून टाकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले तारिक मन्सूर यांच्या रूपाने भाजपने नवा चेहरा पुढे आणला आहे. त्यांच्याकडे कदाचित दिल्लीत एखाद्या आयोगाचे अध्यक्षपद दिले जाईल अशी चर्चा आहे. मन्सूर यांचा उपयोग लोकसभेच्या प्रचारात पक्षाला होऊ शकतो.
जुन्या कार्यकर्त्यांना संधी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्र यांचे पुत्र साकेत यांना विधान परिषदेवर घेत ब्राह्मण समुदायाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. साकेत हे बँकिंग क्षेत्रातील जाणकार आहेत. तसेच पूर्वांचल विकास मंडळाचे ते सदस्य आहेत. उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाज संख्येने बऱ्यापैकी आहे. हा समाज नाराज होणार नाही याची दक्षताही घेण्यात आली. एकीकडे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीला संधी देत असताना सामान्य कार्यकर्ता दुर्लक्षित राहणार नाही याची खबरदारी भाजपने या नियुक्तीत घेतली.
वैश्य, दलित चेहरे…
वैश्य समुदायातून आलेल्या रजनीकांत माहेश्वरी यांसारख्या जुन्या कार्यकर्त्याला भाजपने न्याय दिला. हंसराज विश्वकर्मा या कल्याण सिंह यांच्या निकटवर्तीयालाही पक्षाने विधान परिषदेवर पाठवले. १९८९ मध्ये त्यांनी पक्षाच्या कामाला सुरुवात केली. याखेरीज आंबेडकर महासभेचे अध्यक्ष लालजी निर्मल यांचीही निवड करण्यात आली. तसेच आझमगड येथील वकील रामसूरज राजभर या जुन्या कार्यकर्त्याला आमदारकी दिली. विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. एकूणच विधान परिषदेतील या नियुक्त्या पाहता भाजपचे राज्यातील राजकारणात जातीय संतुलन ठेवत, छोट्या समुदायांना पदे देत त्यांना पक्षाशी जोडून ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशात विधान परिषदेची सदस्यसंख्या १०० आहे. त्यात राज्यपाल नियुक्त दहा सदस्य असतात. सध्याचे बलाबल पाहता भाजपचे ७४ तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे ९ सदस्य आहेत. उर्वरित अपक्ष तसेच इतर आहेत.