भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच आरोपांना घेऊन कुस्तीपटूंकडून दिल्लीमधील जंतर मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे. परिणामी हा मुद्दा देशपातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काय आरोप आहेत, कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांचे नेमके काय झाले, या प्रकरणात सरकार तसेच न्यायालयाने काय भूमिका घेतली आहे, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या.
२८ एप्रिल रोजी होणार याचिकेवर सुनावणी!
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून, ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजेच २८ एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना एक नोटीस बजावली आहे. ब्रिजभूषण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. यासह ते भाजपाचे खासदार असून उत्तर प्रदेशमधील कैसरगंज या मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. एकूण सात महिला कुस्तीपटूंनी याचिकेव्यतिरिक्त ब्रिजभूषण सिहं यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून २०१२ ते २०२२ या साधारण १० वर्षांपासून लैंगिक छळ करण्यात आला, असा आरोप या महिला कुस्तीपटूंनी केलेला आहे.
आतापर्यंत या प्रकरणात नेमके काय घडले?
या वर्षाच्या जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र पुन्हा एकदा कुस्तीपटू आक्रमक झाले असून त्यांनी जंतर मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात केंद्र सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. तसेच आमचा या समितीवरील विश्वास उडाला आहे. जानेवारी महिन्यात ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले हेते. मात्र त्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
एकीकडे ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असून त्यांची चौकशी केली जात आहे. असे असताना दुसरीकडे भारतीय कुस्ती महासंघाने सामन्यांचे आयोजन केल्यामुळेही कुस्तीपटूंकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ब्रिजभूषण सिंह महासंघाच्या निर्णय-प्रक्रियेत सहभाग घेत आहेत, असा आरोपही कुस्तीपटूंकडून केला जात आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात किती कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत?
एकूण सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे. या सात तक्रारदारांची नावे समोर आलेली नाहीत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील ही नावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण सात कुस्तीपटूंपैकी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे तीन कुस्तीपटू या प्रकरणात आघाडीवर आहेत. कुस्तीपटूंनी जानेवारी महिन्यात ब्रिजभूषण यांच्याविरोधात पहिल्या टप्प्यातील आंदोलन केले होते. या आंदोलनात अंशू मलिक, सोनम मलिक, रवी दहिया, दीपक पुनिया आदी कुस्तीपटूंनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. तर या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सध्या तरी फक्त साक्षी मलिक, विनेश फोगाट, आणिं बजरंग पुनिया हे कुस्तीपटू आंदोलन करताना दिसत आहेत.
ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?
ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशमधील राजकारणी असून त्यांनी आतापर्यंत सहा वेळा खासदारकीची निवडणूक जिंकलेली आहे. १९९१ आणि १९९९ साली त्यांनी गोंडा मतदारसंघातून विजय मिळवला होता. तर २००४ साली त्यांनी बलरामपूर येथून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. २००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कैसरगंज येथून विजयी कामगिरी करून दाखवली होती. २००९ ची लोकसभा निवडणूक वगळता बाकी सर्वच निवडणुकींत ब्रिजभूषण सिंह भाजपाचे उमेदवार होते. २००९ साली त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तसेच बाबरी मशीद खटल्यातही त्यांचे नाव होते.
ब्रिजभूषण यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
राजकारणासह क्रीडा क्षेत्रातही त्यांचे वर्चस्व आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद, केंद्र सरकारच्या मिशन ऑलिम्पिक सेलचे सदस्यत्व, एशियन रिस्टलिंग फेडरेशनचे उपाध्यक्षपद भूषवलेले आहे. मिशन ऑलिम्पिक सेलकडून खेळाडूंची निवड केली जाते, तसेच खेळाडूंच्या प्रशिक्षणासंदर्भात निर्णय घेतले जातात.
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काय आरोप आहेत?
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्ती महासंघात आर्थिक गैरव्यवस्थापन, मनमानी कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह त्यांच्यावर लैंगिक छळाचेही आरोप करण्यात आले आहेत. २०१२ ते २०२२ या काळात ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक गैरवर्तन करण्यात आल्याचे कुस्तीगिरांनी म्हटले आहे. हे लैंगिक गैरवर्तन ब्रिजभूषण यांच्या दिल्लीमधील बंगल्यात, देशांतर्गत तसेच परदेशात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेदरम्यान झाले आहे, असा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. क्रीडा मंत्रालयाने इंडियन ऑलिम्पिक असोशिएशनने एक पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार कुस्तीपटूंनी फक्त ब्रिजभूषण सिंह यांच्यावरच नव्हे तर प्रशिक्षक, महासंघाचे कर्मचारी यांच्यावरही आरोप केलेले आहेत. त्यांची नावे मात्र अद्याप समोर आलेली नाहीत.
कुस्तीपटूंकडून काय आरोप केले जात आहेत?
ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवायला हवा. या प्रकरणात एका अल्पवयीन कुस्तीपटूनेही ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे सिंह यांच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करावी. ब्रिजभूषण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवावे तसेच भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.
दहा वर्षांपासून लैंगिक छळ, मग आताच कुस्ती आक्रमक का झाले?
जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी आंदोलनाला सुरुवात केली होती. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी सांगितल्याप्रमाणे विनेश फोगाटला एका तरुण महिला कुस्तीपटूचा कॉल आला होता. या महिला कुस्तीपटूने लखनौ येथील नॅशनल कॅम्पमधील धोकादायक वातावरणाबद्दल सांगितले. हा कॉल आल्यानंतर विनेश, साक्षी आणि बजरंग पुनिया यांनी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर या प्रकरणात ब्रिजभूषण सिंह आणि काही प्रशिक्षकांकडून लैंगिक छळ करण्यात आला, या निष्कर्षापर्यंत ते आले. पुढे अंशू मलिक आणि सोनम मलिक या कुस्तीपटूंनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
कुस्तीपटूंच्या आरोपांनंतर सरकारने काय कारवाई केली?
कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर सरकारने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीकडे भारतीय कुस्ती महासंघाच्या कामकाजाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. या सहासदस्यीय चौकशी समितीच्या अध्यक्षपदी मेरी कॉम यांची नेमणूक करण्यात आली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीला ४ आठवड्यांचा वेळ देण्यात आला. या समितीने ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांबाबतचा चौकशी अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे सादर केलेला आहे. या चौकशी समितीचा अहवाल मात्र अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.