भारतीय नौदलाची लढाऊ सज्जता आणि प्रशिक्षण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि युद्धनौकांवर बसविण्यात येणारी या अस्त्राची प्रणाली खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ब्राम्होस हे जगातील सर्वात वेगवान, अचूक मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. त्याची प्रगत आवृत्ती सागरी सीमांच्या संरक्षणात आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचबरोबर स्वदेशीकरणातून परकीय अवलंबित्व कमी करणे दृष्टिपथात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षेपणास्त्र खरेदीचा करार कसा आहे?

भारतीय नौदलासाठी ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि युद्धनौका, विनाशिकांवर बसविली जाणाऱ्या ब्राम्होस प्रणाली खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संरक्षण मंत्रालयाने ब्राम्होस एरोस्पेसशी दोन करार केले. यातील पहिला करार १९ हजार ५१८ कोटींच्या ब्राम्होसचा तर दुसरा ९८८ कोटींचा क्षेपणास्त्र प्रणालीचा आहे. नौदलास जवळपास २०० प्रगत क्षेपणास्त्रे मिळण्याचा अंदाज आहे. विविध युद्धनौकांमध्ये बसवण्यात येणारी ही प्रणाली लवकरच नौदलाचे प्रमुख शस्त्र ठरणार आहे. स्वनातीत (सुपरसॉनिक) वेगासह जमीन अथवा समुद्रातील लक्ष्याचा अत्यंत अचूक वेध घेण्याची क्षमता या प्रणालीत आहे. यातून नौदलाची प्रहारक क्षमता कमालीची विस्तारणार आहे.

हेही वाचा – विश्लेषण : दिल्ली कुणाची? उत्तरेत २२० जागां, वर काँग्रेसची कसोटी… दक्षिणेत १३२ जागा भाजपसाठी आव्हानात्मक!

नियोजन कसे?

नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत युद्ध नौकांवरील जुनी क्षेपणास्त्रे बदलून त्यांची जागा ब्राम्होसला दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. नौदलातील काही युद्धनौका व विनाशिकांच्या भात्यात आधीपासून ब्राम्होस आहे. नव्याने समाविष्ट होणाऱ्या ब्राम्होसची मारक क्षमता तुलनेत अधिक असेल. हे क्षेपणास्त्र जलदपणे कार्यान्वित करण्याचे कौशल्य देशाकडे आहे. स्वदेशी असल्याने त्याची जोडणी, देखभाल- दुरुस्ती करण्यासाठी परदेशी कंपन्यावर अवलंबून रहावे लागणार नसल्याचे नौदल अधिकारी सांगतात. या करारामुळे स्वदेशी क्षमता अधिक बळकट होईल. परकीय चलनात बचत होईल आणि भविष्यात परदेशी सामग्री निर्मात्यांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

बदल कसे घडले?

सुरुवातीच्या काळात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटाच्या (एमटीआरसी) निर्बंधामुळे ब्राम्होसचा पल्ला २९० किलोमीटरचा ठेवणे क्रमप्राप्त होते. २०१६ मध्ये एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाल्याने रशियाच्या साथीने ३०० किलोमीटर पुढील क्षेपणास्त्र विकसित करण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला होता. नंतर क्षेपणास्त्राचा पल्ला ४०० किलोमीटरपर्यंत वाढविला गेला. नवीन आवृत्ती ८०० ते ९०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. समाविष्ट होणाऱ्या क्षेपणास्त्राच्या पल्ल्याबाबत नौदलाने स्पष्टता केलेली नाही. जगातील अन्य क्रुझ क्षेपणास्त्रांच्या तुलनेत ब्राम्होस वेगळे आहे. २०० ते ३०० किलोग्रॅमची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे ते वाहून नेऊ शकते. आधीची आवृत्ती ध्वनीच्या तीनपट वेगाने प्रवास करू शकते तर, नवी आवृत्ती ध्वनीच्या चार पट वेगाने ४०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर मारा करण्याची क्षमता राखते. यातील ‘ब्राह्मोस-ईआर’ हे दोन टप्प्यांतील क्षेपणास्त्र आहे. ज्यामध्ये घन प्रणोदक बूस्टरचा पहिला टप्पा असून दुसरा टप्पा द्रव-इंधनावर आधारित रॅमजेट इंजिन आहे. यामुळे स्वनातीत वेगापेक्षा जास्त शक्ती मिळते. ‘डागा व विसरा’ (फायर अँड फर्गेट) या तत्त्वावर चालणारे हे क्षेपणास्त्र एकदा सोडल्यानंतर कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय लक्ष्यावर मारा करू शकते. नवीन आवृत्ती जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. विलक्षण वेग आणि रडारवर येण्याची शक्यता नसल्याने ब्राम्होसला रोखणे अशक्य ठरते.

हेही वाचा – विश्लेषण : मोदी, शहांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखला जाईल? जागावाटपाच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला…

चाचण्यांची शृंखला कशी आहे?

भारत-रशियन संयुक्त उपक्रमांतर्गत १९९८मध्ये स्थापन झालेल्या ब्राम्होस एरोस्पेसकडून ब्राम्होस या स्वनातीत क्रुझ क्षेपणास्त्राचा विकास झाला आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियाच्या लष्करी औद्योगिक संघ यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. ब्राम्होसचे पहिले यशस्वी उड्डाण १२ जून २००१ रोजी झाले होते. विकसन टप्प्यात चाचण्यांचे अनेक टप्पे पार पडले. आयएनएस तरकश युद्धनौकेवरून २९० किलोमीटर मारक क्षमतेच्या स्वनातीत क्षेपणास्त्रांची पहिली यशस्वी चाचणी २०१३ मध्ये झाली होती. पुढील काळात नव्या विस्तारित पल्ल्याच्या ब्राम्होसच्या वेगवेगळ्या युद्धनौकांवर चाचण्या घेतल्या गेल्या. अलीकडेच वर्धित श्रेणीतील क्षेपणास्त्राची नौदलाने यशस्वी चाचणी घेतली आहे. ब्राम्होस क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहे. ते जमीन, पाणी आणि हवेतून डागता येते.

स्वदेशीकरणाचा प्रवास कसा आहे?

या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली, तेव्हा प्रकल्पाची स्वदेशी क्षमता केवळ १३ टक्के होती. अडीच दशकात ७५ टक्के स्वदेशी क्षमता गाठण्यात आली. ज्यात क्षेपणास्त्राचे भाग, सुटे भाग व त्याची चाचणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणे आदींचा समावेश आहे. या कामात २०० हून अधिक भारतीय उद्योग गुंतले आहेत. पाच वर्षांपूर्वी भारतीय संरक्षण व संशोधन संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी इंधन प्रणोदन प्रणाली, वीज पुरवठा व अन्य वैशिष्ट्ये सामावणाऱ्या ब्राम्होसची चाचणी केली होती. डीआरडीओ ‘ब्राम्होस-ईआर’ स्वदेशी साधक व बुस्टर वापरत आहे. ब्राम्होसचे बहुतांश स्वदेशीकरण होत असले तरी काही घटक मात्र रशियन रचनेचे वापरले जातील. कारण हा उभय देशांचा संयुक्त प्रकल्प आहे. नौदलासाठी झालेल्या क्षेपणास्त्र कराराने देशातील संयुक्त उपक्रमात नऊ लाख मनुष्य दिवस, सहायक उद्योगांमध्ये सुमारे १३५ लाख मनुष्य दिवस क्षमतेची रोजगार निर्मिती होईल. तर प्रणालीच्या प्रकल्पातून सात ते आठ वर्षांच्या काळात देशात सुमारे ६० हजार इतकी मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmos missile analysis indian navy also now has bramhos missile how will it make a difference in the strike capability print exp ssb