मागील सोमवारी (१४ ऑक्टोबर) एअर इंडियाच्या बोईंग ७७७ ने मुंबईहून न्यूयॉर्कच्या दिशेने उड्डाण केले. १३० टन जेट इंधन टाकून या विमानाने १६ तासांच्या नॉन स्टॉप प्रवासासाठी टेक ऑफ केले. मात्र, उड्डाणाच्या काही मिनिटांनंतर लगेचच विमान कंपनीला फोन आला की, विमानात बॉम्ब आहे. एअर इंडियाच्या बोईंग ७७७ ला ताबडतोब वळवण्यात आले. उड्डाणानंतर दोन तासांतच ते विमान दिल्लीत उतरवण्याची तयारी करण्यात आली. मात्र, त्यातही एक अडचण होती. या बॉम्बच्या धमकीमुळे विमान कंपनीला तीन कोटींहून अधिकचा खर्च आला. त्यामागील कारण काय? नेमकं हे प्रकरण काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
प्रकरण काय?
बॉम्बची धमकी मिळताच विमानाचे लॅण्डिंग दिल्लीत करण्याची तयारी सुरू झाली. मात्र, त्यात अडचण अशी होती की, विमान जर दिल्लीला उतरवायचे असेल, तर विमानातील १०० टन इंधन हवेत सोडावे लागणार होते. “बी७७७ चे कमाल लँडिंग वजन २५० टन आहे. पण, विमान उड्डाण करताना म्हणजे टेक-ऑफच्या वेळी प्रवासी, सामानासह पूर्ण विमानाचे वजन सुमारे ३४०-३५० टन असते. त्या विमानाने पुन्हा दोन तासांत लॅण्डिंग करणे, म्हणजे सुमारे १०० टन इंधन हवेत सोडणे; ज्याचा खर्च सुमारे एक लाख प्रतिटन इतका आहे म्हणजेच फक्त इंधनाचा अपव्यय खर्च एक कोटी रुपये आहे,” असे एका वरिष्ठ वैमानिकाने सांगितले.
हेही वाचा : Yahya Sinwar Death: याह्या सिनवारच्या हत्येनंतर हमासचे नेतृत्व कोण करणार?
त्यासह आयजीआय विमानतळावर अनपेक्षित लॅण्डिंग आणि पार्किंगचे शुल्क २०० हून अधिक प्रवासी आणि क्रू यांची राहण्याची व्यवस्था, पुढील फ्लाइट चुकल्याबद्द्ल त्यांना भरपाई देणे, पूर्ण तपासणीनंतर विमान पुन्हा सेवेत आणण्यासाठी ऑपरेटिंग क्रूची नवीन व्यवस्था करणे यांसारखे इतरही खर्च असतात. अशा एका खोट्या धमकीच्या फोनने विमान कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान होते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विमान कंपन्यांना एकामागोमाग एक धमकीचे फोन
गेल्या रविवारपासून या गुरुवारपर्यंत विमान कंपन्यांना तब्बल ४० खोटे धमक्यांचे फोन आले आहेत. याचा विमान कंपन्यांवर मोठा आर्थिक परिणाम होत आहे. एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, याचा अतिरिक्त खर्च सुमारे ६० ते ८० कोटी रुपये आहे. एअर इंडियाच्या बी७७७ (व्हीटी-एएलएम) चे उदाहरण घेतल्यास या विमानाने मंगळवारी (१५ ऑक्टोबर) शिकागोसाठी उड्डाण केले. १२ तासांनंतर बॉम्बच्या धमकीमुळे २०० हून अधिक प्रवासी असलेले हे विमान कॅनडाच्या दुर्गम शहर इक्लुइटमध्ये उतरले. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.२१ वाजता विमान तेथे उतरले. येथून प्रवाशांना दुसर्या फ्लाइटने शिकागोला पाठवावे लागले. परंतु, प्रवाशांना घेऊन जाणारे विमान उशिरा आल्याने कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.
बी७७७ चे सरासरी मासिक भाडे चार ते सहा लाखांदरम्यान आहे; ज्याचे दैनिक भाडे सुमारे १७ हजार डॉलर्स आहे. उड्डाण न करणे म्हणजेच प्रत्येक दिवशी १७ हजार डॉलर्सचे नुकसान करणे. विमान विनाअडथळा शिकागोला पोहोचले असते. परंतु, धमकीच्या फोनमुळे विमान शिकागोला पोहोचू शकले नाही आणि २०० हून अधिक प्रवासी व कर्मचारी इकालुइटमध्ये अडकले होते; त्यांच्यासाठी निवास, जेवण आणि इतर मूलभूत गरजांची व्यवस्था दुर्गम गावात करावी लागली. त्यानंतर कॅनडाच्या हवाई दलाच्या विमानाने त्यांना शिकागोला नेण्यात आले. या एका धोक्याची एकूण किंमत १५ ते २० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, त्यात ग्राउंड केलेल्या बी७७७ ची किंमत समाविष्ट आहे, असे अनेकांनी सांगितले.
खोट्या धमक्यांचा विमान कंपन्यांवर आर्थिक दुष्परिणाम
गेल्या काही दिवसांत या धमक्यांना बळी पडलेल्या कोणत्याही मोठ्या विमान कंपनीने या विषयावर भाष्य केलेले नाही. “हा सर्वांत जास्त सणासुदीचा गर्दीचा हंगाम आहे आणि आम्हाला प्रवाशांमध्ये भीती निर्माण करायची नाही. एअरलाइन्सविरुद्ध हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद आहे आणि त्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे,” असे एअरलाइन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. इंडिगोलाही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक धमक्या आल्या आहेत. जेव्हा फ्लाइटला धमकीचा संदेश येतो आणि विमान वळवायचे असते, तेव्हा बरेचदा गंतव्य विमानतळ प्रशासना त्यांना लॅण्डिंगची परवानगी देण्यास उशीर करते. लंडनमधील अल, सिंगापूरमधील अल एक्स्प्रेस आणि कदाचित इतर विमानांबरोबरही असेच काहीसे घडले.
“ए बी७७७ ला दर तासाला सात ते आठ टन इंधन हवेत सोडावे लागले आणि ए ३२० ला २.५ टन इंधन सोडावे लागले. सर्व प्रभावित एअरलाइन्ससाठी फक्त इंधन जाळण्याची किंमत अनेक कोटींहून अधिक आहे,” असे एका वैमानिकाने सांगितले. “हवेत जास्त वेळ घालविल्यामुळे, बरेचदा तेच कर्मचारी पुढील उड्डाण करू शकत नाहीत. हे विमान सुरक्षा यंत्रणांनी तपासणी करून, मंजुरी दिल्यानंतरच चालवले जाते. वैमानिकांना विश्रांती मिळावी यासाठी हॉटेलमध्ये त्यांची सोय करावी लागते. या घटना आमच्या नियंत्रणाबाहेर असतात; परंतु फ्लाइट चुकल्यामुळे अनेक प्रवासी आम्हाला न्यायालयात घेऊन जातील आणि शेवटी आम्हाला पैसे देऊन तोडगा काढावा लागेल. त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते,” असे एका मोठ्या विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
धमकीची तपासणी
दोन प्रकारच्या धमक्या असतात. एक म्हणजे ज्यात विशिष्ट फ्लाइट क्रमांकाचे नाव सांगितले जाते किंवा केवळ फ्लाइट कंपनीचे नाव सांगितले जाते. एअर इंडियाला गुरुवारी मिळालेल्या धमकीत फ्लाइट क्रमांकाचे नाव सांगण्यात आले नव्हते. “धमकीनंतर जोखमीचे मूल्यांकन केले जाते. धमकीचा स्रोत तपासला जातो. म्हणजेच धमकी एक्स (पूर्वीचे ट्विटर), व्हॉट्सॲप, फोन किंवा मेलद्वारे आली का, हे तपासले जाते. मूल्यमापनानंतर मॅट्रिक्सच्या आधारे कोड दिला जातो; जसे की, लाल (खूप गंभीर), पिवळा (गंभीर) किंवा हिरवा (बहुधा फसवणूक). परंतु, कोणत्याही परिस्थितीत कोणतीही धमकी नाकारली जात नाही. कारण- सुरक्षा कायम प्राधान्य स्थानी असते. जरी विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत असले तरी आणि प्रवासी संतप्त होत असले तरी अशा धमकीकडे दुर्लक्ष केले जात नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गंभीर प्रकरणांमध्ये जवळच्या योग्य विमानतळावर विमान उतरावे लागते. “ओव्हरसाइट लॅण्डिंग टाळण्यासाठी विमान पाच हजार फुटांवर असेल तेव्हा आम्ही इंधन हवेत सोडू शकतो. त्या उंचीवरून टाकलेल्या इंधनाचे वाफेत रूपांतर होते. दिल्लीत आम्ही दक्षिणेला साक्रासजवळ आणि मुंबईत समुद्रावर इंधन सोडतो,” असे एका वैमानिकाने सांगितले.