ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक शनिवारी ६ मे रोजी होणार आहे. ब्रिटनमध्ये तब्बल ७० वर्षांनी हा सोहळा होत आहे. त्यामुळे ब्रिटिश जनतेला त्याचे जितके कौतुक आहे, तितकेच कुतूहल जगभरातही आहे. आपण थोडक्यात त्याची माहिती करून घेणार आहोत.
राज्याभिषेकाचे स्वरूप कसे असेल?
बकिंगहॅम राजप्रासादाने दिलेल्या माहितीनुसार, राजे चार्ल्स (तृतीय) यांची वर्तमानकाळातील भूमिका आणि भविष्याबद्दलचा दृष्टिकोन याचे प्रतिबिंब या सोहळ्यात उमटेल. त्याच वेळी अनेक शतकांचा इतिहास असलेल्या परंपरा आणि दिमाख यांचे प्रदर्शनही घडेल. ब्रिटनचे शाही चर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्टमिन्स्टर ॲबे येथे राज्याभिषेकाचा सोहळा पार पडेल. तब्बल ९०० वर्षांपासून याच चर्चमध्ये ब्रिटनच्या राजा आणि राणीचा राज्याभिषेक केला जातो. त्यापूर्वी राजे चार्ल्स (तृतीय) आणि राणी कॅमिला यांची बकिंगहॅम राजप्रासादापासून वेस्टमिन्स्टर ॲबेपर्यंत मिरवणूक निघेल. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता ही मिरवणूक सुरू होईल आणि दुपारी १ वाजता संपेल. कँटरबरीचे आर्चबिशप त्याचे आधिपत्य करतील. त्यानंतर लढाऊ विमानांनी नवीन राजाला मानवंदना दिली जाईल. या वेळी शाही कुटुंब बकिंगहॅम राजवाड्याच्या बाल्कनीत उपस्थित राहून ही मानवंदना स्वीकारतील.
सोहळ्यानंतर कोणते कार्यक्रम असतील?
विंडसर किल्ल्यामध्ये रविवारी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कॅटी पेरी, अँड्रे बोचेली, लियोनेल रिची आणि इतर कलाकारांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याशिवाय रविवारी सामुदायिक भोजन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत, तर सोमवारी काही स्वयंसेवी कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजे चार्ल्स यांची सामाजिक कार्यांची आवड लक्षात घेऊन हा कार्यक्रम कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे.
विश्लेषण: ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीचा हवाई क्षेत्रावर परिणाम काय?
कोणत्या परंपरांचे पालन केले जाईल?
राजघराण्याच्या परंपरांचा उचित मान राखला जाईल. तसेच काही ऐतिहासिक वस्तूंचाही पुनर्वापर केला जाईल. उदाहरणार्थ, संपूर्ण सोहळ्यादरम्यान राजे चार्ल्स (तृतीय) हे सहा निरनिराळे पोशाख परिधान करणार आहेत. त्यापैकी एक पोशाख राजे जॉर्ज (सहावे) यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरलेला पोशाख असेल. तसेच सोहळ्यासाठी काही आधीच्या खुर्च्यांचाही वापर केला जाईल. राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी वापरलेली आणि १९५३ मध्ये घडवलेली चेअर्स ऑफ इस्टेट राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी वापरली जाईल.
यंदाचा सोहळा आधीपेक्षा कसा वेगळा असेल?
राणी कॅमिला राज्याभिषेकासाठी कोहिनूर हिरा जडवलेला प्लॅटिनमचा मुकुट परिधान करणार नाहीत. कोहिनूर हिरा वापरल्यास भारतामध्ये त्याची फारशी चांगली प्रतिक्रिया उमटणार नाही असा अंदाज असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याभिषेकाच्या कार्यक्रमात प्रथमच महिला बिशप सहभागी होणार आहेत. त्याशिवाय या वेळी प्रथमच जगभरातील विविध धर्मांचे प्रतिनिधित्व दिसून येईल. ज्यू, हिंदू, शीख, मुस्लीम आणि बौद्ध या धर्मांचे धार्मिक नेते या वेळी राजांना राजवस्त्रे प्रदान करतील आणि शुभेच्छा देतील. तसेच राजाला देण्यात येणाऱ्या शपथेमध्येही या धार्मिक विविधतेचे प्रतिबिंब
पडलेले दिसून येईल. राज्याभिषेकादरम्यान सामान्य नागरिकांना राजनिष्ठेची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
राज्याभिषेक कसा करतात?
राज्याभिषेकाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राजाला तेल लावून पवित्र केले जाते आणि त्यामुळे राजा हा प्रजेपेक्षा वेगळा असल्याचे मानले जाते. या वेळी राजे चार्ल्स (तृतीय) यांच्याभोवती पडदा असेल. तेल लावण्याचा विधी दूरचित्रवाणीवर किंवा ॲबेमध्ये उपस्थित असलेल्या बहुसंख्य लोकांना दिसणार नाही. केवळ काही वरिष्ठ पाद्रीच हा सोहळा पाहू शकतील. यानंतर राजाला राजवस्त्रे तसेच इतर काही पवित्र वस्तू प्रदान केल्या जातील. यानंतर राजाचा राज्याभिषेक जाहीर केला जाईल आणि गॉड सेव्ह द किंग या पारंपरिक गीताचा जयघोष केला जाईल. त्यानंतर राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक केला जाईल. मात्र त्यांच्याभोवती पडदा असणार नाही.
विश्लेषण: नोकरीला पर्याय ठरतेय का ‘गिग’ मॉडेल? या कर्मचाऱ्यांना कायद्याचे संरक्षण किती?
सिंहासनाचा काय आहे इतिहास?
राज्याभिषेकासाठी ७०० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले सिंहासन वापरले जाईल. हे आसन सर्वात आधी एडवर्ड द कन्फेसर यांनी वापरले होते. हे सिंहासन १५२ किलो दगडांपासून तयार करण्यात आले होते, त्याला स्टोन ऑफ डेस्टिनी असेही म्हणतात. स्कॉटलंडच्या राज्यकर्त्यांनी अनेक दशके त्याचा वापर केला होता. त्यानंतर इंग्लंडचे राजे एडवर्ड (प्रथम) यांनी १२९६ मध्ये ते हस्तगत केले. पुढे १६०३ मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंडचे राजघराणे एक झाले. माजी पंतप्रधान जॉन मेजर यांनी १९९६ मध्ये ते स्कॉटलंडला परत केले होते. ते गेल्या आठवड्यात खास राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये परत आणले आहे.
आमंत्रितांमध्ये कोणाचा समावेश आहे?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड भारताचे प्रतिनिधित्व करतील. यापूर्वी राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहिल्या होत्या. तर राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या राज्याभिषेकासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. ब्रिटनच्या राजा आणि राणीच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, भूतानचे राजा आणि राणी, जपानचे युवराज आणि युवराज्ञी आणि माओरीचे राजा आणि राणी हेदेखील उपस्थित राहतील.