इंटरनेटचा जसा जसा विकास होत गेला, तशी संवादाची अनेक साधनेही विकसित होऊ लागली. मागच्या वीस वर्षात या क्षेत्रात इतक्या वेगाने प्रगती झाली की, काही वर्षांपूर्वी संवादासाठी वेगवान मानली जाणारी ‘तार’ कालबाह्य होऊन गेली. संवादाची साधने वाढल्यानंतर शब्द, प्रतिमा, चित्रफित यातूनही संवाद साधण्याची सोय निर्माण झाली. त्यातूनच पुढे आल्या इमोजी. आपल्या भाव-भावनांना व्यक्त करण्यासाठी एका साध्या चित्राचा किंवा तंत्रज्ञानाने डिझाईन केलेल्या छोट्या चिन्हांचा वापर होऊ लागला. या चिन्हांच्या आपण एवढी आदी झालो आहोत की आज जवळपास अनेक लोक सर्रास त्याचा वापर करतात. पण चिन्हांचाही काही अर्थ आहे. जर विचार न करता त्याचा वापर केला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. असेच एक प्रकरण सध्या जगभर गाजत आहे. व्यवसायासंबंधी चर्चा करत असताना कराराच्या विषयावर थम्स-अप असा जुजबी रिप्लाय दिल्यामुळे एका शेतकऱ्याला ५० लाखांचा दंड बसला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर काय घडले? न्यायाधीशांनी या प्रकरणातून काय अर्थ काढले? हे सविस्तर पाहू या.
कॅनडाच्या न्यायालयात एक अजब प्रकरण सुनावणीसाठी आले. या प्रकरणाचा निर्णय देत असताना न्यायालयाने सांगितले की, चॅटिंग करताना वापरला गेलेला थम्स-अप (??) इमोजी हा कायदेशीर भाषेत कराराची संमती म्हणून मानायला हवा. आपल्या दैनंदिन जीवनात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संभाषण किंवा संवाद साधत असताना सर्रास वापरले जाणाऱ्या इमोजीचाही अर्थ न्यायालय काढू लागल्यामुळे या प्रकरणाकडे असामान्य म्हणून पाहिले जात आहे. साहजिकच या प्रकरणाची चर्चा आता जगभरातील अनेक देशांमध्ये होऊ लागली आहे.
कॅनडामधील साऊथ वेस्ट टर्मिनल लिमिटेड (SWT) आणि ॲश्टर लँड अँड कॅटल लिमिटेड या दोन कंपन्यामध्ये झालेल्या संभाषणावर आधारीत असलेला खटला न्यायालयात पोहोचला. या दोन्ही कंपन्या एकमेकांसोबत अनेक काळापासून व्यवसाय करत होत्या. साऊथ वेस्ट टर्मिनल कंपनीने ॲश्टर यांच्या कृषी कंपनीवर खटला दाखल केला. साऊथ वेस्ट कंपनीने ॲश्टर कंपनीला ८७ टन ‘जवस’ पुरविण्याचे कंत्राट दिले होते. मात्र ॲश्टर कंपनीने दिलेल्या मुदतीत जवसाचा पुरवठा केला तर नाहीच, त्याउलट आपण असा काही करार केला नव्हताच, अशी भूमिका घेतली. ॲश्टर कृषी कंपनीने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करून साऊथ वेस्ट टर्मिनलने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने साऊथ वेस्टच्या बाजूने निकाल देत ॲश्टर कृषी कंपनीला ६१ हजार ४४२ डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये तब्बल ५० लाखांचा दंड ठोठावला.
प्रकरण काय होते?
साऊथ वेस्ट कंपनीचे प्रमुख केन्ट मायकलबोरो यांनी ॲश्टर कृषी कंपनीचे प्रमुख आणि शेतकरी क्रिस ॲश्टर यांच्याशी फोन आणि मेसेजद्वारे संवाद साधून जवस पुरविण्याबाबत चर्चा केली. शेतकरी क्रिस यांच्या मोबाइलवर केन्ट यांनी सदर व्यवहाराचा करार बनवून पाठविला आणि त्यावर कराराची पुष्टी करण्यास सांगितले. द गार्डियन या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, केन्ट यांनी पाठविलेल्या कराराच्या दस्ताऐवजाला ॲश्टर यांनी थम्स-अप (??) इमोजीने उत्तर दिले. पण जेव्हा जवस डिलिव्हरी करण्याची वेळ आली, तेव्हा साऊथ वेस्ट कंपनीला माल मिळालाच नाही.
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ॲश्टर यांनी सांगितले, “केन्ट यांनी पाठविलेला मेसेज मला मिळाला, हे दर्शविण्यासाठी मी थम्स-अप केला होता. याचा अर्थ मी करार मान्य केला, असे होत नाही. ८७ टन ‘जवस’ पुरविण्यासाठी विस्तृत करार माझ्यापर्यंत पाठविला गेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे असे करार फॅक्स किंवा ईमेलने पाठविले जातात. माझ्या स्वाक्षरीनंतरच असे करार प्रत्यक्षात होऊ शकतात. केन्ट मायकलबोरो यांच्याशी माझे नियमित संभाषण सुरू असते. यादरम्यान आमच्यात अनौपचारीक मेसेजसची देवाणघेवाण होत असते.”
खटल्याच्या सुनावणीदरम्यान केन्ट यांच्या वकिलांनी ॲश्टर यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला थम्स-अप इमोजीचा अर्थ माहीत आहे का? तुम्ही कधी गुगलवर तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? यावर ॲश्टर यांच्या वकिलांनी हस्तक्षेप करत युक्तिवाद केला, “माझे अशील इमोजीसचे तज्ज्ञ नाहीत”. केन्ट यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, थम्स-अप या इमोजीचा अर्थ सामान्यतः “मला मान्य आहे” असा अभिप्रेत केला जातो. याचाच अर्थ जर ॲश्टर यांनी केन्ट यांच्या कराराच्या मेसेजला थम्स दाखवला, म्हणजे त्यांना करार मान्य होता.
न्यायालयाने काय निकाल दिला?
सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने साऊथ वेस्टचे प्रमुख केन्ट यांच्याबाजूने निकाल दिला. साऊथ वेस्ट कंपनीकडून संभाषण करत असताना केन्ट यांनी आपल्याला काय हवे आहे, हे स्पष्टपणे सांगितले होते. त्यावर क्रिस ॲश्टर यांनी होकारार्थी रिप्लाय दिलेला आहे. त्यामुळे करार अस्तित्त्वात आला.
न्यायालयाने निकालात म्हटले की, केन्ट यांनी क्रिस ॲश्टर यांना २६ मार्च २०२१ रोजी फोन करून जवस पुरविण्याबाबत चर्चा केली होती. क्रिस यांच्याकडून जवस खरेदी करण्याशिवाय केन्ट यांनी त्यांना फोन करण्याचे दुसरे कोणतेही कारण समोर येत नाही. यावेळी फोनवर दोघांनीही जवसाच्या करारासंदर्भात चर्चा केली. यावेळी प्रत्यक्ष संभाषणाद्वारे कराराला आकार मिळाला. त्यानंतर केन्ट यांनी क्रिस ॲश्टर यांना कराराची कागदपत्रे पाठविली, ज्याचे शीर्षक “डिफर्ड डिलिव्हरी प्रोडक्शन करार”, असे होते. याचप्रकारे केन्ट आणि क्रिस यांनी याआधीदेखील व्यवसाय केला आहे. केन्ट यांनी कागदपत्रे पाठविल्यानंतर “कृपया जवसाचे कंत्राट स्वीकारा”, असाही संदेश पाठविला होता. याआधीही त्यांनी असेच केले होते. क्रिस ॲश्टर यांनी या संदेशलाला थम्स-अप असा रिप्लाय दिला होता.
न्यायालयाने पुढे असे नमूद केले की, केन्टने भूतकाळात जेव्हा अशाच प्रकारे कराराची कागदपत्रे पाठविली होती. तेव्हादेखील क्रिसने छोटे छोटे रिप्लाय करून कराराला समंती दिली होती. ‘हे छान आहे’, ‘ओके’ किंवा ‘होय’ अशी छोटी उत्तरे दिलेली दिसतात. याचा अर्थ या दोन्ही कंपन्यांमध्ये याआधीही तुटक शब्द वापरून करार अस्तित्त्वात आलेला आहे. क्रिसने कराराच्या मेसेजला रिप्लाय करून एकप्रकारे आपली समंती दर्शवली आहे. याव्यतिरिक्त क्रिस ॲश्टर यांच्याकडून इतर कोणतेही तार्किक किंवा विश्वासार्ह स्पष्टीकरण मिळालेले नाही.
या निकालाचे भविष्यात काय परिणाम होतील?
तथापि, न्यायालयाने यापुढे जाऊन सांगितले की, थम्स-अप या एकाच इमोजीचा अर्थ लावताना ही केस उभी राहिली, ज्यामध्ये संमती आणि स्वीकृती याचा नवा संदर्भ आपल्याला सापडला. या प्रकरणानंतर आता अशाप्रकारे इतर इमोजीचा अर्थ लावण्यासंदर्भातील अनेक प्रकरणे न्यायालयाच्या दिशेने येतील. केवळ तंत्रज्ञान किंवा दैनंदिन वापर म्हणून न्यायालय अशा प्रकरणाचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करणार नाही. कॅनेडीयन समाजामध्ये आता इमोजीसचा वापर करणे सामान्य घटना झालेली आहे, त्यामुळे न्यायालयालाही यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी सज्ज राहावे लागेल.
याआधी असे प्रकरण कधीच सुनावणीस आले नसले तरी असे होणे अकल्पित नाही. द व्हर्ज या तंत्रज्ञानाला वाहिलेल्या संकेतस्थळाने माहिती दिल्यानुसार, २०१७ साली इस्रायलमध्ये अशाच प्रकारचे एक प्रकरण सुनावणीस आले होते. एका दाम्पत्याने घरमालकाला इमोजी पाठवून त्याचे घर भाड्याने घेणार असल्याबाबत संमती दिली, त्यानंतर त्यांनी माघार घेतल्यामुळे त्यांना हजारो डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. या दाम्पत्यांनी घर मालकाला भाडेकराराची चर्चा झाल्यानंतर शॅम्पेनची बाटली, खार आणि धूमकेतू असे इमोजी पाठविले होते. पण त्यानंतर घरमालकाच्या मेसेजसना उत्तर देणे त्यांनी टाळले. याठिकाणी इमोजीसचा वापर कराराचे पुष्टीकरण करण्यासाठी झाला, असा निकाल न्यायालयाने दिला होता.
इमोजी काय आहे आणि त्याची सुरुवात कधी झाली?
जपानी कलाकार शिगेताका कुरीता यांनी १९९९ साली इमोजी तयार केल्या आणि त्यानंतर हळूहळू नवीन काळातील चित्रलिपी भाषा म्हणून इमोजीचा वापर रुढ झाला. इंग्रजीतील emoji हा शब्द जपानच्या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला. त्यापैकी e म्हणजे पिक्चर (फोटो) आणि moji म्हणजे कॅरेक्टर (वर्ण किंवा शब्द). एका संशोधनानुसार अमेरिकेमध्ये इमोजीसशी निगडित प्रकरणांमध्ये खूप वाढ झाली आहे. विशेषतः लैंगिक प्रकरणे, नोकरीत भेदभाव आणि खून प्रकरणात इमोजीचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिका, चीन, इस्रायल आणि इतर काही देशांमध्ये इमोजीशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये इमोजी पाठविणारा आणि स्वीकार करणाऱ्या व्यक्तीमध्ये विविध माध्यमानुसार इमोजीचे अर्थ बदलल्याचेही लक्षात आले (प्रत्येक ॲप्स आणि वेबसाइटवर त्यांनी डिझाईन केलेले इमोजी वापरण्यात येतात, त्याचे अर्थ त्या त्या ठिकाणी बदलतात) ज्यामध्ये डिव्हाइस, ऑपरेटिंग सिस्टिम आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामचा समावेश असतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तिने खेळण्यातल्या बंदुकीचा इमोजी दुसऱ्या व्यक्तीस पाठवला असले तर आणि पलीकडल्या व्यक्तीकडे वेगळेच डिव्हाइस किंवा ऑपरेटिंग सिस्टिम असेल तर तिथे त्याला ती रिव्हॉलवर असल्याचे दिसू शकते. ज्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते.
त्याचप्रकारे वयाने अधिक असलेले वापरकर्ते इमोजीचा शब्दशः अर्थ काढण्याची शक्यता अधिक असते. त्यातुलनेत तरूण वापरकर्ते उदारपणे किंवा कधी कधी उपहासाने इमोजीचा वापर करताना दिसतात. सध्या इंटरनेटवरील संवादाचे जे माध्यमे आहेत, त्यावर हजारो इमोजीस उपलब्ध आहेत आणि वर्षागणीक त्यात आणखी भर पडते. विविध प्लॅटफॉर्मवर इमोजीसचा अर्थ बदलताना दिसतो, हा बदल विविध संस्कृती, वयोगट आणि संदर्भानुसार योग्य पद्धतीने न वापरल्यास भविष्यात आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता उद्भवते.