एका सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरने लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘बोर्नविटा’वर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत. बोर्नविटामधील घटकांमुळे मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. बोर्नविटामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे लहान मुलाला भविष्यात अनेक आजार होऊ शकतात, असा दावा या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरने केला आहे. त्याने बोर्नविटासंबंधी भाष्य करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओनंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच कारणामुळे बोर्नविटाच्या पालक कंपनीने सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यानंतर बोर्नविटाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके काय आहे? याबाबत बोर्नविटाने काय स्पष्टीकरण दिले? तसेच सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरने नेमका काय दावा केला होता? हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके प्रकरण काय आहे?

‘मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर रेवांत हिमातसिंग्का यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हिमातसिंग्का आहारतज्ज्ञ असून ते आरोग्यविषयक सल्ला देतात. त्यांनी या व्हिडीओमध्ये बोर्नविटामध्ये साखर, कोका सॉलिड्स तसेच कर्करोगास कारणीभूत असणारे कलरन्ट आहेत, असा दावा केला आहे. बोर्नविटाने त्यांची टॅगलाइन ‘तयारी जीत की’ नव्हे तर ‘तयारी डायबेटिज की’ अशी करायला हवी, असेही हिमातसिंग्का यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. कंपनी बोर्नविटाकडून पोषक तत्त्वांबद्दल चुकीचा दावा केला जातोय, असेही हिमातसिंग्का यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अ‍ॅडॉल्फ हिटलर

मुलांना लहान वयातच साखरेची सवय लागत आहे.

‘प्रिंट’ या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार “कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाविषयी खोटे बोलण्यास सरकारने परवानगी द्यायला हवी का? पालक त्यांच्या मुलांना बालपणापासूनच साखरसेवनाची सवय लावत आहेत,” असेही हिमातसिंग्का म्हणाले आहेत.

परेश रावल, खासदार कीर्ती आझाद यांनीही शेअर केला व्हिडीओ!

हिमातसिंग्का यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल तसेच माजी क्रिकेटपटू आणि खासदार कीर्ती आझाद यांनीदेखील हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

हेही वाचा >>> न्यूयॉर्कमध्ये चीनच्या गुप्त पोलीस चौकीचा भांडाफोड; जगभरात चीनने १०० गुप्त पोलीस चौक्या का उभारल्या?

हिमातसिंग्का यांच्या व्हिडीओनंतर बोर्नविटाने काय भूमिका घेतली?

हिमातसिंग्का यांनी शेअर केलेल्या व्हिडीओची दखल बोर्नविटाच्या पालक कंपनीने घेतली आहे. या कंपनीने हिमातसिंग्का यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच ९ एप्रिल रोजी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. “बोर्नविटा तयार करताना जे घटक वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, त्याचाच वापर करण्यात आलेला आहे. तसेच बोर्नविटा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच तयार केले जाते. बोर्नविटा तयार करण्यासाठी ज्या घटकांचा वापर केला जातो, त्याची माहितीही दिलेली असते. मागील सात दशकांपासून भारतीय ग्राहकांनी बोर्नविटावर विश्वास दाखवलेला आहे. बोर्नविटामध्ये अ, क, ड जीवनसत्त्वे आहेत. यासह यामध्ये लोह, झिंक, कॉपर, सेलेनियम यासारखे घटकही आहेत. हे सर्व घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात,” असे बोर्नविटाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: बिल्कीस बानू प्रकरणातील आरोपींची सुटका कायदेशीर आहे का? गुजरात व केंद्र सरकार काय दडवू पाहते?

हिमातसिंग्का यांनी मागितली माफी!

सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर हिमातसिंग्का यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून बोर्नविटावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडीओ हटवला आहे. “मला १३ एप्रिल २०२३ रोजी एक कायदेशीर नोटीस आलेली आहे. त्यामुळे मी माझ्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सवरून हा व्हिडीओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्हिडीओ बनवल्यामुळे मी कॅटबरीची माफी मागतो. या कंपनीची तसेच या कंपनीच्या ब्रॅण्ड्सची बदनामी करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. तसेच कायदेशीर लढाई लढण्यासाठी माझ्याकडे कोणताही स्रोत नाही. मला या कायदेशीर लढाईमध्ये रसही नाही. त्यामुळे या प्रकरणाला न्यायालयापर्यंत नेऊ नये, अशी मी या कंपनीला विनंती करतो,” असे हिमातसिंग्का म्हणाले आहेत.

कायद्याने आखून दिलेल्या प्रक्रियेचे पालन केले जाते- बोर्नविटा

बोर्नविटाने हिमातसिंग्का यांच्या व्हिडीओला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असे म्हटले आहे. तसेच या व्हिडीओमध्ये चुकीची माहिती देण्यात आली असून खोटी विधाने करण्यात आली आहेत. बोर्नविटा तयार करण्यासाठी कायद्याने आखून दिलेल्या प्रक्रियेचे पालन केले जाते. तसेच गुणवत्ता कायम राखली जाते, असेही बोर्नविटाने सांगितले आहे.

हेही वाचा >>> अ‍ॅपल बचत खाते म्हणजे नेमके काय? याचा काय फायदा होणार? जाणून घ्या…

सर्व घटक बोर्नविटाच्या वेष्टनावर लिहिलेले असतात- बोर्नविटा

“आहारतज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञांच्या मदतीनेच बोर्नविटाचे सूत्र तयार केले जाते. आम्ही जे दावे केलेले आहेत, त्याची पडताळणी केलेली आहे. तसेच बोर्नविटा तयार करताना जे घटक वापरले जातात, त्यालाही मान्यता मिळालेली आहे. बोर्नविटा तयार करताना कोणत्या घटकांचा वापर करण्यात आलेला आहे, याची माहिती ग्राहकांना मिळावी म्हणून सर्व घटक बोर्नविटाच्या वेष्टनावर लिहिलेले असतात,” असे बोर्नविटाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bournvita cause for diabetes cancer claims social media influencer know detail information prd