– ज्ञानेश भुरे
फुटबॉल विश्वातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू अशी पेले यांची ओळख आज नव्या सहस्रकातही कायम आहे. पन्नासच्या दशकापासून ७०च्या दशकापर्यंत पेले फुटबॉल विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू होते. तीन विश्वचषक विजेत्या (१९५८, १९६२ आणि १९७०) संघांत त्यांचा सहभाग होता. चाहत्यांच्या मनांवर त्यांनी अधिराज्य केले. फुटबॉल विश्वाला पडलेले स्वप्नच म्हणता येईल, असे त्यांचे फुटबॉल मैदानावरील कर्तृत्व आहे.
पेले सध्या पुन्हा बातम्यांमध्ये का आहेत?
कर्करोगाने पेले यांना ग्रासले आहे… त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे आणि नाताळ साजरा करण्यासाठी एकत्र जमलेली त्यांची मुले-नातवंडे आता, पेले यांची शुश्रूषा तसेच त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यातच गुंतली आहेत. ब्राझीलची (किंबहुना दक्षिण अमेरिका खंडाचीच आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या साव पावलो शहरातील ‘आल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालया’त पेले यांच्यावर गेले अनेक उपचार सुरू आहेत. तेथून तीन डिसेंबर रोजी खुद्द पेले यांनीच ‘मी बरा आहे, काळजी नको’ असा संदेश धाडला होता, परंतु १४ डिसेंबरला डॉक्टरांनी- ‘पेले उपचारांचा प्रतिसाद देत असले तरीही ते घरी जाण्याच्या स्थितीत नाहीत’ असे स्पष्ट केले. अखेर २५ डिसेंबरच्या रात्री त्यांची तब्येत आणखी खालावल्याचे त्यांची विवाहित कन्या केटी नासिमेन्टो यांनी जाहीर केले. पेले यांचे फुटबॉलपटू पुत्र एड्सन चोल्बी ऊर्फ एडिन्हाे यांनीही त्यास दुजोरा दिला.
पेले यांच्या कारकीर्दीला कशी सुरुवात झाली?
साओ पावलो राज्यातील बौरु येथील छोट्या लीग स्पर्धेत खेळल्यानंतरही पेले यांना शहरातील नामवंत क्लब संघांनी नाकारले होते. अखेरीस १९५६ मद्ये पेले सर्व प्रथम सॅण्टोस क्लबशी जोडले गेले. येथूनच पेले यांचा खऱ्या अर्थाने उदय झाला. तेथून त्यांचे प्रत्येक सामन्यातील मैदानावरील पाऊल हे जणू ऐतिहासिक आणि विक्रमी ठरले. सॅण्टोससाठी त्यांनी ९ साओ पावलो लीग स्पर्धा जिंकल्या. त्यानंतर १९६२ मध्ये लिबर्टाडोरेस चषक आणि १९६३ मध्ये इंटरकॉन्टिनेन्टल क्लब चषक अशा स्पर्धाही जिंकल्या.
पेले यांच्या खेळाचे वैशिष्ट्य काय?
ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यावर १९५८च्या विश्वचषक स्पर्धेपासून पेलेंचे नाव फुटबॉल विश्वात झळकू लागले. इतर खेळाडूंच्या चालींचा अंदाज घेऊन, चेंडूवर अचूक नियंत्रण ठेवत अचूक किक मारण्याची त्यांची क्षमता आजही अनेकांसाठी प्रेरक ठरते. चेंडू पायात खेळवून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकक्षात धडकून गोल करणे ही पेलेंच्या वैयक्तिक गोलची खासियत. त्यातही गोलकक्षात कॉर्नरवरून किंवा बाजूने हवेतून पास आल्यावर स्वतःला जागा करून घेत ‘बायसिकल किक’ने गोल करणे ही जणू पेलेंची ओळख झाली. आजही ‘बायसिकल किक’ने गोल झाला की पहिली आठवण पेलेंचीच येते.
पेलेंची आंतरराष्ट्रीय कामगिरी कशी?
पेलेंनी १९५७ मध्ये वयाच्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अर्थात आजही फुटबॉलमध्ये दोन देशांमध्ये वेगळे असे सामने फार खेळले जात नाहीत. विश्वचषक पात्रता फेरी आणि विश्वचषक स्पर्धा याच सामन्यांना फुटबॉलमध्ये महत्व आहे. पेलेंना १९५८ मध्ये विश्वचषक स्पर्धेसाठी ब्राझील संघात स्थान मिळाले. फ्रान्सविरुद्ध उपांत्य फेरीत पेले विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळले. तेव्हा फ्रान्सविरुद्ध त्यांनी हॅटट्रिक केली. त्यानंतर विजेतेपदाच्या सामन्यात पेलेंनी स्वीडनविरुद्ध दोन गोल केले. ब्राझीलने हा सामना ५-२ असा जिंकला होता. पुढे १९६२ मध्ये दुसऱ्याच सामन्यात त्यांना स्नायूची दुखापत झाली आणि त्यांना उर्वरित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तरी ब्राझील दुसऱ्यांदा जिंकले. पुढे १९६६ च्या स्पर्धेत पेले आणि ब्राझील संघच दुखापतींनी जर्जर झाला होता. त्यांच्यासाठी ही सर्वात खराब स्पर्धा ठरली. ब्राझीलला पहिल्याच फेरीत आव्हान गमवावे लागले. पेलेंनी निवृत्तीचा निर्णय घेण्याची तयारी ठेवली. पण, त्यांचे मन वळविण्यात यश आले आणि १९७० मध्ये ते पुन्हा विश्वचषक स्पर्धेत खेळले. तेव्हा ब्राझीलने तिसरे विजेतेपद पटकावले आणि ज्यूल्स रीमेट चषक कायमस्वरूपी मिळविला. तेव्हा पेलेंना जैरझिन्हो आणि रिव्हेलिनो या युवा खेळाडूंची साथ मिळाली. त्या स्पर्धेनंतर पेलेंनी विश्वचषक स्पर्धेला रामराम केला. पेलेंनी १४ विश्वचषक सामन्यात १२ गोल केले.
पेले युरोपियन क्लबकडून का खेळू शकले नाहीत?
पेले आपल्या कारकिर्दीत युरोपियन क्बकडून कधीच खेळले नाहीत. अर्थात, यामुळे पेले यांची नैसर्गिक शैली कायम राखली गेली. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पेले यांनाही परदेशातून विशेषतः युरोपमधून खेळण्याचे अनेक प्रस्ताव आले. मात्र, प्रत्येक प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला. खरे तर पेलेंनी परदेशात जाण्यापासून ब्राझीलनेच रोखले होते. त्या काळात, कुठून खेळायचे हा निर्णय आजच्या सारखा खेळाडूंच्या हातात नव्हता. पेलेंनी ब्राझीलमध्ये राहावे यासाठी सरकारकडून उघड दबाव होता. विशेष म्हणजे १९६१ मध्ये ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती जॅनियो क्वाड्रोस यांनी पेलेंना ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून जाहीर केले. ‘ब्लॅक पर्ल’ ही उपाधीही ब्राझीलनेच पेलेंना दिली. त्यामुळे पेले कधीच ब्राझील सोडून बाहेर खेळले नाहीत. केवळ कारकीर्दीच्या अखेरीस म्हणजे १९७५ नंतर पेले ‘न्यूयॉर्क कॉसमॉस’ या एकमेव परदेशी क्लबकडून खेळले.
पेलेंच्या लोकप्रियतेची उंची किती?
पेलेंचा चाहत्यांवरील प्रभावाचे उत्तम उदाहरण त्यांच्या सुरुवातीच्याच काळाचे देता येईल. सॅण्टोस विरुद्ध कोलंबियन ऑलिम्पिक संघ असा सामना १८ जून १९६८ रोजी सुरु होता, तेव्हाची गोष्ट : पंच गुईलेर्मो यांनी पेले फाऊल असल्याचा निर्णय दिला. तेव्हा त्यांची पंचांशी वादावादी झाली. पंचांशी हुज्जत घातल्यामुळे पेलेंना पंचांनी पेलेला मैदानाबाहेर काढले. तेव्हा उपस्थित प्रेक्षकांना हा निर्णय रुचला नाही. त्यांनी इतका गोंधळ घातला की शेवटी पंच गुईलेर्मो यांनी पेलेंना मैदानात बोलावले आणि आपली शिटी लाइनमनला देऊन ते स्वतः मैदानाबाहेर गेले! सॅण्टोस संघाचा १९६७ मधील नायजेरिया दौरा म्हणजे पेलेंच्या लोकप्रियतेचा कळस होता. तेव्हा नायजेरियात यादवी सुरू होती, पण पेलेंना पाहण्यासाठी चक्क ४८ तासांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता!
पेलेंनी फुटबॉलमधून कधी निवृत्ती घेतली?
दोन दशके फुटबॉल विश्व आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केल्यानंतर पेलेंनी १९७४ मध्ये निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र, १९७५ मध्ये अमेरिकेतील फुटबॉलच्या प्रसाराला गती देण्यासाठी त्यांनी १९७५ मध्ये उत्तर अमेरिकेतील लीगमध्ये खेळण्यास होकार दर्शवला. तेव्हा त्यांना न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबने करारबद्ध केले… हा करार ७० लाख डॉलरचा होता. या कॉसमॉस क्लबला १९७७ मध्ये लीग विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मात्र पेलेंनी फुटबॉल मैदानाचा निरोप घेतला.
पेलेंनी कारकीर्दीत किती गोल केले ?
पेलेंच्या पायात चेंडू गेला आणि ते सुसाट धावत सुटले की गोल करूनच थांबायचे असा जणू फुटबॉल मैदानावरील प्रघातच होऊन बसला होता. पेले यांनी ब्राझीलसाठी सर्वाधिक ७७ गोल केले. त्यांचा हा विक्रम कतार २०२२ विश्वचषक स्पर्धेपर्यंत कायम राहिल. या स्पर्धेत नेयमारने या विक्रमाची बरोबरी केली. पेलेंनी १९ नोव्हेंबर १९६९ रोजी आपल्या ९०९व्या प्रथम श्रेणी सामन्यात वैयक्तिक १०००वा गोल केला. पेलेंनी कारकीर्दीत १३६३ सामन्यांत १२८१ गोल केले, यापैकी १२ गोल १४ विश्वचषक सामन्यांमधील आहेत.
निवृत्तीनंतरही पेले यांचे आयुष्य कसे बहरले?
पेले १९९४ मध्ये युनेस्कोचे राजदूत राहिले. त्यानंतर एक वर्षांनी – १९९५ ते १९९८ पर्यंत, ब्राझीलचे क्रीडामंत्री म्हणून त्यांनी काम केले. तेव्हा ब्राझील फुटबॉल संघटनेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्यांनी एक कायदाच केला. तो ‘पेले लॉ’ म्हणून ओळखला जातो. पेले ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक होते. पण त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले. फुटबॉलच त्यांच्या आयुष्यात सर्वकाही असले, तरी मैदानात त्यांच्या खेळात असलेली लय ही त्यांच्या मनातही होती. त्यांनी अनेक यशस्वी माहितीपटांत आणि लघुपटांत काम केले. हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेला सिल्व्हेस्टर स्टॅलोन आणि पेले हे १९८० मध्ये एका चित्रपटा दरम्यान एकत्र आले. पण, त्या वेळीही स्टॅलोनची (रॅम्बो) लोकप्रियता पेलेंसमोर फिकी पडली. त्यांना संगीताचीही जाण असून त्यांनी अनेक संगीतमय रचनाही केल्या आहेत. यात १९९७ मध्ये निर्माण झालेल्या ‘पेले’ या चरित्रपटाच्या संगीत नियोजनाचीही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या आत्मचरित्रांच्या पुस्तकांवरही त्यांनी काम केलेले आहे.
dnyanesh.bhure@expressindia.com