अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर बॉम्ब चक्रीवादळ धडकणार आहे; ज्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्वांत शक्तिशाली चक्रीवादळांपैकी एक असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे सांगणे आहे. या वादळामुळे अमेरिकेतली अनेक राज्यांमध्ये विनाशकारी परिस्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत. या वादळामुळे अतिथंड वातावरण, तीव्र वारे, प्रचंड हिमवृष्टी व पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या हवामानाच्या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमुळे कॅलिफोर्नियासह पश्चिम राज्यांमध्ये तब्बल आठ ट्रिलियन गॅलन पाऊस पडू शकतो; ज्यामुळे पूर आणि भूस्खलन होऊ शकते, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे. हे बॉम्ब चक्रीवादळ किती विनाशकारी आहे? त्याचा दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार? त्यासाठी कोणती पूर्वतयारी केली जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
‘बॉम्ब चक्रीवादळ’ म्हणजे काय?
जेव्हा कमी दाब प्रणाली ‘बॉम्बोजेनेसिस’मधून जाते, तेव्हा हे चक्रीवादळ तयार होते. बॉम्बोजेनेसिस म्हणजे जेव्हा हवेचा मध्यवर्ती दाब किमान २४ तासांसाठी प्रतितास एक ‘मिलिबार’च्या वेगाने कमी होतो तेव्हा अशी वादळे तयार होतात. हवेचा दाब सामान्यतः १० मिलिबार असतो. जेवढा हवेचा दाब कमी, तेवढे विध्वंसक चक्रीवादळ निर्माण होते. ‘बॉम्बोजेनेसिस’मध्ये २४ तासांच्या आत जवळपास ७० मिलिबार इतका हवेचा दाब कमी होणार आहे. जेव्हा उबदार, आर्द्र हवा ही थंड आर्क्टिक हवेशी मिळते, तेव्हा वादळाच्या स्फोटक वाढीला चालना देणारे अस्थिर वातावरण तयार होते आणि त्यामुळे असे चक्रीवादळ तयार होते.
हेही वाचा : पाकिस्तान-बांगलादेशदरम्यान सागरी मार्ग सुरू? भारताची चिंता का वाढली?
जेव्हा थंड व कोरडी हवा उत्तरेकडून खाली सरकते आणि उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण व दमट हवा वरच्या दिशेने सरकते, तेव्हा उष्ण हवा झपाट्याने वाढून, दमटपणामुळे ढग तयार होतात. त्यामुळे हवेचा दाब घटतो आणि त्यामुळे या कमी दाबाच्या केंद्राभोवती घड्याळाच्या उलट दिशेने फिरणारे वादळ विकसित होते. त्यामुळेच १९८० च्या दशकात हवामानशास्त्रज्ञांनी याचा ‘बॉम्ब चक्रीवादळ’ हा शब्दप्रयोग केला आणि वादळाची तीव्रता व बॉम्बचा स्फोट यांच्यात तुलना केली.
या वादळाचा काय परिणाम होणार?
कॅलिफोर्नियाला एका आश्चर्यकारक हवामान घटनेला सामोरे जावे लागणार आहे. पुढील सात दिवसांत या भागात आठ ट्रिलियन गॅलन पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, जवळपासची राज्येदेखील या महापुराच्या मार्गावर आहेत. ओरेगॉनमध्ये पाच ट्रिलियन गॅलन आणि वॉशिंग्टनमध्ये तीन ट्रिलियन गॅलन पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. तर आयडाहोमध्येदेखील अतिरिक्त २.५ ट्रिलियन गॅलन इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच, या वादळादरम्यान जवळजवळ २० ट्रिलियन गॅलन इतका पाऊस पश्चिम अमेरिकेत पडू शकतो. सॅन दिएगोच्या कॅलिफोर्निया विद्यापीठ येथील तज्ज्ञांनी इशारा दिला की, या हवामान संकटाचे परिणाम अत्यंत गंभीर आणि दूरगामी असू शकतात.
तटीय प्रदेशांना धूप आणि पूर यांचा मोठा फटका बसू शकतो. शक्तिशाली वादळे आणि महाकाय लाटा किनाऱ्याला धडकतात. दक्षिण ओरेगॉन आणि नॉर्दर्न कॅलिफोर्नियामध्ये पावसाची तीव्रता अधिक असू शकते. पावसाच्या प्रचंड प्रमाणामुळे अचानक पूर आणि चिखलाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पर्वतीय भागातही संभाव्य विक्रमी बर्फवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रहिवाशांनी सतर्क राहून हवामान बदलांचे निरीक्षण करावे आणि देण्यात आलेल्या आदेश किंवा इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन सरकारी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अमेरिकेत पहिल्यांदाच बॉम्ब चक्रीवादळ धडकणार आहे का?
बॉम्ब चक्रीवादळ अमेरिकेसाठी नवीन नाही. डिसेंबर २०२२ मध्ये एका प्रचंड वादळाने न्यूयॉर्कच्या काही भागांसह मध्य पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीला लक्ष्य केले होते. त्याला ‘ख्रिसमस बॉम्ब चक्रीवादळ’ असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी हिमवादळाची परिस्थिती निर्माण झाली होती. थंड तापमान आणि प्रचंड हिमवर्षावामुळे हजारो लोकांची वीज खंडित झाली होती. तसेच अनेक त्रासदायक आव्हानांचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा : डोळ्यांतून अश्रू का येतात? काय आहे आपल्या रडण्यामागील विज्ञान?
पश्चिम किनारपट्टीवर ऑक्टोबर २०२१ मध्ये असे वादळ धडकले होते. या वादळाने विशेषत: कॅलिफोर्निया आणि पॅसिफिक वायव्य भागांना प्रभावित केले होते. या वादळामुळे विक्रमी पाऊस, जोरदार वारे आणि किनारपट्टी भागात पूर आला होता; ज्यामुळे भूस्खलन झाले आणि रस्ते बंद झाले होते. जानेवारी २०१८ मध्ये बॉम्ब चक्रीवादळ न्यू इंग्लंड आणि मिड-अटलांटिक भागात धडकले होते. त्यावेळी तीव्र वारे आणि जोरदार बर्फवृष्टी झाली होती. मॅसॅच्युसेट्स आणि न्यूयॉर्कसारख्या राज्यांनी हिमवादळाची परिस्थिती अनुभवली होती. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आणि एक दशलक्षाहून अधिक लोकांच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.