ब्रिटनमधील कौटुंबिक डॉक्टर थॉमस क्वान याने बनावट लसीने आपल्या आईच्या साथीदाराची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर बनावट कोव्हिड लसीच्या प्रकरणाची चर्चा जोर धरत आहे. त्यासाठी थॉमस क्वान बुस्टर शॉट देण्याच्या निमित्ताने त्याच्या आईचा जोडीदार पॅट्रिक ओ’हाराकडे वेश बदलून गेला आणि हत्येचा प्रयत्न केला. ‘बीबीसीच्या म्हणण्यानुसार, ईशान्य इंग्लंडमधील न्यूकॅसल क्राउन न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान वकील थॉमस मेकपीस यांनी क्वानच्या या योजनेचे वर्णन अमानवी असे केले. नक्की हे प्रकरण काय? बनावट कोविड लसीच्या हत्याप्रकरणाची चर्चा का होत आहे? जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

फिर्यादींनी सांगितले की, ५३ वर्षीय क्वानने २२ जानेवारी रोजी पीडितेच्या न्यूकॅसलयेथील घरी वेश धारण करून जाण्यासाठी आणि हल्ल्याची तयारी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. क्वान न्यूकॅसलपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर असलेल्या संदरलँडचा एक सामान्य चिकित्सक आहे, ओ’हाराला कोव्हिड -१९ लसीची गरज असल्याची दोन बनावट पत्रं त्याने पाठवली. “परिचारिका म्हणून वेश धारण करणे, ओ’हाराच्या पत्त्यावर जाणे आणि कोव्हिड बूस्टर लस देण्याच्या निमित्ताने त्याला धोकादायक विष असलेले इंजेक्शन टोचणे अशी त्याची योजना होती,” असे मेकपीस म्हणाले.

५३ वर्षीय क्वानने २२ जानेवारी रोजी पीडितेच्या न्यूकॅसलयेथील घरी वेश धारण करून जाण्यासाठी आणि हल्ल्याची तयारी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

हेही वाचा : दहशतवाद्यांकडून वडिलांची हत्या; मुस्लीमबहुल मतदारसंघात विजयी झालेल्या भाजपाच्या शगुन परिहार कोण?

त्याने भेटीच्या दिवशी पहाटे २.४५ वाजता राज पटेल या खोट्या नावाने हॉटेलमध्ये नोंदणी केली. मेकपीसने सांगितले की, क्वानने बनावट कागदपत्रे तयार केली, बनावट परवाना प्लेट्स असलेले वाहन वापरले आणि डोक्यापासून पायापर्यंत संरक्षणात्मक कपडे, चष्मा आणि पीडितेच्या घरी जाण्यासाठी सर्जिकल मास्कचा वेश घातला. ओ’हाराच्या घरात क्वानने तब्बल ४५ मिनिटे घालवली, वैद्यकीय चाचण्या केल्या आणि ओ’हाराला बनावट कोव्हिडचा बूस्टर दिला. इंजेक्शन दिल्यानंतर ओ’हाराला भयंकर वेदना जाणवू लागल्या, ज्यानंतर ते रुग्णालयात गेले; जेथे डॉक्टरांनी त्यांना नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस म्हणून ओळखला जाणारा दुर्मीळ आणि जीवघेणा आजार असल्याचे सांगितले. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे हे स्पष्ट करतात की, हा अतिशय जीवघेणा आजार आहे. त्यात सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, तीव्र वेदना आणि वेगाने पसरणारा संसर्ग दिसून येतो. या आजाराचे निदान झाल्यानंतर ओ’हाराने अनेक आठवडे अतिदक्षता विभागात घालवले. संसर्ग वेगाने पसरण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या हाताचा एक भागही कापण्यात आला.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, क्वानने त्याच्या आईच्या संगणकावर स्पायवेअरदेखील स्थापित केले होते, जेणेकरून तो त्यांच्या क्रियाकलापांवर ऑनलाइन नजर ठेवू शकेल आणि एक गुप्त कॅमेराही बसवला होता. पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने त्याची ओळख पटली. ज्या पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली, त्यांना आर्सेनिक आणि लिक्विड मर्क्युरी, तसेच एरंडेल बीन्ससह अनेक प्रकारची विषारी रसायने आढळून आली, असे ‘एपी’च्या वृत्तात सांगण्यात आले. क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसचे क्रिस्टोफर ऍटकिन्सन म्हणाले की, “ओ’हारा यांची तब्येत आणखी बिघडू शकते. क्वानचा जीव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी त्या विषारी इंजेक्शनचे घातक परिणाम अजूनही दिसून येत आहेत,” असे तो म्हणाला.

हेही वाचा : टोमॅटो प्रतिकिलो १०० रुपयांवर; टोमॅटोचे दर वाढण्यामागील कारणं काय? दर चढेच राहणार की खाली येणार; नेमकी परिस्थिती काय?

हेतू काय होता?

पैसा आणि वारसा या दोन गोष्टींसाठी क्वानने आपल्या आईच्या जोडीदाराला संपवण्याचा प्रयत्न केला. क्वानची आई जेनी लेउंगला घराचा वारसा मिळावा अशी व्यवस्था ओ’हारा यांनी केली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर लेउंगला त्याच घरात राहण्याची परवानगीही दिली होती. ओ’हाराच्या निधनानंतरच त्यांच्या उत्तराधिकार्‍याला मालमत्ता हस्तांतरित केली जाणे शक्य होते. स्काय न्यूजच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे क्वानचा त्याच्या आईबरोबरच्या नातेसंबंधात ताण निर्माण झाला. सुरुवातीला क्वानने हत्येचा प्रयत्न आणि जाणीवपूर्वक शारीरिक इजा केल्याचा आरोप नाकारला आणि केवळ विषारी पदार्थ दिल्याचे कबूल केले. परंतु, खटला सुरू असताना त्याने खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप मान्य केला आणि त्याला दोषी ठरवण्यात आले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: British doctor who tried killing mother partner with fake covid jab rac