अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘भक्त’ असलेले ब्राझीलचे माजी अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पारपत्रासह अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली आहे. २०२३ मध्ये केलेला बंडाचा प्रयत्न बोल्सोनारो यांना भोवण्याची शक्यता आहे.
बोल्सोनारो यांच्यावर कारवाई का?
२०२२च्या अखेरीस ब्राझीलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष बोल्सोनारो यांचा पराभव झाला. अतिउजव्या विचारसरणीच्या बोल्सोनारो यांचा पराभव केलेले डाव्या विचारसरणीचे लुईस इनासियो लुला दा सिल्वा सत्तास्थापनेची प्रक्रिया पार पाडत असताना, ८ जानेवारी २०२३ रोजी बोल्सोनारो यांच्या शेकडो समर्थकांनी राजधानी ब्रासिलियामधील कायदेमंडळाच्या इमारतीला वेढा दिला. तसेच अनेक सरकारी इमारतींवरही हल्ले केले गेले. जमावाने राष्ट्रीय न्यायालय, अध्यक्षांचे निवासस्थान येथे प्रचंड धुडगूस घातला. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सिल्वा यांचे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे हे सगळे घडत असताना सिल्वा आणि बोल्सोनारो हे दोघेही राजधानीत नव्हते. सिल्वा सासो पाउलो या शहरात होते, तर बोल्सोनारो अमेरिकेत फ्लोरिडा येथे होते. मात्र ब्राझीलबाहेर असले, तरी सत्ता उलथविण्याचा या कटाला बोल्सोनारो यांचीच फूस होती, असा आरोप असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.
हेही वाचा : विश्लेषण: ‘सेबी’चे फिनफ्लुएन्सर आणि टीव्हीवरील ‘तज्ज्ञ’ पोपटपंचीवरील आक्षेप काय? सेबीची कारवाई कशासाठी?
माजी अध्यक्षांवर कोणकोणते आरोप?
बोल्सोनारो बंडाच्या वेळी देशाबाहेर असले, तरी त्यांच्याच चिथावणीवरून समर्थकांनी गोंधळ घातल्याचा आरोप झाला आहे. या बंडाचे आदेश देणाऱ्या पत्रकाचे संपादन बोल्सोनारो यांनी स्वत: केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे २०२२मध्ये मतदान होण्यापूर्वीच निकाल विरोधात गेला तर काय करायचे, याचा कट शिजल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘बंडाच्या प्रयत्नामागील गुन्हेगारी प्रवृत्ती’चा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अलीकडेच आठ राज्ये आणि ब्राझिलियासह ३३ ठिकाणी छापे टाकले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यात बोल्सोनारो यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश नसला, तरी त्यांच्या चार समर्थकांना अटक झाली असून त्यांच्यामार्फत बंडाचा संबंध बोल्सोनारो यांच्याशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळेच माजी अध्यक्षांना आपले पारपत्र पोलिसांकडे जमा करण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे आता बोल्सोनारो यांना देश सोडून बाहेर जाता येणार नाही.
कारवाईवर आजी-माजी राष्ट्राध्यक्षांचे म्हणणे काय?
अर्थातच, या ताज्या कारवाईवर राष्ट्राध्यक्ष सिल्वा आणि माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित अशाच आहेत. बोल्सोनारोचे वकील फॅबियो वाजनगार्टेन यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे ‘एक्स’ समाजमाध्यमावर जाहीर केले आहे. मात्र ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप बोल्सोनारो यांनी केला आहे. दुसरीकडे सिल्वा यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. अशा प्रकारे हिंसाचारातून सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न पुन्हा होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक असून त्यामुळेच २०२३च्या बंडाची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे. बोल्सोनारो यांचा संबंध असल्याखेरीज हे शक्य नव्हते, असेही सिल्वा यांनी म्हटले असल्याने या चौकशीचा रोख नेमका काय आहे, हे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : विश्लेषण: आता नायगाव ते अलिबाग मेट्रोची धाव? कसा असेल हा मार्ग?
अमेरिका-ब्राझीलमध्ये फरक काय?
ब्राझिलियामध्ये २०२३च्या जानेवारीमध्ये जे घडले, तेच बरोबर दोन वर्षांपूर्वी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये घडले होते. बोल्सोनारो यांचे राजकीय गुरू असलेल्या ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या कायदेमंडळाची इमारत असलेल्या कॅपिटॉलबाहेर दंगल घडविली आणि जो बायडेन यांना अध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. या बंडामागे ट्रम्प यांचा हात असल्याचा आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र त्याच वेळी ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सध्यातरी रिपब्लिकन पक्षातून त्यांना उमेदवारी मिळेल, असेच चित्र आहे. कदाचित ते कॅपिटॉल दंगलीच्या चौथ्या ‘वर्धापनदिनी’ पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत असतील. ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांची राजकीय वाटचाल मात्र खडतर असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर (ट्रम्प यांच्यासारखेच) इतर अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे खटले सुरू आहेत. तसेच त्यांना २०३०पर्यंत कोणतीही निवडणूक लढण्यावर बंदी आहे. मात्र २०२३च्या बंडाला लष्कराची फूस असल्याचा काही बोल्सोनारो समर्थकांचा दावा आहे. सिल्वा यांच्या सरकारला लोकशाही टिकवायची असेल, तर या दाव्याचाही तपास केला जावा, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
amol.paranjpe@expressindia.com