गौरव मुठे

एक ना अनेक सकारात्मक घटकांच्या संगमाने उत्साह दुणावलेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी भांडवली बाजारात निर्देशांकात तेजीचे वारे भरले. बाजारात सुरू असलेल्या दमदार खरेदीच्या जोरावर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारच्या सत्रात मध्यान्हीला सव्वा टक्क्यांची उसळी घेतली आणि आधीच्या सलग आठ सत्रातील घसरणीला काहीसे भरून काढले. तेजीच्या या अकस्मात उधाणामागे नेमकी कारणे काय ते समजून घेऊया.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

वॉल-स्ट्रीट, आशियाई बाजारातील कल-पालट आणि तेथील तेजीची कारणे काय?

शुक्रवारच्या सत्रात दलाल स्ट्रीटवरील हर्षोल्हासाला अर्थातच पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारातील दमदार सकारात्मक प्रवाह कारणीभूत ठरला. पण आशियाई बाजारातील हा कलपालट नेमका कशामुळे झाला? गेल्या आठवड्यात अमेरिकेत महागाई दर चढाच राहण्याच्या भीतीने फेडरल रिझव्‍‌र्हकडून पतधोरण अधिक कठोर पवित्रा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अटलांटा फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष राफेल बॉस्टिक यांनी अर्थव्यवस्थेतील जोखीम मर्यादित करण्यासाठी आणि विकास वेग वाढवण्यासाठी पत धोरणातील आक्रमकपणा कमी करून व्याजदर वाढीची तीव्रता कमी करणे गरजेचे असल्याचे सांगितले आणि त्यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भागीदार असलेल्या चीनमधील परिस्थितीमध्ये देखील सुधारणेचे संकेत मिळत आहेत.

चीनची आर्थिक लक्ष्ये निश्चित करण्यासाठी आणि नवीन वित्तीय अधिकारी निवडण्यासाठी येत्या रविवारी सुरू होणार्‍या चीनच्या संसदेच्या वार्षिक बैठकीकडेही बाजारपेठा लक्ष ठेवून आहेत. शिवाय डिसेंबरमध्ये साथ-प्रतिबंधक कठोर अंकुश शिथिल केल्यानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत फेरउभारीची चिन्हे दिसू लागली आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आशियातील भांडवली बाजारांमध्ये उत्साहवर्धक वातावरण राहिले, त्याचेच प्रतिबिंब त्यानंतर खुल्या झालेल्या भारतीय बाजारातही उमटले.

विश्लेषण : वैयक्तिक विदा संरक्षण कायदा काय आहे? सत्ताधारी-विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे!

अदानींच्या समभागांमध्ये तेजीचा एकंदर बाजारावर उत्साहदायी परिणाम कसा?

हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या संभागांची वाताहत झाली होती. मात्र गेल्या तीन सत्रात अदानी समूहातील समभाग सावरत असल्याचे दिसत आहेत. परिणामी शुक्रवारी समूहातील दहापैकी सहा कंपन्यांच्या समभागांनी ‘अप्पर सर्किट’ गाठल्याचेही दिसले. अमेरिकी गुंतवणूक कंपनी जीक्यूजी पार्टनर्सने गुरुवारच्या सत्रात अदानी समूहातील चार कंपन्यांचे सुमारे १५,४६६ कोटी रुपये मूल्याचे समभाग बाजारातील एकगठ्ठा व्यवहारातून खरेदी केले. याचबरोबर गोल्डमन सॅकने देखील अदानी ग्रीन एनर्जीमध्ये १,१३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या सकारात्मक घडामोडींचा परिणाम अदानी समूहातील सर्व कंपन्यांवर दिसून आला.

अदानींच्या समभाग-मूल्यात फेरउभारी कितपत?

अदानी समूहातील बाजारात सूचिबद्ध १० कंपन्या आणि त्यांच्या हवालदिल गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर तब्बल पाच आठवड्यानंतर हास्य फुलेल, अशी त्यामध्ये शुक्रवारी मूल्यवाढ दिसून आली. ती अशी –

  • अदानी एंटरप्राइजेस १८७९.५० रुपये (१६.९४ टक्के)
  • अदानी पॉवर १७९.३० रुपये (४.९९ टक्के)
  • अदानी ट्रान्समिशन ७४४.१५ रुपये (४.९९ टक्के)
  • अदानी ग्रीन एनर्जी ५६१.७५ (५ टक्के) रुपये
  • अदानी टोटल गॅस ७८१.३० रुपये (५ टक्के)
  • अदानी विल्मर ४१८.५५ रुपये (४.९९ टक्के)
  • एनडीटीव्ही २२० रुपये (४.९९ टक्के)
  • अंबुजा सिमेंट ३९१.८५ रुपये (५.७१ टक्के)
  • एसीसी १८९४.६० रुपये (५.१५ टक्के)

(३ मार्च २०२३, शुक्रवारचा बंद भाव)

परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका कशी?

गेल्या आठ सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून अविरत समभाग विक्री सुरू होती. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात घसरण सुरू होती. मात्र गुरुवारच्या सत्रात परदेशी गुंतवणुकदारांनी बाजारात दमदार पुनरागमन केले. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात सुमारे १२,७७१ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले. चालू कॅलेंडर वर्षातील एका दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली ही आतापर्यंतची मोठी समभाग खरेदी आहे. त्याबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील गुरुवारी ५,९४८.१५ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केली.

विश्लेषण : बौद्धिक संपदा अधिकार का महत्त्वाचे?

बँकांच्या समभागात तेजी का?

सरकारी बँकांनी अदानी समूहातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला आहे. अदानी समूहासमोरील अडचणीत वाढ झाल्यानंतर बँकांच्या समभागांवर परिणाम झाला होता. मात्र अदानी समूहाने अमेरिकी कंपनीला विकलेल्या समभाग विक्रीतून मिळालेल्या निधीतून बँकांच्या कर्जाची परतफेड देखील करण्यात येणार असल्याने ‘बँक निफ्टी’ निर्देशांक लक्षणीय वधारला आहे. शुक्रवारच्या सत्रात पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया यांच्या समभागतील तेजीमुळे ‘निफ्टी पीएसयू बँक’ निर्देशांक ४ टक्क्यांहून अधिक तेजीत आहे. सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या समभागातदेखील ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

gaurav.muthe@expressindia.com

Story img Loader