गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर प्रचंड वाढले आहेत. सध्याच्या चढ्या किमतींचे कारण एप्रिल-मेमध्ये टोमॅटोची आवक अचानक घसरल्याचं सांगितलं जात आहे. मार्च आणि एप्रिलच्या असामान्य उष्णतेमुळे टोमॅटोच्या पिकांवर कीटकांचे आक्रमण देखील मोठ्या प्रमाणात झाले, ज्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला. सध्या भाजी मंडईतील टोमॅटोचे भाव जनतेच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरात बाजारात टोमॅटोचे दर दुपटीने तर काही ठिकाणी त्याहूनही वाढलेत. गाझियाबादच्या घाऊक भाजी मंडईतून टोमॅटो विकत घेऊन किरकोळ बाजारात विकणारा सचिन सांगतो की, गेल्या आठवड्यात जे टोमॅटो दर्जानुसार ३० ते ४० रुपयांनी बाजारात विकले जात होते, ते आता ७० ते ९० रुपये दराने विकले जात आहेत. कुठेतरी १०० रुपये किलोच्या आसपास दर पोहोचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील अनेक राज्यांत टोमॅटोच्या भावात वाढ

गेल्या काही आठवड्यांत टोमॅटोचे भाव फक्त दिल्ली-एनसीआरच्या बाजारातच गगनाला भिडलेले नाही, तर उत्तर प्रदेश व्यतिरिक्त महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये प्रचंड वाढले आहेत. बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की, अवघ्या महिन्याभरापूर्वीपर्यंत उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांत टोमॅटो दोन ते आठ रुपये किलोने विकला जात होता. मात्र पावसाळ्याच्या पहिल्या पावसाची बातमी येताच प्रथम टोमॅटोचे भाव वाढू लागले. गेल्या एक ते दोन महिन्यांत टोमॅटोच्या किमती १९०० टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

हेही वाचाः देशाला आज मिळाली ५ वंदे भारत ट्रेनची भेट, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

टोमॅटो ६० ते १०० रुपये किलोपर्यंत विकला जातो

सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटो त्याच्या गुणवत्तेनुसार ६० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. मध्य प्रदेशातही टोमॅटोचे दर ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, ओडिशा आणि छत्तीसगड या मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादक राज्यांमध्येही त्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

हेही वाचाः EPFO Higher Pension : हायर पेन्शनसाठी अर्ज करायचाय? EPFO ने अंतिम मुदत वाढवली

कुठे पाऊस तर कुठे उष्णतेचा टोमॅटोच्या भावावर परिणाम?

एकीकडे बिपरजॉय वादळामुळे झालेल्या पावसाचा महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांतील टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बिहार आणि पश्चिम बंगालमधील कडाक्याच्या उष्णतेमुळे टोमॅटोच्या पिकावरही परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परिणामी, देशातील अनेक राज्यांतील मंडईंमध्ये टोमॅटोची आवक घटली, त्यामुळे दर गगनाला भिडले. दुसरीकडे पावसाला सुरुवात झाल्याने टोमॅटो पिकावरही परिणाम झाला. केवळ टोमॅटोच नाही तर मंडईतील इतर हिरव्या भाज्यांच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. पुढील एक किंवा दोन महिन्यांत टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या नवीन मालाची आवक वाढेल, तेव्हा काही राज्यांमध्ये दरात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

टोमॅटोचे दर एवढे कसे वाढले?

३ ते ४ इंचाच्या उंचीची रोपे डिसेंबर-जानेवारी किंवा फेब्रुवारी-मार्चमध्ये लावली जातात. पहिली खेप एप्रिलपर्यंत पुरवठा सुनिश्चित करते; दुसरी खेप ऑगस्टपर्यंत बाजारात येते. पीक तीन महिन्यांत तयार होते आणि प्रक्रिया ४५ दिवस चालू राहते. महाराष्ट्रातील जुन्नर टोमॅटो उत्पादक संघाचे अध्यक्ष दीपक भिसे म्हणाले की, रब्बी टोमॅटोचा उत्पादन खर्च सुमारे १२ रुपये/किलो आहे, तर खरीपासाठी १० रुपये/किलो आहे. “उन्हाळ्यात कीटकांच्या प्रादुर्भावावर अधिक नियंत्रण आवश्यक असते आणि त्यामुळे उत्पादन खर्च नाममात्र जास्त असतो.” मात्र, यंदा मार्च-एप्रिलमध्ये शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव घाऊक बाजारात मार्चमध्ये सरासरी भाव ५-१० रुपये/किलो होता, तर एप्रिलमध्ये तो ५-१५ रुपये/किलो होता. मे महिन्यात शेतकऱ्यांना २.५०-५ रुपये/किलो दराने विक्री करावी लागली.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मिरेवाडी गावातील ऊस आणि टोमॅटो उत्पादक अजित कोरडे यांनीसुद्धा भाव वाढण्याचे कारण सांगितले आहे. मार्च-एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला भाव कोसळले, कारण बाजारात येणारे बहुतांश पीक निकृष्ट दर्जाचे होते आणि शेतकऱ्यांनी घाबरून विक्रीचा अवलंब केला. “दक्षिण भारतात ज्यामध्ये जास्त उष्णता दिसून आली, लीफ कर्ल विषाणूमुळे पीक उद्ध्वस्त झाले. महाराष्ट्रात मार्च-एप्रिलमध्ये थंडीची अनुपस्थिती आणि अति उष्णतेमुळे पिकांवर विषाणूचे आक्रमण दिसून आले,” असंही कोरडे म्हणाले.

भाव कधी कमी होतील?

लवकरच भाव कमी होण्याची शक्यता शेतकरीसुद्धा आता नाकारत आहेत. पुण्यातील नारायणगाव घाऊक बाजारात सध्या २४,०००-२५,००० क्रेट (प्रत्येक २० किलोग्रॅम असलेले) टोमॅटोची आवक होत आहे. यंदा अपेक्षित असलेल्या ४०,०००-४५,००० क्रेटच्या तुलनेत ते निम्मेसुद्धा नाही. पुढचे पीक खरीप टोमॅटोचे असेल, ज्याची मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर नुकतीच पुनर्लावणी सुरू झाली आहे. “ऑगस्टनंतरच आवक सुधारेल आणि किरकोळ किमतींमध्ये सुधारणा दिसून येईल,” असंही कोरडे म्हणालेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Both tomato growers and consumers are worried what is the reason for the price increase vrd
Show comments