-अमोल परांजपे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिमिया भागाला रशियाच्या मुख्य भूमीशी जोडणारा पूल स्फोटात उद्ध्वस्त झाला. शनिवारी झालेल्या या घटनेमुळे रशियाला दुहेरी हादरा दिला आहे. एकतर दक्षिण आघाडीवरील रसद तुटली आहे आणि मुख्य म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रतिष्ठेला यामुळे तडा गेला आहे.

क्रिमिया पुलाचा इतिहास काय आहे?

२०१४मध्ये रशियाने क्रिमिया हा युक्रेनचा प्रांत आपल्या देशात विलीन केला. त्यानंतर चार वर्षांनी, २०१८ साली क्रिमियाला रशियाच्या मुख्य भूमीशी जोडणारा क्रेंच सामुद्रधुनीवरील रस्ता आणि रेल्वे असा हा दुहेरी पूल सुरू झाला. ३.६ अब्ज डॉलर खर्चून पुतिन यांचे ज्युडोमधले सहकारी अर्काडी रोटेनबर्ग यांच्या कंपनीने हा पूल उभारला होता.

पुतिन यांच्या स्वाभिमानावर आघात?

या पुलाच्या उद्घाटनाला स्वत: पुतिन यांनी रशियातून क्रिमियामध्ये ट्रक चालवत नेला होता. क्रिमियाच्या यशस्वी विलिनीकरणाचे प्रतीक म्हणून हा पूल उभा होता. अर्धवट पाण्यात कोसळलेला आणि आगीचे लोळ उठत असलेल्या पुलाची दृश्ये रशियाच्या मानसिकतेवर मोठा आघात करणाची ठरणार आहेत. यामुळे रशियाचे खरे नुकसान हे युद्धभूमीत होणार आहे. 

रशियाचे सामरिक नुकसान किती?

डोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांतांमध्ये रशियाच्या सैन्याची पीछेहाट सुरू आहे. दक्षिणेकडील प्रांतांमध्ये लढत असलेल्या सैन्याला अन्नधान्य, शस्त्रास्त्रांचा पुरवठा हा प्रामुख्याने क्रिमियामार्गे होत होता. पूल पडला असला तरी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य रस्ते आणि सागरी मार्गांचे पर्याय उपलब्ध असून पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. मात्र तो वेळखाऊ मार्ग असल्यामुळे झापोरीझ्झिया आणि खेरसनमध्ये लढणाऱ्या सैनिकांना फटका बसू शकतो. काळ्या समुद्रातील रशियाच्या नौदलाचा महत्त्वाचा तळ सेवास्टोपोल क्रिमियामध्ये आहे. तिथल्या पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. 

पूल पुन्हा पूर्ववत कधी होणार?

पूल दुरुस्त होण्यास नेमका किती कालावधी लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुलाचे एकूण तीन भाग आहेत. रशिया आणि क्रिमियाच्या दिशेला जाणारे दोन रस्ते आणि तिसरा रेल्वेमार्ग. स्फोटामध्ये यातल्या एका भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे आता उर्वरित चांगल्या मार्गिकेवरून दोन्ही दिशांची वाहतूक एकाआड-एक पद्धतीने सुरू झाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक मात्र जहाजांच्या माध्यमातून होणार आहे. रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. सामान्य स्थितीत यामुळे फारसा फरक पडला नसता. मात्र युद्धात गुंतलेल्या रशियाला यामुळे नुकसान सहन करावे लागू शकते.

पूल पाडण्यामागे कुणाचा हात?

युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे वरिष्ठ अधिकारी या पुलाचे सामरिक महत्त्व आणि त्यावर हल्ला करण्याची भाषा करत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे संशयाची सुई ही युक्रेनकडेच जाते. क्रिमियामधील रशियाधार्जिण्या पार्लमेंटनेही युक्रेनकडेच बोट दाखवले असले तरी रशियाने मात्र कुणावर आरोप केलेला नाही. मात्र पूल युद्धात पाडलेला नसल्याने परिस्थिती थोडी वेगळी आहे.

युक्रेन आणि रशियाची प्रतिक्रिया काय?

रशिया आणि पुतिन यांच्या मानचिन्हावर घाला घातला गेल्यामुळे युक्रेनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पेटलेल्या क्रिमिया पुलाचे मोठे फोटो राजधानी कीव्हमध्ये जागोजागी झ‌ळकले आणि नागरिकांनी रांग लावून त्यासमोर सेल्फी घेतले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी पूल उद्ध्वस्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना आपला हात नसल्याचे सांगितले. रशियामध्ये अर्थातच संतापाची भावना आहे. त्यामुळेच हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी रशियाने युक्रेनच्या ताब्यात असलेल्या नागरी वस्त्यांवर हल्ले वाढवले. 

‘घातपात’ ही अतिरेकी कारवाई समजली जाईल?

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. युक्रेनने क्षेपणास्त्र डागून किंवा लढाऊ विमानांद्वारे पूल उद्ध्वस्त केला असता, तर ते संपूर्णत: समर्थनीय ठरले असते. मात्र हा पूल पाडण्यात आला तो ट्रकमध्ये स्फोट घडवून… स्फोटाची वेळही अचूक साधण्यात आली. इंधनाने भरलेली मालगाडी जात असतानाच स्फोट घडवला. त्यामुळे अधिक नुकसान झाले. एका अर्थी हे युद्ध नसून ‘घातपात’ आहे. सामान्य परिस्थितीत याला ‘अतिरेकी कारवाई’ही म्हटले गेले असते.

‘घातपाता’मागे युक्रेन की आणखी कुणी?

क्रिमिया रशियाच्या ताब्यात असला तरी तिथे युक्रेनचे छुपे समर्थक असतील, यात शंका नाही. युक्रेनने त्यांना स्फोटके पुरवून हा कट केलेला असू शकतो. मात्र क्रिमिया रशियाच्या ताब्यात असल्यामुळे युद्धाच्या स्थितीत युक्रेन आणि क्रिमियामधील सीमा इतक्या खुल्या असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मग रशियामधील युद्धविरोधी गटांनी हे कृत्य केले का, अशीही शंका येऊ लागली आहे.

रशियामधील युद्धविरोधी गटांनी स्फोट घडवला?

लांबलेले युद्ध, आर्थिक निर्बंधांमुळे वाढती महागाई, रणांगणावर रशियाची पीछेहाट, राखीव सैन्य वापरण्याची घोषणा आणि पुतिन यांची एकाधिकारशाही यामुळे रशियामध्ये युद्धविरोधी आवाज वाढतो आहे. अशापैकी कुणी क्रिमिया पूल उडवून युद्धात रशियाला अधिक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी शंका घेतली जाते आहे. 

रशिया ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी’?

रशियातील सरकारविरोध मोर्चे, निदर्शनांकडून घातपातापर्यंत पोहोचणे पुतिन यांची डोकेदुखी वाढवणारे आहे. युद्धाच्या धामधुमीत अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय रशियाने फोडलेल्या क्रिमिया प्रांताची भेद्यता या घटनेने अधोरेखित केली आहे. युक्रेनचे आणखी चार प्रांत बळकावण्याऐवजी हाती असलेला क्रिमिया रशियाला गमवावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blast on bridge connecting the crimean peninsula to russia who and why it was done print exp scsg