चंद्रशेखर बोबडे
येत्या २१ व २२ मार्चला जी-२० समूह गटातील सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स (सी-२०) बैठक नागपुरात होऊ घातली आहे. ही सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स अर्थात नागरी समाज संस्था गट काय आहे आणि त्याचा नागपूरला काय फायदा होणार आहे, याबाबत नागपूरकरांमध्ये उत्सुकता आहे.
जी-२० च्या महाराष्ट्रात बैठका किती ?
एक डिसेंबरपासून भारताला जी-२० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून, ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारताकडे राहणार आहे. या कालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका होणार असून, त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होत आहेत. त्यात मुंबईत ८, पुण्यात ४ तर नागपूर आणि औरंगाबादेत १ बैठक होणार आहे. नागपूरला २१ आणि २२ मार्चला ही बैठक होत आहे.
सी-२० गट काय आहे?
नागपूरमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेत जी-२० राष्ट्र समूहातील नागरी समाज संस्थेचा (सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स /सी-२०) गट सहभागी होणार आहे. जागतिक आर्थिक धोरणे आखताना नागरिकांच्या अपेक्षा प्रतिबिंबित करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका नागरी समाज संस्था ‘जी-२०’ समूहामध्ये पार पाडते. केरळ राज्यातील माता अमृतानंदमयी मठाच्या संस्थापिका अमृतानंदमयी ऊर्फ अम्मा यांची यावर्षीच्या सिव्हिल सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
विश्लेषण: ‘टिकटॉक’वर अनेक देश बंदी का घालत आहेत?
नागरी समाज संस्था गटात कोणाचा सहभाग?
नागरी समाज या संकल्पनेनुसार देशातील प्रत्येक व्यक्ती नागरी समाजाचा घटक आहे. नागरिकांच्या हितासाठी कार्यरत शासकीय आणि खाजगी या दोन क्षेत्राशिवाय उर्वरित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक चळवळी तसेच सत्तेत नसलेल्या राजकीय संस्थांचा यात समावेश आहे.
नागरी समाज संस्था गटाचे कार्य कोणते?
हा गट आर्थिक हितसंबंध आणि नागरिकांचे हित यांच्यात संतुलन राखण्यात मदत करतो. हा गट जागतिक शुचिता, पारदर्शकता, स्वातंत्र्य, सहयोग, मानवी हक्क, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण, सामाजिक विकास या तत्त्वांवर कार्य करतो. तसेच सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि जागतिक आर्थिक धोरणे आखताना त्यात नागरिकांच्या अपेक्षांचा पाठपुरावा करणे हे या गटाचे मुख्य कार्य आहे. वरील विषयांवर जागतिक धोरणे आखण्यासाठी हा गट जी-२० परिषदेला शिफारस करतो.
विश्लेषण : अदानी समूहाची ‘सेबी’ चौकशी कशी होणार?
बोधचिन्हातून काय संदेश मिळतो?
‘आशा, स्वयंप्रेरणा आणि निःस्वार्थ सेवेच्या ज्योती’ हे सी-२० गटाचे बोधचिन्हाचे प्रतीक आहे. बोधचिन्हावर “तुम्हीच प्रकाश आहात” हे घोषवाक्य आहे. नागरी समाजातील प्रत्येक सदस्याला एकत्र येण्यासोबत स्वतःचा मार्ग तयार करणे आणि सामूहिक प्रयत्नातून समस्यांचे निराकरण करण्याचा संदेश या बोधचिन्हातून प्रतिबिंबित होतो.
नागपूरला होणारे फायदे कोणते?
सी-२० परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आदान-प्रदानाचे केंद्र म्हणून जगापुढे सादर करण्याची संधी नागपूरला मिळाली आहे. नागपूर व लगतच्या विभागातील विपुल वनसंपदा, खनिजसंपदा, वन्यजीव, जैवविविधता, गड-किल्ले, खाद्यसंस्कृती, विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे, वीज , पाण्याची मुबलकता, आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या सोयी-सुविधा आदी बाबी देश-विदेशातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. या क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नवीन भागीदारी, सहयोग आणि अर्थिक गुंतवणुकीची संधी निर्माण होतील. या सर्वांमुळे नागपूर येथे आयोजित होत असलेल्या या परिषदेला विशेष महत्त्व आहे.