संदीप नलावडे
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या अडचणीत सापडले असून त्यांचे सासरे नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस या कंपनीची ब्रिटनमधील गुंतवणूक वाढविण्यासाठी ब्रिटन सरकारकडून प्रयत्न केले गेल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. गेल्या वर्षी ब्रिटनचे व्यापार मंत्री लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन यांनी भारत दौऱ्यात इन्फोसिस कंपनीच्या ब्रिटनमधील गुंतवणुकीबाबत चर्चा केल्यामुळे हे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे ब्रिटिश पंतप्रधान अडचणीत सापडून त्यांचे पद धोक्यात येऊ शकते का हे पाहावे लागेल…
ब्रिटिश पंतप्रधानांवर काय आरोप करण्यात आले आहेत?
मूळ भारतीय वंशाचे असलेल्या ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सासरे भारतातील अब्जाधीश व्यापारी आणि ‘इन्फोसिस टेक्नॉलॉजी’ या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीचे सहसंस्थापक आहेत. ब्रिटनचे व्यापार मंत्री लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इन्फोसिस कंपनीच्या बंगळूरु कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी इन्फोसिस कंपनीला ब्रिटनमध्ये पाय रोवण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, सुनक यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या कंपनीला ब्रिटनमध्ये ‘व्हीआयपी प्रवेश’ देण्यात आला आहे. केवळ आपल्या सासऱ्याची कंपनी असल्याने इन्फोसिसचा ब्रिटनमध्ये विस्तार करण्यास मदत करण्याचे आश्वासन सुनक यांनी दिले होते. व्यापार मंत्री लॉर्ड जॉन्सन आणि इन्फोसिस कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी झालेल्या चर्चेचा अहवाल ‘संडे मिरर’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. लॉर्ड जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये इन्फोसिसच्या विस्ताराची इच्छा व्यक्त केली. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जे काही करता येईल, ते करण्यात आनंद होईल, असे या बैठकीत ठरले असल्याचे ‘संडे मिरर’ने वृत्त दिले आहे. इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना ब्रिटनचा वैयक्तिक व्हिसा सुलभ पद्धतीने प्राप्त होण्यासाठीही जाॅन्सन यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>कर्नाटकात ‘मंकी फिव्हर’चा वाढता कहर : मानवासाठी धोकादायक ठरत असलेला हा आजार काय आहे?
विरोधी पक्षांची टीका…
ऋषी सुनक यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपानंतर ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनच्या व्यापार मंत्र्यांनी इन्फोसिसकडून मिळालेल्या ‘विशेष पाहुणचारा’बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मजूर पक्षाचे सदस्य जोनाथन ॲशवर्थ म्हणाले की, सरकारने या गंभीर प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. वैयक्तिक करोनारोधक उपकरणे (पीपीई) यांवर खर्च केलेल्या सरकारी निधीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर हे आरोप करण्यात आले आहेत. करदात्यांची अब्जावधीची रक्कम निकटवर्तीयांना दिल्यानंतर नागरिकांना आश्चर्य वाटेल की सुनक यांनी आपल्या कौटुंबिक संबंध असलेल्या कंपनीला ‘व्हीआयपी प्रवेश’ का दिला. हा गंभीर प्रश्न असून सुनक यांनी याची उत्तरे दिली पाहिजे, असे ॲशवर्थ म्हणाले. ॲशवर्थ हे विरोधी पक्षाच्या प्रतिरूप (शॅडो) मंत्रिमंडळातील कामगारमंत्री आहेत. मजूर पक्षाचे उपनेते डेजी कूपर यांनीही सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ब्रिटनचे सरकार राजकारणाविषयी जनतेच्या मनात असलेल्या विश्वासाला तडा जाऊ देण्याचे काम करत आहेत. पंतप्रधानांनी इन्फोसिस कंपनीशी व्यवहार करताना पूर्ण पारदर्शकता ठेवली पाहिजे.
सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचा इन्फोसिसशी संबंध काय?
ब्रिटनचे व्यापार मंत्री लॉर्ड जॉन्सन यांचे वक्तव्य त्यावेळी समोर आले, ज्यावेळी नारायण मूर्ती यांची कंपनी ब्रिटनमध्ये ७५ कोटी पौंडच्या करारासाठी स्पर्धेत होती. सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची अक्षता मूर्ती यांची इन्फोसिसमध्ये सुमारे ५० कोटी पौंड म्हणजेच ०.९१ टक्के भागीदारी आहे. मागील आर्थिक वर्षात अक्षता यांना १.३ कोटी पौंडांचा लाभांश मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातील अधिकाधिक उत्पन्न इन्फोसिस या कंपनीकडून येते. वैयक्तिक फायद्यासाठीच सुनक यांनी इन्फोसिस या कंपनीसाठी ब्रिटनमध्ये पायघड्या घातल्या, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>विश्लेषणः स्थिर विक्री अन् वाढता नफा; कंपन्यांच्या तिमाही कामगिरीतील फायदा का वाढतोय?
ब्रिटिश सरकारचे यावर म्हणणे काय?
ब्रिटनमध्ये परदेशी व्यापार वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. व्यापार मंत्री ब्रिटनमध्ये परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी आणि अब्जावधी पौंडांच्या सुरक्षित वचनबद्धतेसाठी अनेक भारतीय उद्योजक कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना नियमितपणे भेटतात. ब्रिटनला गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून अग्रेसर करण्यासाठीच्या प्रयत्नांचा तो एक भाग आहे, असे ब्रिटनच्या व्यवसाय आणि व्यापार विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. व्यापार मंत्र्यांच्या या प्रयत्नांमुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये गुंतवणूक होते, हजारो उच्च दर्जाच्या नोकऱ्या निर्माण होतात आणि ब्रिटिश अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे या विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
sandeep.nalawade@expressindia.com