Major setback for Bournvita कॅडबरी बोर्नविटा हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचे आहे. बोर्नविटामुळे ताकद येते, मुले धष्टपुष्ट होतात, असा समज लोकांच्या मनात आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे जाहिरात. वर्षानुवर्षे बोर्नविटाची जाहिरात आपण पाहत आलो आहोत; ज्यात बोर्नविटाविषयी ताकद, उंची, शरीराची वाढ अशाच गोष्टी दर्शविण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने बोर्नविटावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास भाग पाडले. बोर्नविटामधील घटकांमुळे मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो, असा दावा एप्रिल २०२३ मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. आता केंद्राकडून याविषयी कडक पाऊल उचलण्यात आले आहे; ज्यामुळे ‘बोर्नविटा’ पुन्हा चर्चेत आले आहे. नेमके हे प्रकरण काय? केंद्राने काय निर्देश दिले? केंद्राकडून याविषयी कडक पावले उचलण्यात आली, याचे नेमके कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
नेमके प्रकरण काय आणि केंद्र सरकारने कोणते निर्देश दिले?
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील ‘हेल्थ ड्रिंक्स’ या श्रेणीतून बोर्नविटासह सर्व पेये हटविण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने काढलेल्या निष्कर्षांवरून हे आदेश देण्यात आले आहेत. १० एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर)नुसार, भारताच्या अन्न कायद्यांतर्गत किंवा कोणत्याही नियमांनुसार आरोग्यदायी पेयाची व्याख्या केली गेलेली नाही.
हेही वाचा : बोर्नविटामुळे मधूमेह, कर्करोग? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या दाव्यामुळे खळबळ; जाणून घ्या नेमके प्रकरण काय?
एनसीपीसीआर ही कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (सीपीसीआर) कायदा, २००५ च्या कलम (३) अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ (एफएसएसएआय) अंतर्गत आरोग्यदायी पेयाची कोणतीही व्याख्या करण्यात आलेली नाही. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६, तसेच माँडेलेझ इंडिया कंपनीद्वारे सादर केलेल्या नियमात बोर्नविटाचा कुठेही पौष्टिक पेय म्हणून उल्लेख नाही, असे एनसीपीसीआरने सूचित केले.
हे स्पष्ट होताच वाणिज्य मंत्रालयाने सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ‘हेल्थ ड्रिंक्स’ म्हणून शीतपेयांची विक्री करणे थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ई-कॉमर्स साइट्सना डेअरी, तृणधान्ये व इतर सर्व पेये ‘हेल्थ ड्रिंक’ किंवा ‘एनर्जी ड्रिंक’ श्रेणीतून हटविण्याचे निर्देश दिले होते, असे मनी कंट्रोलच्या अहवालात सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, भारताच्या अन्न कायद्यांमध्ये ‘हेल्थ ड्रिंक’ची कोणतीही व्याख्या नाही आणि ‘एनर्जी ड्रिंक्स’ ही फक्त फ्लेवर्ड वॉटर-आधारित पेये आहेत.
“त्यामुळे सरकारने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवरील ‘हेल्थ ड्रिंक्स/एनर्जी ड्रिंक्स’ या श्रेणीतून अशी पेये किंवा शीतपेये काढून टाकून किंवा डी-लिंक करून हे चुकीचे वर्गीकरण त्वरित दुरुस्त करण्याचा सल्ला दिला आहे,” असे ‘इंडिया टुडे’नुसार २ एप्रिलला संस्थेने एका निवेदनात म्हटले होते. ग्राहकांची दिशाभूल थांबविण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
बोर्नविटामध्ये आरोग्यासाठी हानिकारक असणारे घटक?
सर्व ई-कॉमएर विभागाला पत्र लिहून निर्देश दिले आहेत, “बोर्नविटासह कोणतेही पेये, शीतपेये ही आरोग्य पेये म्हणून विकू नयेत. ते म्हणाले होते, “काही पेये ‘एनर्जी ड्रिंक्स’ म्हणून विकली जात आहेत. मात्र, त्यात साखरेचे प्रमाण जास्त आहे आणि आरोग्यासाठी हानिकारक असणारे इतर घटकदेखील आहेत. या पेयांमध्ये बोर्नविटाचादेखील समावेश आहे; जे लहान मुलांसाठी ‘एनर्जी ड्रिंक्स’ म्हणून विकले जात आहे.”
एनसीपीसीआरने एक चौकशी केली होती, ज्यात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ने सांगितले होते की, देशाच्या कायद्यात ‘हेल्थ ड्रिंक’ हा शब्द परिभाषित केलेला नाही. त्यावर बोर्नविटाची उत्पादक कंपनी ‘माँडेलेझ इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड’ने आयोगाला सांगितले होते की, बोर्नविटा हे ‘हेल्थ ड्रिंक’ नाही. एनसीपीसीआरने एफएसएसएआयला सुरक्षा मानके व मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता न करणाऱ्या आणि ‘हेल्थ ड्रिंक्स’ म्हणून पॉवर सप्लिमेंट्सचे प्रदर्शन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आवाहन केले होते.
बोर्नविटा वादाच्या भोवर्यात
गेल्या एप्रिलमध्ये बोर्नविटाविषयीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेव्हापासून बोर्नविटा चर्चेचा विषय ठरला. फूडफार्मर नावाचे इन्स्टाग्राम पेज चालविणारा तरुण रेवांत हिमातसिंग्का याने या व्हिडीओत प्रत्येक १०० ग्रॅम बोर्नविटामध्ये ५० ग्रॅम साखर असल्याचा दावा केला होता. तो म्हणाला होता की, कंपनीने दावा केला आहे की, त्यांच्या पेयाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत; परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॅडबरीने त्याला कायदेशीर नोटीस बजावली आणि त्याचा व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले, असे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले होते. त्यानंतर हिमातसिंग्का याने व्हिडीओ काढून टाकला आणि इन्स्टाग्रामवर त्याचे कारण स्पष्ट केले.
बोर्नविटाने स्पष्ट केले, “त्यांच्या बोर्नविटा हे उत्पादन तयार करताना जे घटक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यांचाच वापर त्यामध्ये करण्यात आला आहे. तसेच बोर्नविटा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच तयार केले जाते आणि आमचे सर्व घटक पॅकवर दिले गेले आहेत.” ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, केंद्राने त्याच महिन्यात कॅडबरीला कायदेशीर नोटीस पाठवून, कंपनीला बोर्नविटा पॅकेजिंगवरील दिशाभूल करणारी माहिती मागे घेण्यास सांगितले.
हेही वाचा : ‘आरोग्यदायी’ लेबल लावून विकता येणार नाहीत चवदार पेये?
हिमातसिंग्का याने गेल्या डिसेंबरमध्ये आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता; ज्यात तो म्हणाला होता की, बोर्नविटाने साखरेचे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांनी कमी केले आहे. ‘इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच घडत आहे की, सोशल मीडियावरील एखाद्या व्हिडीओमुळे इतक्या मोठ्या फूड कंपनीने साखरेचे प्रमाण कमी केले. जर एका व्हिडीओमुळे साखरेत १५ टक्के घट होऊ शकते. तर कल्पना करा की, आपण काहीही खरेदी करण्यापूर्वी फूड लेबल वाचण्यास सुरुवात केली, तर आपण काय साध्य करू शकतो’, अशी कॅप्शन देऊन त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला होता.