जगभरातील अनेक देशांमध्ये व्यसन ही मोठी समस्या मानली जाते. भारतातही दरवर्षी व्यसनामुळे अनेकांचा मृत्यू होतो. तसेच यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होऊन अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. भारताप्रमाणेच चीनदेखील व्यसनाच्या समस्यांनी ग्रासलेला आहे. मद्याच्या आहारी गेलेल्या आपल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी चीनकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मद्याच्या व्यसनामुळे चीनमध्ये दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. मद्याच्या व्यसनातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी चिनी रुग्णालये आता सर्जिकल चिप बसविण्याचा पर्याय रुग्णांसमोर ठेवीत आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने (South China Morning Post – SCMP) दिलेल्या माहितीनुसार चीनमधील ३६ वर्षीय मद्यपीने ही पाच मिनिटांची शस्त्रक्रिया स्वतःवर करवून घेतली. फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने यावर सविस्तर वृत्त दिले असून अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे मद्यसेवन कमी होईल, असा दावा करण्यात येत आहे. ही चिप नक्की कशी काम करते? खरेच यातून व्यसनमुक्तता शक्य आहे का? तसेच याचे दुष्परिणाम आहेत का? याबद्दल घेतलेला हा सविस्तर आढावा.
चीनमध्ये पार पडली पहिली शस्त्रक्रिया
चीनमध्ये पार पडलेली अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून ती क्लिनिकल ट्रायलचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण मंडळाचे माजी उपाध्यक्ष असलेल्या हाओ वीई यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. मध्य चीनच्या हुनान ब्रेन रुग्णालयात दि. १२ एप्रिल रोजी लिऊ (शेवटचे नाव) नावाच्या व्यक्तीवर अवघ्या पाच मिनिटांत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. हाओ यांनी माहिती दिल्याप्रमाणे, अमली पदार्थ आणि व्यसनाशी संबंधित विषय हाताळण्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी अतिशय वाकबगार आहेत. ही चिप बसविल्यानंतर पाच महिन्यांपर्यंत मद्यसेवनाची तलफ होत नाही किंवा मद्यसेवन करण्याची पूर्वीप्रमाणे इच्छा होत नाही.
हे वाचा >> विश्लेषण : अती मद्यसेवनाचे प्रमाण किती? वयोगटानुसार मद्याचा शरीरावर काय होतोय परिणाम?
लिऊ हा मध्य चीनमधील हुनान येथील रहिवासी आहे. एससीएमपीने दिलेल्या माहितीनुसार त्याला १५ वर्षांपासून मद्यसेवन करण्याचे व्यसन होते. एका दिवसात साधारणपणे तो अर्धा लिटर चिनी मद्य रिचवत होता. रोज सकाळी नाश्ता करताना दारूची एक बाटली संपवल्यानंतरच तो कामासाठी बाहेर पडायचा. काम करताना आणि रात्री झोपेपर्यंत तो दारूच्या नशेतच राहायचा. आपल्या व्यसनाबद्दल सांगताना लिऊ म्हणाला, “ज्या वेळेला माझ्या हातात दारूची बाटली दिसायची नाही, त्या त्या वेळी मी अतिशय चिंताग्रस्त व्हायचो.”
हे वाचा >> दीर्घआयुष्यी व्हायचंय? मग आजच दारू सोडावी लागेल! जाणून घ्या काय सांगते संशोधन
हुनानमधील वर्तमानपत्र झियोझियांग हेराल्डने (Xiaoxiang Herald) दिलेल्या बातमीनुसार, लिऊने आता पुढील आयुष्य व्यसनमुक्त होऊन जगण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ही सर्जिकल चिप व्यसनमुक्तीला कशी मदत करते?
‘स्टार’ वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, ही चिप शरीरात बसविल्यानंतर त्यातून नॅल्ट्रेक्सॉन (Naltrexone) नावाचे औषध प्रसृत होते. जे शरीरात शोषून घेतले जाते. हे रसायन मेंदूतील रिसेप्टर्सला लक्ष्य करते. एखाद्या रुग्णावर व्यसनमुक्तीचे उपचार केल्यानंतर त्याने पुन्हा व्यसनाकडू वळू नये यासाठी थेरपिस्ट नॅल्ट्रेक्सॉनचा वापर करतात. अलीकडच्या काळापर्यंत डिसुलफिरम (Disulfiram) हे औषध दारूचे व्यसन सोडविण्यासाठी वापरात येत होते. या औषधाची जागा आता नॅल्ट्रेक्सॉनने घेतली आहे.
डिसुलफिरम औषधाचे अनेक दुष्परिणाम दिसून आले होते. जसे की, मळमळणे, उलट्या होणे, गरगरणे इत्यादी. त्या तुलनेत नॅल्ट्रेक्सॉन हे औषध सौम्य स्वरूपाचे आहे. आपल्या मेंदूतील ज्या भागाला व्यसनाची तलफ लागलेली असते, त्या ठिकाणी ब्लॉक तयार करण्याचे काम नॅल्ट्रेक्सॉनच्या माध्यमातून होते.
सबस्टान्स अब्युज ॲण्ड मेंटल हेल्थ सर्विस ॲडमिनिस्ट्रेशन (SAMHSA) च्या माहितीनुसार नॅल्ट्रेक्सॉन हे एक असे औषध आहे ज्याला ओपिड अँटागोनिस्ट (opioid antagonist) म्हणतात. जे मेंदूतील ओपिड रिसेप्टर्सशी स्वतःला जोडून काम करते. ज्या रुग्णांनी नॅल्ट्रेक्सॉन औषध घेतले, त्यांनी दारूची तलफ कमी झाल्याचे सांगितले आहे. तसेच दारू प्यायल्यानंतरही त्यांना पूर्वीसारखा आनंद मिळत नसल्याचे दिसून आले, अशी माहिती कोलेमन इन्स्टिट्यूटने दिली आहे. नॅल्ट्रेक्सॉन घेतल्यापासून अनेक रुग्ण मद्यसेवनापासून परावृत्त झालेले आहेत आणि त्यांना पुर्नवसन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
चिप कुठे बसवतात?
ही छोटी सर्जिकल चिप त्वचेच्या खाली बसविण्यात येते. जेणेकरून चिपद्वारे औषधाचा डोस सतत मिळत राहावा. हुनानमधील सेकंड प्रोव्हिन्शियल सेंट्रल हॉस्पिटलचे संचालक झोऊ झुहुई (Zhou Xuhui) यांनी सांगितले की, ही चिप जवळपास पाच महिन्यापर्यंत काम करू शकते. मद्यसेवनाच्या मानसिक इच्छेचे शमन करण्यासाठी रुग्णाला या चिपचा फायदा होईल, अशी माहिती त्यांनी ‘द स्टार’ या वृत्तपत्राला दिली. तसेच अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या रुग्णांनाही त्यातून बाहेर काढण्यासाठी हे तंत्रज्ञान भविष्यात उपयोगी पडू शकते, अशी शक्यताही झोऊ यांनी व्यक्त केली.
याचे दुष्परिणाम काय आहेत?
एलनोर हेल्थच्या (Eleanor Health) मेंटल हेल्थ आणि व्यसनमुक्ती उपचार केंद्राच्या माहितीनुसार नॅल्ट्रेक्सॉन हे अतिशय सुरक्षित असे व्यसनमुक्तीसाठी वापरले जाणारे औषध आहे. मात्र चिप बसवताना काही त्रास जाणवू शकतो. जसे की, दुखणे, जळजळ होणे, त्वचा लालसर पडणे, खाज सुटणे किंवा संसर्ग होणे इत्यादी.
व्यसनाधीनता चीनची मोठी समस्या!
लँसेट मेडिकल जर्नलच्या २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, मद्यपानाशी संबंधित कारणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण चीनमध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या अहवालानुसार २०१७ साली चीनमध्ये दारूमुळे ६ लाख ५० हजार पुरुषांचा मृत्यू झाला. तर महिलांच्या मृत्यूची संख्या ५९ हजार एवढी होती. पुरुषांच्या ४५ ते ५९ या वयोगटातील व्यक्ती सर्वाधिक मद्य विकत घेतात, असेही या अहवालातून समोर आले. चीनमधील व्यसनाधीनतेमुळे अनेक प्रकारचे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच रस्ते अपघात, कौटुंबिक हिंसाचार आणि आरोग्याशी संबंधित इतरही समस्या निर्माण झालेल्या आहेत.