-संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा राज्यांमधील सात विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांच्या निकालांवरून राजकीय कौल ठरविणे योग्य नसले तरी देशातील जनतेचा रोख कोणत्या दिशेने आहे याचा अंदाज येतो. सातपैकी चार जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व कायम राखले, पण चाचपडत असलेल्या काँग्रेसला अजूनही जनतेचा विश्वास संपादन करता आलेला नाही हा संदेश मात्र या निकालांतून गेला आहे. भाजपबरोबरच शिवसेना, तेलंगणा राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय जनता दल या प्रादेशिक पक्षांना विजय मिळाला. भाजपला प्रादेशिक पक्षच लढत देऊ शकतात हे या निकालावरून पुन्हा सिद्ध झाले. 

विधानसभेच्या सात मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निकालाचा अर्थ काय?

महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, हरयाणा आणि ओडिशा या सहा राज्यांमधील सात मतदारसंघांत पोटनिवडणूक झाली. बिहारमध्ये दोन जागांसाठी निवडणूक झाली. सातपैकी भाजपने चार जागा जिंकल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तेलंगणा राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय जनता दलाला प्रत्येकी एक जागा मिळाली. काँग्रेसची पाटी कोरी राहिली. आधी सातपैकी भाजप तीन, काँग्रेस दोन, शिवसेना व राष्ट्रीय जनता दलाकडे प्रत्येकी एक जागा होती. निकालातून काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे सिद्ध झाले. भाजपने बिहार, ओडिशा आणि उत्तर प्रदेशातील जागा कायम राखल्याच पण त्याचबरोबर हरयाणातील एक जागा अतिरिक्त जिंकली. यातून पुन्हा भाजपचेच वर्चस्व सिद्ध झाले. 

कोणत्या लढती महत्त्वपूर्ण होत्या? 

महाराष्ट्र, बिहार आणि तेलंगणातील पोटनिवडणुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील पहिलीच निवडणूक होती. तसेच बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर हातमिळवणी केल्यावर पहिलीच परीक्षा होती. तेलंगणात भाजपची घोडदौड रोखण्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासमोर आव्हान होते. यापैकी राज्यातील अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली. भाजपच्या माघारीनंतर निवडणुकीची हवाच निघून गेली होती. एकतर्फी झालेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेने विजय संपादन केल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाला बळ प्राप्त झाले. दुसऱ्या क्रमांकाची मते ‘नोटा’ला मिळाली. अंधेरीच्या विजयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला नैतिक बळ मिळाले आहे. बिहारमध्ये भाजप, नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासाठी ही पोटनिवडणूक महत्त्वाची होती. नितीशकुमार आणि लालूंचा पक्ष एकत्र येऊनही भाजपने गोपाळगंजमध्ये स्वबळावर जागा कायम राखली. अर्थात एमआयएमला मिळालेली १२ हजार तर बसपला मिळालेली ८ हजार मते भाजपच्या पथ्थ्यावर पडली. भाजपने ही जागा दोन हजार मतांनी कायम राखली. दुसरी जागा राष्ट्रीय जनता दलाने कायम राखली. नितीशकुमार यांनी साथ सोडली तरी बिहारमध्ये भाजपला जनाधार कमी झालेला नाही हेच निकालावरून स्पष्ट झाले. तेलंगणात लागोपाठ दोन पोटनिवडणुका जिंकल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तेचे भाजपचे लक्ष्य आहे. या दृष्टीने पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. तेलंगणा राष्ट्र समिती आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती. ही पोटनिवडणूक जिंकून भाजपला रोखू शकतो हा संदेश देण्यात चंद्रशेखर राव यशस्वी झाले.

काँग्रेसची पराभवांची मालिका संपेना ….

मल्लिकार्जुून खरगे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यावर पहिलीच पोटनिवडणूक. तेलंगणा आणि हरयाणामधील पक्षाच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणुका झाल्या. परंतु दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मतदारांनी नाकारले. तेलंगणात काँग्रेस आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणूक झाली. भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदाराचा पराभव झाला पण त्याचबरोबर काँग्रेसला जागा गमवावी लागली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणात असतानाच काँग्रेसचा दारुण पराभव झाला. ही जागा पक्षाकडे असताना काँग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मतदारांचा गमावलेला विश्वास संपादन करणे हे काँग्रेस व नवे अध्यक्ष खरगे यांच्यापुढे आव्हान असेल.

प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढत आहे का?

भाजप आणि काँग्रेस अशी सरळ लढत होते तेथे भाजपला यश मिळते हे गेल्या आठ वर्षांत सिद्ध झाले आहे. प्रादेशिक पक्ष मात्र भाजपला लढत देतात. तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब आदी प्रादेशिक पक्ष प्रभावी असलेल्या राज्यांमध्ये भाजपचा निभाव लागत नाही. बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव एकत्र आल्यावर भाजपचा २०१५मध्ये पराभव झाला होता. प्रादेशिक पक्षांचा आत्मविश्वास अजून टिकून असल्याची ही लक्षणे आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By election results 2022 bjp is challenged by local regional parties print exp scsg
Show comments