Blood Donation Benefits to Donors : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’, असं नेहमीच म्हटलं जातं. पण आजही काही जण मनातील भीतीमुळे रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात. रक्तदान केल्यानं शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि नंतर अशक्तपणा येतो, असा समज आजही काहींच्या मनात आहे. परंतु, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण- रक्तदान केल्यानंतर दात्यांच्या शरीरातून बाहेर पडलेलं रक्त चार तासांत पुन्हा तयार होतं. एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, रक्तदान केल्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तसेच हृदयविकार, स्ट्रोक व कर्करोग यांचा धोकाही कमी होऊ शकतो. संशोधनात नेमक्या कोणकोणत्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
रक्तदानाचे फायदे काय?
सामान्यत: कोणत्याही माणसाच्या रक्तात लोहाचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे त्याला हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमितपणे रक्तदान केल्यानं शरीरातील लोहाचं अतिरिक्त प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुदृढ राहतं आणि हृदयविकाराचा धोका टळतो. वयानुसार, आपल्या रक्त तयार करणाऱ्या स्टेम पेशींमध्ये नैसर्गिकरीत्या उत्परिवर्तन होतं. ही प्रक्रिया क्लोनल हेमटोपोइसिस म्हणून ओळखली जाते. त्यातील काही उत्परिवर्तनांमुळे ल्युकेमियासारख्या आजारांचा धोका वाढतो. फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटच्या नवीन अभ्यासात नियमितपणे रक्तदान करणाऱ्यांच्या शरीरात कमालीचे बदल आढळून आले आहेत.
ल्युकेमिया म्हणजे नेमकं काय?
ल्युकेमिया हा एक प्रकारचा कर्करोग आहे, जो पांढऱ्या रक्तपेशींवर विपरीत परिणाम करतो. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी ६० हजारांहून अधिक लोकांना ल्युकेमिया होतो. वयानुसार ल्युकेमिया होण्याचा धोका वाढतो; परंतु २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्येही हा आजार विकसित होऊ शकतो. वास्तविक ल्युकेमिया हा रक्त आणि अस्थिमज्जाचा (बोन मॅरो) कर्करोग आहे. कर्करोग कुठेही होऊ शकतो; परंतु जेव्हा बोन मॅरोमध्ये ल्युकेमिया पेशींची असामान्य आणि जलद वाढ होते तेव्हा ल्युकेमिया विकसित होतो. जे लवकरच बोन मॅरोतील इतर सामान्य रक्तपेशींपेक्षा जास्त होते. ल्युकेमियामध्ये थकवा, वजन कमी होणे, वारंवार संसर्ग होणे, अशक्तपणा, ताप किंवा थंडी वाजणे, हाडे दुखणे व रक्तस्राव यांचा समावेश असू शकतो.
आणखी वाचा : कायदेशीररीत्या घरात किती रोख रक्कम ठेवता येते? त्याविषयी नियम काय सांगतो?
अभ्यासातून काय समोर आलं?
फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी रक्तदान करणाऱ्यांवर एक नवीन अभ्यास केला. या अभ्यासात ६० वर्ष वयोगटातील निरोगी पुरुष दात्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली. त्यातील एका गटातील पुरुष सलग ४० वर्षांपासून वर्षातून तीनदा नियमित रक्तदान करीत होते. तर, दुसऱ्या गटातील व्यक्तींनी एकूण पाच वेळा रक्तदान केलं होतं. विशेष बाब म्हणजे दोन्ही गटांमध्ये आनुवंशिक उत्परिवर्तनीय पेशींची संख्या समान होती; परंतु त्यांचे स्वरूप वेगवेगळं होतं. वारंवार रक्तदान करणाऱ्या जवळजवळ ५० टक्के रक्तदात्यांच्या शरीरात कर्करोगाशी संबंधित नसलेल्या विशिष्ट वर्गाचं उत्परिवर्तन होतं; तर कमी वेळा रक्तदान करणाऱ्यांच्या शरीरात हे प्रमाण फक्त ३० टक्के आढळून आलं.
रक्तदानामुळे कर्करोगाचा धोका टळतो?
नियमित रक्तदान केल्यानं रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे स्टेम सेल्सच्या आनुवंशिक संरचनेत संभाव्य फायदेशीर बदल होतात. या प्रक्रियेला क्लोनल हेमटोपोईसिस म्हणतात. जेव्हा पेशींमध्ये उत्परिवर्तन होतं, तेव्हा यातील काही उत्परिवर्तनीय पेशी त्यांना ल्युकेमिया किंवा रक्ताच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये रूपांतरित करतात. जर कोणी नियमितपणे रक्तदान करीत असेल, तर हे उत्परिवर्तन कर्करोगाच्या पेशींना रूपांतरित होण्यापासून थांबवतं, असंही या अभ्यासातून समोर आलं आहे.
प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये असं आढळून आलं की, नियमितपणे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या शरीरातील स्टेम पेशी अधिक निरोगी असतात. त्याशिवाय त्यांच्या शरीरात अधिक प्रभावी रक्तपेशी तयार होतात. या नवीन रक्तपेशी अधिक चांगल्या आणि निरोगी असतात. जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे रक्तदान करतो, तेव्हा त्याचं शरीर रक्तपेशी बदलण्याची प्रक्रिया सुरू करते, ज्यामुळे अस्थिमज्जा नवीन रक्तपेशी तयार करण्यास प्रवृत्त होते. ही नैसर्गिक नूतनीकरण प्रक्रिया कालांतरानं निरोगी आणि अधिक लवचिक रक्तपेशींना मजबूत करते.
रक्तदानामुळे इन्सुलिन सुधारते?
अभ्यासातील काही पुरावे असेही सूचित करतात की, रक्तदानामुळे इन्सुलिन सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यावर अद्यापही संशोधन सुरू आहे. रक्तदान आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य यांच्यातील संभाव्य संबंधाबद्दल शास्त्रज्ञ वर्षांनुवर्ष अनुमान काढत आहेत. हृदयरोगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रक्ताचा चिकटपणा. जेव्हा रक्त खूप जाड असते, तेव्हा ते कमी कार्यक्षमतेनं वाहतं. त्यामुळे रक्त गोठणं, उच्च रक्तदाब व स्ट्रोक यांचा धोका वाढतो. नियमित रक्तदान केल्यानं रक्ताचा चिकटपणा कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाला पंप करणं सोपं होतं आणि हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. नियमित रक्त तपासणीमध्ये रक्ताच्या अनेक प्रकारच्या चाचण्या आपोआप केल्या जातात.
हेही वाचा : Mounjaro Injection : वजन कमी करण्यासाठी अमेरिकन उतारा? नव्या औषधाचे काय फायदे-तोटे?
रक्तदानामुळे लोहाची पातळी होते नियंत्रित
रक्तदानामुळे शरीरातील लोहाची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. हा हृदयरोगाशी संबंधित आणखी एक घटक आहे, याचे पुरावे वाढत आहेत. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी लोह आवश्यक असलं तरी जास्त प्रमाणात लोह साचणं ही बाब ऑक्सिडेटिव्ह ताण व जळजळ यांच्याशी जोडलेली आहे. त्यामुळे दोन्ही हृदयरोगांना कारण ठरते. काही अभ्यासकांनी रक्तदान आणि कमी रक्तदाब यांच्यातील संभाव्य संबंध सुचवला आहे. रक्तदान हे औषधोपचार किंवा जीवनशैलीतील बदलांना पर्याय नसला तरी हृदयाच्या एकूण आरोग्यास मदत करण्याचा चांगला मार्ग आहे. रक्तदाते जेव्हाही रक्तदान करतात, तेव्हा त्यांची छोटीशी आरोग्याची तपासणी केली जाते. त्यामुळे रक्तदात्याला त्याच्या संभाव्य आरोग्य समस्यांची पूर्वसूचना मिळते.
रक्तदानाचे इतर फायदे काय?
रक्तदान करण्याआधी संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची नि:शुल्क तपासणी केली जाते. त्यानंतर तो रक्तदान करण्यासाठी पात्र आहे की नाही याबाबत माहिती मिळते. दीर्घकालीन आजार किंवा कर्करोगानं ग्रस्त असलेल्या लोकांना सहसा रक्तदान करण्याची परवानगी नसते. याचाच अर्थ असा की, जे लोक नियमितपणे रक्तदान करतात, ते सामान्य लोकांपेक्षा आधीच निरोगी असू शकतात. रक्तदान केल्यानं आरोग्याला थेट फायदे होतील की नाही याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रक्तदानामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. रक्तदान केल्यामुळे कर्करोग आणि अन्य रोगांचा धोका कमी होतो. नियमितपणे रक्तदान केल्यावर शरीरातील पेशी प्रोत्साहित होतात, ज्यामुळे शरीरिक फिटनेसही सुधारतो आणि रक्तस्राव नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.