आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केल्याने लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार का, याचीच चर्चा सुरू झाली. मायावती यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीत सामील व्हावे म्हणून काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते. २०१९ लोकसभा किंवा २०२२मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसपाची पीछेहाट झाली होती. पक्षाची हक्काची मतपेढी भाजपने फोडली आहे. एके काळी देशाच्या पंतप्रधान होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या मायावती यांच्या पक्षाला सध्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. मायावती यांच्या निर्णयाने तिरंगी लढतीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपलाच फायदा होईल, असा राजकीय अंदाज वर्तविला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायावती यांनी कोणता निर्णय जाहीर केला?

आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मायावती यांनी दोन दिवसांपूर्वी केली. उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागांवर बसपा लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मायावती यांच्या या निर्णयाने राजकीय परिणाम काय होतील याचे अंदाज व्यक्त केले जाऊ लागले. बसपाची प्रत्येक मतदारसंघात लक्षणीय मते असल्याने त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले.

मायावती यांनी असा निर्णय का जाहीर केला असावा?

इंडिया आघाडीची सूत्रे काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविण्यावर घटक पक्षांमध्ये सहमती झाली आहे. याचाच अर्थ दलित समाजातील खरगे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी अटकळ बांधण्यात येऊ लागली. मायावती यांना अन्य कोणतेही दलित समाजातील नेतृत्वाचे आव्हान नको असते. काही वर्षांपूर्वी भीम आर्मीचे चंद्रशेखर यांनी संघटन उभे करण्यावर जोर दिला असता मायावती यांनी चंद्रशेखर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच चंद्रशेखर यांच्याबाबत फारच वाईट भाष्य केले होते. खरगे यांचे नेतृत्व मान्य केल्यास आपल्या नेतृत्वाची ओळख पुसली जाईल, अशी भीती बहुधा मायावती यांना असावी. भाजपबरोबर उघडपणे हातमिळवणी करणे मायावती यांना शक्य नाही. इंडिया आघाडीला साथ द्यावी तर नेतृत्वाचा प्रश्न होता. यातूनच मायावती यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला असावा.

मायावती किंवा बसपाची उत्तर प्रदेशात अजून ताकद आहे का?

लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये मायावती यांनी अखिलेश यांच्या समाजवादी पार्टीबरोबर आघाडी केली होती. तेव्हा बसपला लोकसभेच्या १० जागा मिळाल्या होत्या व पक्षाला एकूण मतांपैकी १९.४३ टक्के मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत चांगला अनुभव आला नाही किंवा समाजवादी पार्टीची मते हस्तांतरित होत नाहीत, असा दावा करीत मायावती यांनी समाजवादी पार्टीशी युती तोडली होती. २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या नेतृत्वाखाली बसपा स्वबळावर निवडणूक लढला होता. पण बसपाची फक्त एक जागा निवडून आली होती पण १२.८८ टक्के मते मिळाली होती. २०१७च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत बसपाच्या मतांमध्ये जवळपास दहा टक्के घट झाली होती. बसपाची हक्काची मते कायम असल्याने मायावती यांनी इंडिया आघाडीत प्रवेश करावा, असा विरोधकांचा प्रस्ताव होता. पण मायावती यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करून इंडिया व काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळून लावला.

मायावती स्वतंत्र लढण्याचा फायदा कोणाला?

मायावती यांच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात तिरंगी लढत अपेक्षित आहे. भाजप व मित्र पक्षांची एनडीए आघाडी, समाजवादी पार्टी, काँग्रेस व अन्य मित्र पक्षांची इंडिया आघाडी आणि बसपा अशी तिरंगी लढत होईल. बसपाची पीछेहाट झाली असली तरी उत्तर प्रदेशात अजूनही दहा टक्क्यांपेक्षा अधिक मते कायम असल्याचे मागील दोन निकालांवरून स्पष्ट होते. मायावती यांचा पक्ष स्वतंत्र लढल्याने भाजप विरोधी मतांचे विभाजन होणार आहे. ही मते विभागली गेल्यास त्याचा भाजपलाच फायदा होऊ शकतो. भाजपकडे गेलेली दलित किंवा जातव समाजाची मते पुन्हा मायावती यांच्याकडे वळली तरच बसपाला चांगले यश मिळू शकते. पण सध्या तरी ही शक्यता दिसत नाही. २०१४ मध्ये तिरंगी लढतीत भाजपने ८० पैकी ७२ जागा जिंकल्या होत्या. यंदाही भाजपलाच अधिक फायदा होऊ शकतो.

santosh.pradhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp chief mayawatis announcement of her decision to contest the upcoming lok sabha elections on her own lead predicted that the bjp would get a benefit print exp dvr
Show comments