गुराढोरांच्या ढेकरांमधून बाहेर पडणारा मिथेन वायू जागतिक तापमानवाढीसाठी एक गंभीर विषय बनला आहे. कधीकधी गुरांच्या ढेकरांद्वारे बाहेर पडणारा मिथेन हा गाडीतून किंवा कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मिथेनच्या प्रमाणाएवढा असतो, असा एक तर्क मांडला जातो. पशुधन हरितगृह वायूंच्या निर्मितीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रमुख स्रोत असल्याची वस्तुस्थिती मान्य केली गेली आहे. २००६ साली संयुक्त राष्ट्राने एक अहवाल प्रकाशित करून या संदर्भात काळजी व्यक्त केली. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत जगभरातील लोकांनी मांसाहाराला अधिक प्राधान्य दिल्यामुळे तसेच डेअरी उत्पादनालाही मोठी मागणी असल्यामुळे जनावरांची संख्या आणि त्या माध्यमातून होणारे मिथेनचे उत्सर्जन वाढत चालले आहे.
गाय, बैल, म्हैस आणि शेळी यांसरखे रवंथ करणारे प्राणी वनस्पती खाद्यावर पोटात किण्वन (fermenting) प्रक्रिया करून ते पचवण्यासाठी सक्षम असतात. मानवी वापरासाठी उपयुक्त असल्यामुळे या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. कृत्रिमरीत्या वाढविण्यात आलेली प्राण्यांची ही संख्या मिथेन प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.
मिथेन वायू हा अधिक उष्णता निर्माण करणारा घटक आहे. सध्या कार्बन डायऑक्साईडपेक्षाही (वाहतूक आणि कारखान्यातून उत्सर्जन वाढल्यानंतरही) मिथेन वायूचे प्रमाण अधिक आहे. २०२१ साली १०० पेक्षा अधिक देशांनी जागतिक मिथेनवाढ कमी करण्यावर सहमती दर्शविली आणि या दशकाच्या अखेरीपर्यंत मिथेन वायूचे उत्सर्जन ३० टक्क्यांनी कमी करण्याची शपथ घेतली. अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासनाच्या अंदाजानुसार २०२१ साली फक्त मानवी क्रियामुळे (पशुधनवाढ, वाहतूक, कारखानदारी) ६४० दशलक्ष टन मिथेन वातावरणात सोडला गेला आहे.
भारतीय शास्त्रज्ञ काय करत आहेत?
हरियाणामधील बफेलो रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ गुराढोरांच्या माध्यमातून होणारे मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते अशा प्रकारचे खाद्य विकसित करत आहेत, ज्यामुळे मिथेन वायू तयार होणार नाही. अविजित डे आणि त्यांचे सहकारी, भारतीय चेरी, उंच झाडांची मोठी रुंद पाने, लसूण तेल, तिळाचे तेल, सरकीचे तेल, सोडियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट या घटकांच्या संयुगापासून खाद्यपदार्थ विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती ‘डाऊन टू अर्थ’ या मासिकाने दिली आहे.
यासोबतच जगभरातील शास्त्रज्ञ गुरांच्या ढेकरांतून निघणाऱ्या मिथेनचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय शोधत आहेत.
२०२१ साली, युरोपियन युनियनने गुरांसाठी ‘बोव्हर’ (Bovaer) नावाच्या एका खाद्याला परवानगी दिली. डच बायोसायन्स कंपनीने विकसित केलेल्या या खाद्यामुळे गाईंच्या माध्यमातून उत्सर्जित होणारे मिथेनचे प्रमाण ३० ते ८० टक्क्यांनी कमी होईल, असा दावा या कंपनीने केला होता. बोव्हर हे खाद्य समुद्री शेवाळ, समृद्री वनस्पतींपासून तयार करण्यात आले आहे. मात्र, शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार हा उपाय स्थानिक पातळीवरचा आहे. कारण समुद्री खाद्यपदार्थांचे घटक अमेरिकेतून भारतात वाहून न्यायचे असतील त्यातूनही एकप्रकारे कार्बन उत्सर्जनात वाढच होईल. त्यामुळे शास्त्रज्ञ यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
हरियाणामधील संशोधन केंद्रात तयार केलेले खाद्य मिथेनच्या उत्सर्जनात किमान २० टक्क्यांची घट करू शकेल, असे सांगण्यात येत आहे. अविजित डे यांच्या पथकाने हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. आता या खाद्याला नियामकांची मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विकसित केलेले खाद्य मिथेन उत्सर्जन कसे कमी करणार?
रवंथ करणाऱ्या प्राण्यांची पचनक्षमता ही इतरांपेक्षा पूर्ण वेगळी आहे. गुरांची पचनव्यवस्था सेल्युलोजयुक्त वनस्पतीमधून ऊर्जा निर्माण करते. जनावरे जेव्हा वनस्पतीयुक्त खाद्य खातात तेव्हा ते त्यांच्या पोटातील ‘रुमेन’ नामक आतड्यात साठवले जाते. रुमेनमध्ये बुरशीसारखे सूक्ष्म जीव, जिवाणू (bacteria), आदिजीव (protozoa), आर्केया (archaea) सारखे अनेक सूक्ष्म जीव असतात. आर्केया (archaea) जिवाणूमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजनचे एकत्रीकरण झालेले असते, त्यामुळे वनस्पतीमधील सेल्युलोजवर किण्वन प्रक्रिया होत असताना मिथेन वायूची निर्मिती होते. रुमेनमधील आर्केया (archaea) सारख्या सूक्ष्म जीवांची संख्या कमी करून इतर फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढीस लागेल असे खाद्य निर्माण करण्याचा प्रयत्न डे यांचे पथक करत आहे.
मिथेन कमी करणारे खाद्य निर्माण करत असताना यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर इतर विपरीत परिणाम होणार नाहीत, याचीही काळजी शास्त्रज्ञांकडून घेतली जात आहे.