एक भारतीय परिचारिका २०१८ पासून येमेनच्या तुरुंगात मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. या परिचारिकेचे नाव आहे निमिषा प्रिया. ती मूळ केरळची असून आपल्या परिवाराबरोबर येमेनमध्ये रहात होती. आर्थिक अडचणींमुळे तिचे कुटुंब भारतात परतले, मात्र निमिषा तिथेच राहिली. यादरम्यान २०१७ मध्ये एका हत्येप्रकरणी तिला दोषी ठरविण्यात आले. केरळच्या पलक्कड येथील रहिवासी असलेली प्रिया २०१७ मध्ये येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी दोषी आढळली होती. तिला देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात पकडण्यात आले होते आणि २०१८ मध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या प्रियाची आई येमेनमध्ये आहे, तिची फाशीची शिक्षा माफ करण्याचा प्रयत्न करत आहे. आता येमेनी तुरुंगातून निमिषा प्रियाच्या सुटकेबाबत प्राथमिक चर्चेसाठी केंद्राने निधी हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. ४० हजार डॉलर्सची रक्कम साना येथील भारतीय दूतावासाद्वारे संबंधित व्यक्तींना हस्तांतरित केली जाणार आहे. ब्लड मनीसाठी हा निधी दिला जाणार असल्याची माहिती आहे. इस्लामिक कायद्यातील ब्लड मनी म्हणजे काय? याद्वारे मृत्युदंडाची शिक्षा कशी माफ केली जाते? याविषयी जाणून घेऊ या.

हेही वाचा : उष्णतेची लाट, पूर, भूकंप यामुळे इन्शुरन्सची रक्कम वाढणार?

ब्लड मनी म्हणजे काय?

इस्लामिक कायदे खूप कठोर आहेत. एखादी व्यक्ती हत्याप्रकरणात दोषी आढळल्यावर तिला फाशीची शिक्षाच दिली जाते. जिवाच्या बदल्यात जिव असा कायदा अरब देशांमध्ये आहे. परंतु, तेथील ब्लड मनी या कायद्यानुसार, गुन्हेगाराची मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली जाऊ शकते. परंतु, यासाठी गुन्हेगाराच्या कुटुंबीयांची संमती आवश्यक असते. ब्लड मनीला दियादेखील म्हटले आहे. अरब देशांमध्ये ही संकल्पना खूप प्रचलित आहे. हत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ब्लड मनीला मान्यता दिल्यावर संबंधित व्यक्तीची फाशीची शिक्षा रद्द होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्लड मनी म्हणजे रक्ताच्या बदल्यात पैसा.

विशेष म्हणजे पवित्र इस्लामिक ग्रंथ कुराणमध्येही दिया म्हणून या संकल्पनेचा उल्लेख आहे. हत्येच्या प्रकरणांमध्ये तुमच्यासाठी बदला घेण्याच्या कायद्याविषयी सांगितले आहे. स्वतंत्र पुरुषासाठी स्वतंत्र पुरुष, गुलामासाठी गुलाम आणि स्त्रीसाठी स्त्री. परंतु, गुन्हेगाराच्या पालकाने जर त्याला माफ केले असेल, तर ‘ब्लड मनी’चा निर्णय घेतला जाऊ शकतो. ही तुमच्या प्रभूची दया आहे, असे त्यात म्हटले आहे.

विद्वानांचा असा विश्वास आहे की, यामागील कल्पना माफीला आणि गुन्हेगारांतील सद्गुणांना प्रोत्साहन देणे आहे, तसेच पीडितांच्या कुटुंबाला भरपाई देणारा न्याय प्रदान करणे आहे. शास्त्रवचनांमध्ये कोणतीही विशिष्ट भरपाईची रक्कम सांगण्यात आलेली नाही. काही इस्लामिक देशांनी मात्र किमान नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली आहे. निमिषा प्रकरणात आता दिले जाणारे ४० हजार डॉलर्स केवळ या कायद्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आहे. अखेरीस, प्रियाच्या कुटुंबाला मृत्यूदंड माफ करण्यासाठी जवळपास तीन लाख डॉलर्स ते चार लाख डॉलर्स द्यावे लागतील. २०२० मध्ये स्थापन झालेली ‘सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल’ आवश्यक निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

निमिषा प्रिया प्रकरण

पात्र परिचारिका झाल्यानंतर प्रिया २००८ मध्ये येमेनला गेली. २०११ मध्ये तिने केरळमधील टॉमी थॉमसशी लग्न केले. येमेनमध्ये तिने नर्स म्हणून काम केले, तर तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असायचा. प्रिया आणि टॉमी या दोघांनी स्वतःचा दवाखाना सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. परंतु, येमेनी कायद्यानुसार यासाठी त्यांना स्थानिकांची भागीदारी आवश्यक होती. येमेनमध्ये व्यवसायासाठी आवश्यक परवाने मिळविण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांची मदत आवश्यक असते. प्रिया ज्या क्लिनिकमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती, तेथे हे जोडपे तलाल अब्दो महदी या व्यक्तीकडे मदतीसाठी गेले. महदी २०१५ मध्ये प्रियाच्या मुलीच्या बाप्तिस्माला उपस्थित राहण्यासाठी केरळला आला होता. प्रिया येमेनला परतली असताना आंतरिक वादातून तिचा पती आणि मुलगी भारतात परतले.

हेही वाचा : NEET-UG पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड संजीव मुखिया कोण आहे?

येमेनमध्ये महदीने प्रियाचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याने एक नवीन दवाखाना उघडला, परंतु त्याने आपल्या उत्पन्नातील वाटा प्रियाला देण्यास नकार दिला. तसेच तिला पत्नी असल्याचे दाखवण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रेही तयार केली. प्रियाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर प्रियावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. महदीने तिची सर्व प्रवासी कागदपत्रे आणि पासपोर्ट घेतल्याने प्रिया निघू शकली नाही. केरळमधील तिच्या कुटुंबीयांबरोबर बोलण्यासाठीदेखील त्याने तिला अडवले. त्यामुळे महदी आणि प्रिया यांचे संबंध बिघडू लागले. एके दिवशी प्रियाने तिची कागदपत्रे परत मिळविण्यासाठी सहकारी नर्स हन्नानच्या मदतीने महदीला बेशुद्ध करण्याचे औषध दिले. परंतु, औषधाच्या ओव्हरडोझमुळे त्याचा मृत्यू झाला. घाबरून त्या दोघींनी महदीच्या मृतदेहाचे तुकडे करून, मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला. अखेर दोघींनाही अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood money in islamic law rac
First published on: 25-06-2024 at 15:36 IST