रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष मागील अनेक दिवसांपासून सुरूच आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांनी रशियावर वेगवेगळे निर्बंध लादले आहेत. मात्र तरीदेखील रशिया माघार घेण्याच्या मानसिकतेत नाही. अमेरिका, ब्रिटन तसेच नाटो देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. ब्रिटनने नुकतेच युक्रेनला सुरक्षाकवच भेदणाऱ्या डिप्लेटेड युरेनियमचा ( Depleted Uranium) समावेश असणारी शस्त्रे देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रशियानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील बेलारुस या भागात अण्वस्त्रे तैनात करणार असल्याचे जाहीर केले आहे. २५ मार्च रोजी पुतीन यांनी ही घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर डिप्लेटेड युरेनियम म्हणजे काय? डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेली शस्त्रे काय असतात? अशा प्रकारची शस्त्रे कोणत्या देशांकडे आहेत? हे जाणून घेऊ या.
रशियाकडे साधारण दोन हजार अण्वस्त्रे
व्लादिमीर पुतीन यांनी बेलारुस या भागात नेमकी किती अण्वस्त्रे तैनात करणार? याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र रशियाकडे साधारण दोन हजार अण्वस्त्रे असतील असा अमेरिका सरकारचा अंदाज आहे. यामध्ये सामरिक विमानांतून वाहून नेता येतील असे बॉम्ब, लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे, तोफगोळे आदी शस्त्रांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : नवरोज सणाचे महत्त्व काय? कुर्दीश, पारसी समाजात तो कसा साजरा केला जातो?
ब्रिटनने काय घोषणा केलेली आहे?
ब्रिटन सरकारने युक्रेनला डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेली शस्त्रे पुरविण्याचे जाहीर केले आहे. याबाबत ब्रिटनच्या संरक्षण राज्यमंत्री अॅनाबेल गोल्डी यांनी २० मार्च रोजी अधिक माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटन युक्रेनला चॅलेंजर- २ रणगाड्यांसाठी लागणारी शस्त्रे पुरविणार आहे. यामध्ये सुरक्षाकवच भेदणाऱ्या डिप्लेटेड युरेनियमच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या शस्त्रांचाही समावेश आहे.
डिप्लेटेड युरेनियम म्हणजे काय?
गुणवत्तापूर्ण युरेनियमनिर्मिती प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे हे एक बायप्रॉडक्ट आहे. युरेनियमचा उपयोग अणुभट्टी, अण्वस्त्रनिर्मितीमध्ये केला जातो. तुलनाच करायची झाल्यास युरेनियमच्या तुलनेत डिप्लेटेड युरेनियम कमी किरणोत्सर्गी असतो. तसेच डिप्लेटेड युरेनियममुळे न्यूक्लियर रिअॅक्शनही होत नाही. डिप्लेटेड युरेनियमचा शस्त्रे बनवण्यासाठी उपयोग केला जातो. डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेली शस्त्रे सुरक्षाकवच भेदण्यास सक्षम असतात. अमेरिकेने अशा प्रकारची शस्त्रे बनविण्यास १९७० सालीच सुरुवात केल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा >>> विश्लेषण : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताची तयारी कशी? ऑस्ट्रेलिया मालिकेतून कोणत्या त्रुटी दिसल्या?
सध्या कोणत्या देशांकडे अशी शस्त्रे आहेत?
सध्या अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्स, पाकिस्तान आदी देशांकडे अशा प्रकारची शस्त्रे आहेत आहेत. विशेष म्हणजे डिप्लेटेड युरेनियममुळे किरणोत्सर्ग होत नसल्यामुळे त्याच्यापासून तयार करण्यात आलेल्या अस्त्रांचा अण्वस्त्रांमध्ये समावेश होत नाही.
डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेल्या शस्त्रांचा धोका काय आहे?
डिप्लेटेड युरेनियमच्या मदतीने तयार केलेल्या शस्त्रांचा अण्वस्त्रांमध्ये समावेश होत नसला तरी, अशी शस्त्रे घातक असतात. कारण या शस्त्रांचा वापर केल्यानंतर त्यांच्यातून काही प्रमाणात किरणोत्सार होतो, त्यामुळे आजारांची शक्यता असते. युरेनियम श्वसनामार्फत शरीरात गेल्यास मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता असते. तसेच कॅन्सरचाही धोका उद्भवतो. डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेल्या शस्त्रांमुळे भूगर्भातील पाणी तसेच माती दूषित होण्याचा धोका असतो.
हेही वाचा >>> विश्लेषण : करोनानंतर आता मारबर्ग विषाणू, टांझानियामध्ये ५ जणांचा मृत्यू, लक्षणं काय? जाणून घ्या
आतापर्यंत अनेक वेळा अशा शस्त्रांचा झाला आहे वापर
दरम्यान, आतापर्यंत अनेक वेळा अशा शस्त्रांचा वापर करण्यात आलेला आहे. १९९१ साली आखाती युद्धामध्ये इराकचे टी-७२ रणगाडे नष्ट करण्यासाठी डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेल्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. तसेच १९९९ साली नाटो देशांनी युगोस्लाव्हियावर केलेल्या हल्ल्यात, तसेच २००३ साली इराकवरील आक्रमणादरम्यान या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.