Bumble Dating App and Shraddha Walker Murder Case: वसईची तरुणी श्रद्धा वालकर हिच्या प्रियकराने दिल्लीत राहत्या घरी तिचा खून केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. सहा महिन्यांपूर्वी श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने घरात फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज ते तुकडे तो जंगलात प्राण्यांना खाण्यासाठी फेकायचा. या प्रकरणाचा खुलासा होण्यासाठी तब्बल सहा महिने लागले कारण हा निर्दयी आफताब श्रद्धाच्या खुनानंतर त्याच घरात राहून श्रद्धा जिवंत आहे असे भासवण्याची सोय करत होता आफताब श्रद्धाच्या फोनवरून ती इन्स्टाग्रामवर सक्रीय आहे बँक बिलंही भरत आहे असे दाखवत होता. श्रद्धाच्या खुनाच्या प्रकरणात आता सध्या बम्बल या डेटिंग ऍपचे नाव प्रचंड चर्चेत आहे, याचे एक कारण म्हणजे श्रद्धा व आफताब यांची भेट ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्म बम्बलवरच झाली होती.
खरं पाहायला गेल्यास बम्बल हे ऍप महिलांच्या द्रूष्टीने सर्वात सुरक्षित अशा रूपात सादर करण्यात आले होते. जेव्हा हे ऍप लाँच झाले तेव्हा आधीपासूनच टिंडर, ओके क्युपिड असे ऍप स्पर्धेत होते, या सगळ्यांपेक्षा एक वेगळं फीचर घेऊन बम्बल बाजारात आले होते. या ऍपवर महिलांना निवड करण्याची मुभा दिली होती. काय आहे हे बम्बल ऍप व त्याचे फीचर कसे आहेत हे जाणून घेऊयात..
Bumble Dating App काय आहे?
व्हिटनी वोल्फ हर्ड (Whitney Wolfe Herd) ने २०१४ मध्ये बम्बल ऍप तयार केले होते. या ऍपमध्ये एखाद्या मुलीने जर प्रोफाइल लाईक केले तर त्या संभाषणची सुरुवात महिलेलाच करावी लागते. यामुळे महिलांना कुणाशी बोलायचे याची निवड करता येते व चुकीचे मॅसेज करणाऱ्या त्रास देणाऱ्या अकाउंटपासून लांब राहता येते. प्राप्त माहितीनुसार बंबलचे जगभरात ४ कोटीहून अधिक ऍक्टिव्ह युजर्स आहेत तर २५ लाखाहून अधिक प्रीमियम ऍक्टिव्ह युजर्स आहेत. बंबल कंपनी Badoo हे ऍप सुद्धा हाताळते.
अहवालानुसार, २०२१ मध्ये डेटिंग ऍप मार्केटची कमाई ३ अरब डॉलरहुन अधिक असते. २०२५ पर्यंत हे मार्केट ५ अरब डॉलरपर्यंत विस्तृत होईल असे अंदाज आहेत. बम्बलमध्येही स्वाईप मॉडेल वापरण्यात आले आहे. जेव्हा तुम्हाला एखादे अकाउंट आवडते तेव्हा तुम्ही राईट (उजवी) बाजूला स्वाईप करायचे असते. जर मॅच झाल्यावर २४ तासात महिलेने मॅसेज केला नाही तर मॅच तुमच्या फीडमधून गायब होऊन जाते.
ऑनलाइन डेटिंग ऍप वापरताना ‘या’ चुका कधी करू नका..
- ऑनलाइन डेटिंग ऍपवर निदान काही दिवस बोलणे झाल्याशिवाय भेट प्लॅन करू नये.
- ऑनलाईन डेटला पहिल्यांदा भेटण्यासाठी सार्वजनिक ठिकाण निवडा.
- समोरील व्यक्तीवर चुकूनही पहिल्याच दिवसात विश्वास ठेवू नये. अनेकदा नावापासून सर्वच माहिती खोटी असू शकते.
- लगेच भावुक होऊ नका.
- प्रोफाइलवर जर संशयास्पद नाव किंवा खोटा प्रोफाइल फोटो वाटत असेल तर सावध व्हा.
- डेटींग ऍपवर अनेकांचे हेतू वेगवेगळे असतात, याबाबत आधीच गप्पांमध्ये विचारून घ्या.
सध्या दिल्ली पोलिसांनी बम्बल कंपनीकडून आफताबचे अन्य प्रोफाइल डिटेल्स मागवले आहेत तसेच आफताबच्या अकाउंटवरील अन्य महिलांच्या बाबतही तपास सुरु आहे. पोलिसांना संशय आहे की आफताबने अशाच प्रकारे अन्यही मुलींना फसवले असू शकते.