ब्लूस्मार्ट मोबिलिटी आणि जेनसोल इंजिनिअरिंग या कंपन्यांचे प्रवर्तक अनमोलसिंग जग्गी आणि पुनीतसिंग जग्गी हे बंधू सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी कंपन्यांतील निधी स्वत:च्या वापरासाठी वळविल्याचा आरोप आहे. आलिशान घरापासून ते महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी त्यांनी हे पैसे वापरले आहेत. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यातच भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने केलेल्या चौकशीत या बंधूंनी सगळ्यांनाच मूर्ख बनविल्याचे उघड झाले आहे. याचा फटका कंपनीच्या समभागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. ऑनलाइन टॅक्सी सेवा क्षेत्रातील ओला आणि उबरला प्रतिस्पर्धी मानली जाणारी ब्लूस्मार्टची सेवा यामुळे बंद पडली आहे. सेबीच्या चौकशीत काय? जग्गी बंधूंनी जेनसोलच्या माध्यमातून ९७८ कोटी रुपयांची कर्जे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (इरेडा) आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पीएफसी) यांच्याकडून घेतली आहेत. या कर्जातील मोठा भाग इलेक्ट्रिक मोटारी खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार होता. ही वाहने पुढे ब्लूस्मार्टला भाडेतत्त्वावर दिली जाणार होती. या कर्जातील ६६३ कोटी रुपयांतून ६ हजार ४०० ई-मोटारी खरेदी केल्या जाणार होत्या. प्रत्यक्षात ५६७ कोटी रुपये खर्च करून ४ हजार ७०४ ई-मोटारींची खरेदी करण्यात आली. एकूण कर्जातील २६२ कोटी रुपयांचा हिशेब लागलेला नाही. जग्गी बंधूंनी जेनसोलच्या निधीचा वापर स्वत:च्या व्यक्तिगत खर्चासाठी केल्याचे सेबीच्या चौकशीतून समोर आले आहे.
जेनसोलची वस्तुस्थिती काय?
जेनसोल ही कंपनी सौर ऊर्जा पर्यायांसह इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि ती भाड्याने देण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. दिल्लीत भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये यंदा जेनसोल इंजिनिअरिंगने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले होते. कंपनीने दोन ई-मोटारी सादर केल्या होती आणि त्यांचे उत्पादन काही महिन्यांत सुरू होईल, असे जाहीर केले होते. याचबरोबर कंपनीने ३० हजार ई-मोटारींची मागणी आल्याचेही म्हटले होते. प्रत्यक्षात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील जेनसोलच्या ई-मोटार उत्पादन प्रकल्पाची याच महिन्यात तपासणी केली. त्यावेळी प्रकल्पात केवळ दोन ते तीन कर्मचारीच हजर असल्याचे समोर आले. याचबरोबर कंपनीचे वार्षिक वीज देयक सुमारे दीड लाख रुपयांचे असल्याचे समोर आले. यातून कंपनीत वाहन निर्मिती होत नसल्याची बाब उघड झाली आहे.
दिशाभूल कशी केली?
जेनसोलने काही कंपन्यांसोबत केवळ ई-मोटारींच्या पुरवठ्यासाठी परस्पर सामंजस्य करार केले होते. त्याआधारे ३० हजार ई-मोटारींची मागणी नोंदविण्यात आल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात हे करार बंधनकारक नव्हते. त्यात मोटारींची किंमत आणि त्या हस्तांतरित करण्याची मुदतही देण्यात आलेली नव्हती. सेबीने केलेल्या चौकशीत जेनसोलने गुंतवणूकदार, नियामक आणि कर्जदारांची कार्यादेशात वाढ दाखवून दिशाभूल केल्याचे समोर आले. याचबरोबर जेनसोलने पतमानांकन संस्थांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.
पैशाचा वापर कुठे?
जग्गी बंधूंनी डीएलएफ गुडगावमधील कॅमेलियामध्ये आलिशान सदनिका विकत घेतली. यासाठी ९७ कोटी रुपये एका उपकंपनीत वळविण्यात आले. त्यातून ४३ कोटी रुपये डीएलएफला सदनिकेसाठी देण्यात आले. अमेरिकेतून जग्गी बंधूंनी २६ लाख रुपयांचा गोल्फ सेट मागविला होता. याचबरोबर जग्गी बंधूंनी त्यांची आई आणि पत्नीच्या नावावर ११ कोटी रुपये वळविल्याचेही समोर आले आहे.
कारवाई काय?
सेबीने जग्गी बंधूंना भांडवली बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. याचबरोबर आता सक्त वसुली संचालनालयाने जग्गी बंधूंची चौकशी सुरू केली आहे. जग्गी बंधूंच्या दिल्ली, गुडगाव आणि अहमदाबाद या शहरांतील मालमत्तावर छापे टाकण्यात आले आहेत. पुनीत जग्गी यांना या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही करण्यात आली आहे. करचुकवेगिरीसह परकीय चलन विनिमय कायद्यानुसार जग्गी बंधूंवर कारवाई केली जात आहे. सध्या अनमोल जग्गी हे परदेशात असूनही त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.
फटका किती?
राष्ट्रीय शेअर बाजारात जून २०२४ मध्ये जेनसोल इंजिनिअरिंगच्या समभागाचा भाव १ हजार १२४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. कंपनीने निधीचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर या समभागाच्या विक्रीचा मारा गुंतवणूकदारांकडून सुरू आहे. कंपनीच्या समभागात गेल्या १० महिन्यांत ९२ टक्क्यांची घसरण झाली आहे. हा भाव आता प्रतिसमभाग ९० रुपयांवर आला आहे. कंपनीच्या समभागाला लोअर सर्किट लागले असून, सलग १२ सत्रांत समभागात घसरण झाली आहे.
sanjay.jadhav@expressindia.com