शनिवारी (१ जुलै) रात्री दीडच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. रात्री १.२६ वाजता हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बसचा टायर फुटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावर प्रवास करताना काय काळजी घ्यावयास हवी? टायर फुटू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? गाडीचा टायर नेमका का फुटतो? असे प्रश्न विचारले जात आहेत? जाणून घेऊ या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे ….
बुलढाणा जिल्ह्यात नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार- विदर्भ एक्स्प्रेस नावाची एक खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. मात्र बसचा टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. परिणामी बसचा अपघात झाला. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. बसच्या अपघातानंतर काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर येण्यात यशस्वी ठरले. मात्र, अपघातानंतर बसचा एकदम स्फोट झाल्यामुळे अन्य प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी या स्फोटात २५ प्रवाशांचा होरपळल्याने मृत्यू झाला. त्यामध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. प्रवासी आगीत होरपळल्यामुळे त्यांची ओळख पटवणे जिकिरीचे झाले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले; तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले. “हा एक दु:खद बस अपघात आहे. मी जिल्हाधिकारी, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांच्याशी बातचीत केली आहे. या अपघाताच्या सखोल चौकशीचा आदेश मी दिला आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान, लवकच एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघातस्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर सिंदखेडराजा, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या अपघातात मृत्यू झालेल्यांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
टायरमधील हवेचा दाब कमी झाल्यास वाहनावर नियंत्रण मिळवणे कठीण
महामार्गांवर बहुतांश अपघात टायर फुटल्यामुळे किंवा चाकाशी संबंधित बिघाड झाल्यामुळेच होतात. टायर फुटल्यामुळे अचानकपणे टायरमधील हवेचा दाब कमी होतो. त्यानंतर वाहनावर नियंत्रण मिळवणे अशक्य होऊन बसते. परिणामी टायर फुटल्यामळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते. अशा वाहनाचे चाक खड्डे, तसेच रस्त्यावरील एखाद्या वस्तूवर आदळल्यास टायर फुटण्याची शक्यता असते. मग ते संबंधित चाक एखाद्या वस्तूवरून जाते, तेव्हा त्याच्या टायरमधील हवेवर नियंत्रण राहत नाही आणि टायरमधील हवेचा दाब वाढतो. मग ही वाढलेली हवा बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि तो टायर फुटतो. त्यामुळे अपघातही होतो.
वेगाने वाहन चालवल्यामुळेही टायर फुटण्याची शक्यता
रस्त्यावर वेगाने वाहन चालवताना अपघात झाल्यास टायर फुटण्याची शक्यता असते. अशा अपघातांमध्ये टायरमधील हवेचा दाब जलद गतीने कमी होतो. त्यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. अशा अपघातांत प्रवाशांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रसंगी चाक, तसेच सस्पेन्शन सिस्टीमवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी वाहनाची दुरुस्ती करणे खर्चिक होऊन बसते. तसेच या दुरुस्तीसाठी वेळही लागतो.
टायर नेमका का फुटतो?
रस्त्यावर वाहनाचा टायर फुटण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वाहनात प्रमाणपेक्षा जास्त सामान वाहून नेणे हे आहे. वाहनावर प्रमाणापेक्षा जास्त ओझे लादल्यास चाकांच्या टायरमधील दबाव वाढतो. त्यामुळे टायर फुटण्याची शक्यता जास्त असते.
टायरमध्ये कमी किंवा जास्त हवा भरणे
टायरमध्ये कमी किंवा जास्त हवा असल्यामुळेही ते फुटण्याची शक्यता असते. टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा नसल्यास हवेचा दाब सर्वत्र सम प्रमाणात राहत नाही. त्यामुळे टायरमध्ये सर्व बाजूंनी सारखीच हवा राहत नाही. परिणामी वाहन रस्त्यावर चालत असताना ते फुटण्याची शक्यता जास्त असते.
खड्डे, खिळे यामुळेही टायर फुटू शकतात
रस्त्यावरील खड्डे, धोकादायक ठिकाणांहून वाहन चालवणे यामुळे टायर फाटण्याची शक्यता असते. खिळे, काटे, फुटलेली काच अशा काही तीक्ष्ण वस्तूंमुळे टायर पंक्चर होण्याचाही धोका असतो. त्यामुळे चालत्या वाहनाचे टायर फुटण्याची शक्यता असते.
उष्णतेमुळे टायर फुटण्याची शक्यता
उष्णतेमुळेही टायर फुटण्याची शक्यता असते. उष्णतेमुळे टायरमधील हवा गरम होते आणि ती पसरते. परिणामी टायर फुटू शकतो. प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यामुळेही टायर फुटू शकतात. एखादे वाहन किती वेगाने चालवावे याच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे वाहनाला कोणताही नवा टायर लावताना, त्याची वेगमर्यादा काय आहे? हे जाणून घेतले पाहिजे. तसेच रस्त्यावर ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नयेत. वेगमर्यादा ओलांडल्यास टायर फुटण्याची शक्यता असते. वाहनाला सेकंड-हँड टायर लावणे धोकादायक असते. सेकंड हँड टायर फुटण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे एखाद्या टायरचे आयुर्मान तपासायला हवे. शक्य असल्यास वाहनाला नवे टायर लावावेत.
महामार्गांवरील अपघाताची आकडेवारी काय आहे?
राज्य महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या काळात महामार्गांवर अपघाताच्या आतापर्यंत ३५८ घटना घडल्या आहेत. या अपघातात ३९ जणांचा मृत्यू झालेला आहे; तर २३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. १४३ जण किरकोळ जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्य पोलिसांनी सांगितल्यानुसार ‘हायवे हिप्नोसिस सिंड्रोम’मुळेही अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- टायर फुटणे, तसेच वेगात गाडी चालवणे ही अपघाताची दोन प्रमुख कारणे आहेत. डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या काळात टायर फुटल्यामुळे महाराष्ट्रात ५५ अपघात झाले आहेत.
खराब टायर असतील तर रस्त्यावर नो एन्ट्री
समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडू नयेत म्हणून महाराष्ट्र सरकारकडून खबरदारी घेतली जाते. अपघात घडू नयेत म्हणून काही नियम लागू करण्यात आले आहेत. टायर खराब असणाऱ्या वाहनांना समृद्धी महामार्गावरून जाण्यास मनाई आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत या नियमाचे उल्लंघन केल्यास २० हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. महामार्गावर टायर पंक्चर होण्याचे तसेच फुटण्याचे प्रमाण अनुक्रमे १५ व १२ टक्के आहे.
वाहनाचे टायर फुटू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी?
वाहनाचे टायर खराब होऊन अपघात होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. टायरचे रबर वेळोवेळी चेक करायला हवे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी टायर पंक्चर आहे, त्या भागाची विशेष काळजी घ्यायला हवी. गतिरोधक, खड्डे यांमुळे टायरची लवकर झीज होते. त्यामुळे टायरची वेळोवेळी पाहणी करायला हवी. उष्ण प्रदेशात प्रवास करायचा असेल, तर टायर्समधील हवा तपासायला हवी. हवा तपासण्यासाठी जास्त खर्च लागत नाही. मात्र, काही लोक टाळाटाळ करतात. परिणामी एखाद्या वेळी अपघातासारखी अनपेक्षित घटना घडते.